बलात्कार, बापय, आडदांडपणा, मुले इत्यादी: काही असंकलित नोंदी

अनेक शाळांमधून हिरीहिरीने राबवला जाणारा उपक्रम म्हणजे दररोजच्या वृत्तपत्रांचे वाचन. वृत्तपत्र वाचनामुळे १. दररोज घडणा-या घटनांची माहिती मुलांना कळते, २. मुलाला आत्मविश्वास येतो, ३. मुलांची भाषा चांगली होते, ४. मुलांना सामाजिक भान येते असे सांगितले जाते. आता नऊ-दहा वर्षाच्या वयाच्या मुलाला माहिती वा सामाजिक भान देण्यासाठी पेपर वाचायला लावणारा ‘स्पर्धा परिक्षा- अभ्यास’ टाईप प्रकार कशासाठी? किंवा, वर्तमानपत्रे वाचून भाषा खरच चांगली होते काय? अशा प्रश्नांना शिक्षणशास्त्रीय चौकटीत प्रतिसाद देण्याचा या लेखाचा हेतू नाही. दररोजच्या भडक बातम्या वाचताना मुलांच्या प्रश्नांने निरुत्तर होण्यापेक्षा त्यांना बातम्या वाचायचे प्रोत्साहन देण्याऐवजी इतर प्रकारचे समृद्भ वाचन साहित्य देण्याकडे काही पालकांचा कल असतो. पण इथल्या एका शाळेतील एक शिक्षिका काही केल्या ऐकेनात. त्या मुलाच्या आईला समजावून सांगण्याच्या स्वरात म्हणाल्या, “अगं, मागच्या वर्षीच्या मुलांना भारतात पी.एम. कोण आहे सी.एम. कोण आहे हे पण माहिती नव्हते. म्हणून आम्ही यावेळेला शाळेतले सकाळचे काम पेपरवाचनाने सुरू करायचे ठरवलेय.” “पण”, मुलाची आई म्हणाली, “एवढ्या लहान वयात मुलाला सगळच माहिती व्हायला पाहिजे असा अट्टाहास का? आठ-दहा वर्षाच्या मुलाला सी.एम वा पी.एम कोण आहे हे माहिती असायलाच असे का?” यावर त्या शिक्षिका नाराज झाल्या. “नाही, आपण राहातो तिथले जनरल नॉलेज माहिती पाहिजे. नाहीतर मुले फ़क्त नुसत्या गोष्टी वाचत बसतात.” त्यांच्यातला मुद्दा वाढत गेला. दोघींच्या संवादात पुढे तणाव आणणारा असा एक मुद्दा उपस्थित झाला की जो आज लिंग-भेद, पुरुषीपण, आणि स्त्रीशोषण यांच्याशी निगडीत आहे. आईने त्र्याग्याने त्या शिक्षिकेला विचारले, “माझ्या मुलाने बलात्कार म्हणजे काय विचारले तर काय सांगायचे?” सहजतेने, ती शिक्षिका उत्तरली: “सांगायचे, बलात्कार म्हणजे, मुलाने मुलीवर केलेली जबरदस्ती.” यानंतर, बाजूला उभारलेल्या मुलांपर्यंत ‘जबरदस्ती’ या शब्दातून काय पोहोचले असेल? मुलांना प्रौंढांसारखेच भवतालाचे आकलन होत असते त्यामूळे त्यांना प्रौढ समजूनच बरोबरीचे समजून वागवावे यावर आपली सहमती असते. भवताली होणारे बदल मुलांपासून आपण किती काळ लपवुन ठेवणार आणि त्यांना या जगाची माहिती होऊ द्यावी हेही मान्य. पण, तरीही...

+++++

एके दिवशी, शाळेच्या बाहेर मुले-मुली खेळत होती. अंगावर धावुन जाणे, ओरडणे वैगेरे खेळ सुरू होते. एक मुलगी दुस-या मुलाला हातात बारकी काठी घेऊन म्हणाली, “पुढे येऊन बलात्कार करशील तर बग. माझ्या हातात कायाय.” कदाचित, त्या शाळेतल्या शिक्षकवृंदाला आभिमान वाटेल की स्वयंसंरक्षणाचे बाळकडू आपल्या शाळेच्या ग्राऊंडात मिळतात.

+++++


गल्लोगल्ली, वर्तमानपत्रांच्या पानापानांवर झळकतात छायाचित्रे आणि बातम्या: स्त्रीने आत्मसंरक्षण करणे महत्वाचे आहे. त्यासाठी मिळेल त्या साधनांनी पुरुषाचा प्रतिकार करावा असाही प्रसार केला जातो. 

एखाद्या गावात पोलिस आधिकारी वैगेरे सांगतात स्वसंरक्षणासाठी प्रतिकार करणे हा स्त्रिचा हक्कच आहे.

“मी माझ्या मुलगीला सांगून ठेवलय बाबाशिवाय कुणाही पुरुषाला जवळ येऊ द्यायचे नाही. मग तो मामा असू दे न्हाईतर काका, न्हाईतर आणि कोण.”, आजूबाजूला घडणा-या घटनांनी दचकुन गेलेली एक आई आपल्या मुलाला सांगते.

बारमधे संध्याकाळी बिअर पिताना समोरच्या टीव्हीवर बलात्काराच्या ब्रेकिंग न्यूज बघून मुलगा असलेल्या बापाला मुलबाळ नसलेला तरूण चिडीला येऊन सांगतो “साल्यांना चौकात फ़ासावर चढवाय पाह्यजे. बरय रे तुला मुलगी नाही.”

गावागावांतल्या ब-याच कॉलेजिसमधून उद्दिपित करणारे कपडे मुलींनी घालू नयेत असे फ़तवे काढले जातात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक असोत नाही तर गावातला छोट्या मोठ्या राजकिय पक्षाचा कार्यकर्ता असो: मातृत्वाचा, पर्यायाने, स्त्रीत्वाचा आदर करणा-या भारतीय संस्कृतीचा –हास होतोय म्हणून असे माणूसकीला काळीमा लावणारे प्रसंग घडत आहेत असे त्वेशाने सांगितले जाते.
++++ 

“कायद्याच्या बडगा, फ़ाशी आणि काय काय,” माझी मैत्रिण मला सणकलेल्या डोक्याने सांगत असते, “अरे कसे बघतात रे हे बापय. त्यांची मालमत्ताच आहो आपण. मला तरी ते बघितले तरी कधी-कधी कुणीतरी माझे कपडे काढतय अशी घाणेरडी फ़ीलींग येते. कायदा काय करणाराय त्यांचं.”

++++

बलात्काराच्या घटनेला दिल्या जाणा-या प्रत्येक प्रत्युतरात एक सत्य गृहित धरलेले असते ते म्हणजे या घटनेच्या केंद्रस्थानी ‘बाई’. अर्थातच, शोषण सहन करणारी तिच असते. हिंसेच्या घटनेला प्रतिकार करण्यास ती कमी पडते. बरोबर कुणी असेल तर तो/ते तिला बळ देण्यात ते कमी पडतो/पडतात. तिच्यावर अन्याय करणारा माणूस असणारा पुरुष त्यादिवशी पशुसारखा वागतो इत्यादी. तो असा का वागतो? याची कारणे, समाज बदललाय, आधूनिकीकरण झाल्येय, कुटूंबसंस्था मोडकळल्या आहेत, संस्कृतीचा –हास होतोय वैगेरे अशी सांगितली जातात.

या सगळ्यांमधे अजुन एक मान्य केलेले असते की बाई ती असते ती जी पुरुष नाही. म्हणजे, ती व्यक्ती बाई नसती तर असे काही झालेच नसते. यावर सर्वांचे एकमत. आरुन फ़िरुन, बाई म्हणजे पुरुषापेक्षा ‘दुसरी’ कुणीतरी ही इथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात सर्वकाळ ठसवलेली भावना इथे आधिक तीव्र केली जाते. ठसवण्याच्या या थोर कार्यात शिक्षणे, माध्यमे, पोलिसे, राजकारणे अशांच्या संस्थांत्मक भरघोस पाठिंब्याने बाई पुरुषापेक्षा कुणीतरी दुसरीच आहे हे आधिकाधिक गडद केले जाते. बलात्कारासारखे प्रसंग जे माध्यमे (जसे काही पहिल्यांदाच असे घडले आहे आणि आता नाही आपण ही न्यूज फ़्लॅश केली तर नंतर ही संधी येणार नाही अशा आवेशाने) उचलून धरतात. मग, खैरलांजी असो वा त्या आधीचा वा नंतरचा इतर हिंस्त्र प्रकार. संस्थात्मक संक्रमणाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असे प्रसंग उचलून धरले जातात (आणि विसरलेही जातात). सगळ्या प्रसंगातली टॅगलाईन अशी की पशुवत हिंसा कमी करायची असेल तर स्त्रीकडे आपण संस्कृतीतल्या उदात्त भावनेने बघितले पाहिजे. अशा प्रसंगातील नराधमांना कडक शिक्षा व्हायला हवी. त्यातुन इतर स्त्रियांना बळ येईल. ‘डेलि मिरर’ या वर्तमानपत्रातील बातमीत बलात्कारित महिलेचे नांव तिच्या वडलांकडून जाहीर केले जाते. हे करताना वाचणारा गलबलून जाईल अशा भाषेतील या बातमीत परिच्छेद पाडून असेही सांगितले जाते की: “Releasing a photo of her is for another day.” उद्या-परवा किंवा तेरवा पेपर वाचावा अशी उत्सुकता चाळवत ठेवली जाते. जिथे इंग्रजी पहिली भाषा आहे त्या समाजात वाचले जाणारे असे इंग्रजी पेपर वाचले तर भारतातल्या मुलांची इंग्रजी चांगली होईल या ‘शैक्षणिक’ हेतूने इथल्या शाळांमधल्या वाचन कट्ट्यावर अशा वृत्तपत्रांचे वाचन नक्कीच चांगला ‘उपक्रम’ समजला जाईल.

+++++

बरं बायकांचं काही होऊ दे यातून पुरुष आणि त्याचं पुरुषीपण नामानिराळेच. त्याला त्याचं आडदांडपण जपून ठेवण्यासाठी जणू सारी व्यवस्था कामाला लागलेली असते. त्याला त्याच्या लैंगिक प्रेरणा जोपासू द्या. पण, थोडे संयमाने घे बाबा! म्हणजे, वेश्यागमन करु द्या त्याला आणि त्यासाठी वेश्याव्यवसायाला मान्यता द्या. जेणेकरुन तो निष्पाप बाईची धरपकड करणार नाही. घरात बायकोने मासिकांतून किंवा वर्तमानपत्रांतून येणारे सल्ले अभ्यासून नव-याला समाधानी ठेवावे किंवा सांभाळुन घ्यायचे कुठले मार्ग आहेत याचा अभ्यास करावा म्हणजे तो भरकटणार नाही. त्यात, जेवण कसे चविष्ट करावे, ती कितीही थकली वा तिची काही शारिरिक स्थिती असली तरी तिने तो सेक्सपासून वंचित राहाणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्याचे लैंगिक स्वास्थ सुदृढ ठेवावे म्हणजे घरातल्या वा शेजारच्या स्त्रियांची त्याच्या नजरेपासून सुटका होईल. शिवाय, रा.स्व.सं.चे मोहन भागवत महाराजांचा ‘सल्ला’ मानून लग्न ह्या कराराचे प्रामाणिकपणे पालन करावे. म्हणजे, घर, मातृत्व अशी संस्कृतीची मुल्ये आधिक बळकट होतील वैगेरे.

+++++

तुम्ही रिक्षात बसलाय. मागून टु-व्हिलरवाला अर्थातच घाईघाईने आणि अर्थातच मान वाकडीकरुन मोबाईल कानाला लावून जातो. एकदा हॉर्न देतो दोनदा हॉर्न देतो. रिक्षात जोरात गाणे सुरू आहे. अर्थातच, ते गाणे कुठल्यातरी बाईच्या जवानीला वा आई-पणाला उद्देशून आहे. शेवटी, टू-व्हिलरवाला रिक्षाला ओवरटेक करुन जातो. जाता जाता, रिक्षावाल्याकडे वाकून, “ये रांडच्या. तुझ्या आईच्या झवन्या बघुन चालीव की जरा. तुझ्या आईचा दाना तुझ्या. बघ की जरा.” रिक्षावाल्याला अर्थातच या शिव्या ऐकू गेलेल्या नसतात. त्याला राग येतो तो टु-व्हिलरवाला आपल्यावर ओरड्ला याचा. अर्थात, तोही लिमिटेड. टू-व्हिलरवाला आणि त्याच्या मागे बसलेले त्या गावातल्या पॉवरफ़ुल लोकांपैकी आहेत हे त्यांच्या हेअरस्टाईल वरुन, कपड्यांवरुन आणि हातातल्या कड्यांवरुन त्याला दिसते.

+++++

चांगले-वाईट या तुकडे-करणामधे संस्कृती चांगलेपणाचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते. ‘चांगले’ काही म्हणायचे असेल तर ‘संस्कृती’ हा शब्द वापरला जातो. यामधे, उदाहरणार्थ, ‘वाचन-संस्कृती’ जोपासावी असे म्हणताना जन्माला आल्यापासून लहान-थोर सगळ्यांनी वाचलेच पाहिजे तरच ते जगतील असे थोपवले जाते. मग, वयाच्या कुठल्या टप्प्यावर वाचावे किंवा वाचण्याशिवाय जगणं समृध्द करणा-या कुठल्या कुठल्या कृती असू शकतात किंवा काय वाचावे अशा शक्यतांचा सारासार विचार न करता वाचन करायलाच हवे आणि ती संस्कृती-समृध्द बाब आहे असे गृहित धरले जाते. मग, ‘बलात्कार’ असे एखाद्या मुलाने वाचले तर त्याचे कोणते दूरगामी परिणाम मुल आणि त्याच्या भवतालच्या जगावर पडत असतील याचा विचार न करता वृत्तपत्र -वाचन ही एक सकाळी शाळेत आल्यावर ‘वाचन-कट्या’ वर करायची एक अक्टिव्हिटी म्हणून राबवली जाते. वृत्तपत्रांशिवाय इतर काही लेखन सकाळी-सकाळी का वाचायचे नाही? हिंदूत्ववादी चिंतनवाद्यांच्या दृष्टीने इतर ‘गोष्टी’ वाचणे म्हणजे देशभक्तिच्या आड येणे असेल. सामाजिकतावाद्यांच्या दृष्टीने फ़िक्शन वा अदभुत सामाजिक भान देत नाही. सामाजिक भान देण्याच्या भानगडीत मुलांचा हे जग पाहाण्याचा आणि अनुभवण्याचा मोकळा अन अदभूत आनंद त्यांच्याकडून गोष्टी न वाचायला देण्यातून हिरावून घेतला जातो. अशा कुचंबणा करणा-या विचार-बैठकांच्या पार्श्वभूमीवर भवताल आणि भवतालातल्या घटना आपापल्या जबाबदारीवर निरखण्याच्या शक्यता लहानपणापासून दुरापास्त होत जातात. मग राहातात त्या रामायण महाभारतातल्या वा इतिहासातल्या एखाद्या व्यक्ती वा काळावर रोखलेल्या या गोष्टी लिंग-भाव खोलवर रुजवणा राहातात. ‘आपल्या’ संस्कृतीतल्या गोष्टी म्हणून त्या थोपवल्या जातात. परंपरेतल्या म्हणून निवडलेल्या गोष्टी ज्या त-हेने आपल्या समोर उभ्या केल्या जातात वा सांगितल्या जातात त्या खरोखरीच संवेदनशील माणुस म्हणून उभ्या करायला मदत करणा-या असतात काय? एखाद्याचा विजय आणि दुस-याचा पराभव अशी सरधोपट मांडणी उभी करण्याच्या पलिकडे त्या आपल्याला घेऊन जातात काय? गुंतागुंतीच्या समाजामधल्या तितक्याच वैविध्यपूर्ण समाजघटकांसाठी सर्वसमावेशक नसला तरी एकमेकाला आपल्या भावना जपण्यासाठी मोकळा अवकाश प्रदान करतात काय़? अर्थात, या गोष्टीं पारलौकिक वा कलात्म भान आणि; व्यक्ती, समाज आणि भवताल याचे खोलवरचे आकलन देत असतात. पण, त्याकडे नजर अंदाज करुन गोष्टींचे सरधोपटीकरण करण्याचा मार्ग स्विकारला जातो. सीता आणि राम, कृष्ण-लीला, द्रौपदी वस्त्रहरण यामधले नैतिकतचे पाठ इथल्या बलात्कार-संस्कृतीत एकमेकाला सन्मानाने हिंसेशिवाय जगू देण्यास सहकार्य करतात वा प्रेरणा देतात काय? नसतील त्यांना नाकारायला हवे आणि नाकारताना नवे पर्याय सुचवायला हवेत. रामायण महाभारतातले जग वेगवेगळ्या वयातल्या मुलांसाठी, व्यक्तींसाठी जबाबदारीने आणि सन्मानाने कशा त-हेने उपलब्ध करुन दिले जाईल?

+++++

दिवसेंदिवस जाणवतेय की स्त्री-पुरुषांमधले नाते संबंध बदलले तरी त्यांच्यातले भेद नाहीसे झालेले नाहीत. भेदाची रुपे बदलली त्याचबरोबर पुरुषी सत्ताकारणातील तीव्रता तसूभरही कमी झालेली नाही. मन पिळवटून टाकणारे बलात्काराचे हिंसक प्रसंग समोर येतात. वाटावे, या बापयाने मनात किती हिंसा साठवून ठेवलीय. बाबा रे, याचे समाधानच होत नाही. बदलत्या समाजाबरोबर स्त्री-रुपे बदलली असे आपण सहज म्हणतो पण पुरूष-रुपे बदलली आहेत काय? बाईला स्वतःचे संरक्षण करायला शिकवण्याचे पाठच्या पाठ दिले जातात. तिच्या सबलीकरणाचे धडे लहानग्या वयापासून तिच्या डोक्याच्या डोक्याला मुंग्या येईपर्यंत दिले जातात. पण, आता प्रश्न विचारायाला हवा: मुलाने- पुरुषाने काय भान मिळवायचे? ते कसे आणि कुठल्या प्रक्रियेद्वारे आत्मसात करायचे? लोकशाही आधिक समृध्द आणि बळकट होण्यात त्यांचा सक्रिय़ सहभाग काय आणि कसा असावा? पुरुष-भानाबरोबर हिंसाप्रकाराकडे पाहू लागलो तर कदाचित पुरुष असण्याच्या वेगवेगळ्या त-हा पुन्हा तपासता येतील. अर्थात, पुरुषीपणाचा अभ्यास करताना निव्वळ शारिराची मांडणी करुन होणार नाही. दोन लिंग मांडणीच्या चौकटीच्या पलिकडे जात ‘बाई नाही तो पुरुष’ या मांडणीच्या चौकटीबरोबरच इतिहास आणि बदलत्या भवतालाच्या पार्श्वभुमीवर पुरुषीपण नव्याने शोधावे लागणार. अर्थात ही मांडणी, स्थल-काळाच्या चौकटीत आकाराला येत असली तरी तिची संदर्भचौकट व्यापक असेल. या चिकित्सक शोधातून स्त्री-पुरुष संबधातल्या बहुस्तरिय समृध्द शक्यतांचा विचार करता येईल.

Comments

Anonymous said…
Chaanach. Satish
Khirapat said…
आशुतोष, लेख दोनदा वाचला आणि आधीच्या वाचनात न जाणवलेल्या काही गोष्टी दुसऱ्या वाचनात जाणवल्या. खूप संतुलित, प्रगल्भ लिखाण आहे आणि एकाच विषयाला वेगवेगळ्या अंगानी अभ्यासलं आहे. शेवटाचा परिच्छेद तर फारच आवडला.
एकच मुद्दा मला दिसला नाही तो म्हणजे राज्यव्यवस्थेचा. सामाजिक मूल्ये, सांस्कृतिक विचारसरणी हे सगळं मुळातून तपासल्याशिवाय उत्तरे मिळणार नाहीत हे खरंच. ह्या सगळ्याचा अप्रत्यक्षपणे राज्यव्यवस्थेवर, पर्यायाने कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होत असतो हे मान्य असलं तरी वस्तुनिष्ठपणे पाहिलं तर जाणवतं की व्यवस्था अयशस्वी होण्याची इतरही कारणे आहेत जी तपासायला हवीत. सामाजिक मूल्ये बदलायला वेळ लागतो पण व्यवस्थेतले बदल त्यापेक्षा जलद आणि प्रभावीपणे बदलणे शक्य आहे.
शिवाय माध्यमांवर देखील नेहमी हल्ले होत असतात पण या माध्यमसंपृक्त (हा नवीनच ऐकलेला शब्द भयंकर आवडला!) जगात कोणत्याही कारणाने का असेना पण असे प्रश्न चर्चिले जातात हे काही फार वाईट आहे असं वाटत नाही. दिल्लीच्या घटनेच्या प्रतिक्रियांतून मला प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे, त्यातल्या हिंसकतेने आणि माध्यमांनी उचलून धरल्याने निदान आता हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे याकडे समाजाचे आणि पर्यायाने व्यवस्थेचे लक्ष गेले आहे, त्याचबरोबर हेही जाणवले की बलात्कार झाला की त्या व्यक्तीचे आयुष्य संपलेच ही कल्पना थोडी बदलल्यासारखी वाटते, योनीशुचीतेच्या कल्पनाही थोड्याफार का होईना बदललेल्या वाटल्या.
Ashutosh Potdar said…
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. टिपण आवडले हे वाचून बरे वाटले. पुरुषभानाबद्दल विचार करायला हवा. माध्यमसंप्रुक्त हा खराच ’भयंकर’ आवडण्यासारखा शब्द आहे.