हे दोघे: मंडलिक आणि घाटगे

या विशाल नेट-विश्वात कितीं जणांना माहिती असतील, हे दोघे, कुणास ठाऊक. हे फ़ेसबूक आणि ट्विटर वर कितपत लोकप्रिय असतील माहिती नाही. पण, मी वाढलो त्या गावात, चहाच्या गाड्यांवर, कोप-या-कोप-यावरल्या वर्तमानपत्रांच्या वाचनालयात, घरोघरी सकाळच्या रेडिओवरच्या सातच्या बातमीबरोबर हातात पडणा-या ‘पुढारी’-‘सकाळ’मधून ते दोघेही अवती-भवतीची गोष्ट बनले होते. दंतकथा तयार झाल्या होत्या त्यांच्या कर्तृत्वाच्या आणि वैमनस्याच्या.

आठवतय तेंव्हापासून हे दोघे आमच्या आजूबाजूला. ग्रामपंचायतीची निवडणूक, सहकार सोसायटीचा चेअरमन नेमायचा असो वा खासदारकीची निवडणूक. हे असायचेच. शाळेचा वार्षिक क्रिडा समारंभ. गांधी जयंती. भजनाचा कार्यक्रम. ऊरुस. तमाशा. जत्रा. बैलगाड्यांच्या शर्यती. वक्तृत्व स्पर्धा. कौतुकाने पाठीवर थाप मारणारे हे दोघे. जीवाभावाने जपलेले यांचे कार्यकर्ते. रात्रं-दिवस कष्ट उपसणारे. हे दोघे वेळो-वेळी चुकले. हे वेळो-वेळी बरोबर होते. सत्तेचे सारीपाट मांडताना त्यांनी मारलेल्या वैचारिक, पक्षीय -कोलांट्या उड्या इत्यादि इत्यादि आलच. लाल, निळे, भगवे, पांढरे झेंडे घेऊन ते फ़िरले. बदलत्या झेंड्यांसाठी खांदे बदलले. जुनी माणसे दुरावली. नवी माणसे जोडली.


या दोघांच्या ऐन जोशाच्या काळाचे माझ्यासारखे अनेकजण साक्षीदार. या दोघांच्याही सभांचे बिल्ले आणि टोप्या घालून आमचे खेळ रंगायचे. दोघांच्या चित्रांनी आमच्या घरांच्या भींती रंगल्या होत्या. दोघांनी दिलेल्या पाठबळाने अनेकांचे संसार उभे राहिले होते. त्या दोघांच्या सभा समोरा-समोर आल्यानंतरच्या घोषणांचा आवाज अजुनही कानात घुमतो. अनेकांची फ़ुटलेली टाळकी, सभेनंतर चावडी समोर पडलेली तुटकी चप्पल कुणी नाही हे बघून पळत जाऊन आणलीही होती. तरीही, स्वातंत्र्यानंतर उभ्या राहिलेल्या या पीढीने केलेले बांधणीचे काम विसरता येणार नाही. गावगाड्यातल्या रिकाम्या जागा यांनी भरण्याचा प्रयत्न केला. बदलणा-या शहरातले सुटणारे दुवे त्यांनी सांधण्यासाठी मेहनत घेतली.

आपापल्या शैलीने, या दोघांनी गावगाड्यामधल्या बहुसंख्य समाजाला सांभाळले तसेच तिथल्या अल्पसंख्य समाजालाही जपलं. आता कुणी म्हणेल ते राजकारणच. हेही खरे. पण, त्यांची तळमळही खरी. गावांची आणि निमशहरांची नस जाणणारे हे दोघे.

दोन टोकांच्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीतून आलेले हे दोघे. दोघांचे मार्ग वेगळे. सहकार चळवळीतले सोनेरी दिवस पाहिले आणि टोकाची पडझड पाहिली. ‘सहकार’ म्हटल्यावर नाके मुरडणारे बरेच आहेत. पण, अनेकांचे संसार ‘सहकारा’ने उभे केले हे ऐकताना कान बंद ठेऊन चालणार नाही. त्या समृध्द सहकाराची साखळी सांधणारे हे दोघे. सहकाराचे ओघळलेले मणी गोळा करणारेही हे दोघे.

कॉंग्रेस व्यतिरिक्त कुठला पक्ष नसण्याचा तो राजकीय काळ. गावात दोनच गट. घाटगे आणि मंडलिक. दोघांपैकी एकाची कुणाची गावात सभा असली की गांव खडबडून जागे व्हायचे. सभांची जाहिरात करावी लागायची नाही. दंतकथा बनलेले त्यांचे कर्तृत्व आणि वैमनस्य गल्लोगल्ली फ़िरत लोकांच्या कानात कुजबूजायचे. सभा फ़ुलायच्या. गर्दी नाचायची. काळ बदलला. नवे पक्ष. नवे कार्यकर्ते. नवे नेते. पण, या दोघांचे असणे पंचक्रोशीला सवयीचे होते. त्यांच्या दंतकथांचे फ़िक्शन नाही विरले. ते घरंगळत पुढच्या पीढीपर्यंत आले.

दोघांच्याही भाषेत, वावरण्यात कॉंग्रेसी परंपरतेला सर्वसमावेशकपणा. समोरच्याला आपलेसे करुन घेण्याची कला. अडीनडीला धावून जाण्याची धमक. लग्न, बारसे, मयताला जाण्यापासुन ते दहावी-बारावीला पास होणा-या वाड्य़ा-पाड्यातल्या पोराबाळांसाठी कार्यकर्त्यांच्या घरात सहज प्रवेश.

नवीन भाषा बोलायचा यांनी प्रयत्न झाला.ग्लोबल होण्याची भाषा. सहकार वैगरे लोकल, जुनाट वाटण्याचा काळ. सोसायट्या, शिक्षण संस्था बदलल्या. प्रोफ़ेशन म्हणून राजकारणाकडे पहाण्य़ाचे दिवस. बदल पाहिजे होता म्हणून त्या बदलावर हे दोघे वेळोवेळी स्वार झाले. कित्येक वेळा तोंडघाशी पडले. कॉंग्रेस-बिंग्रेस, कोण कुठला काहीच कळेनासे. पुरोगामी बेलगामी होण्याच्या काळात त्यांनी नव्या इनिंग्ज खेळल्या. काळाचा भाग बनून गेलेले. पण, ‘शाहू’चा गोडवा मात्र कमी झाला नाही अजून. यावर विश्वास ठेऊनच पडझडीच्या काळाच्या भिंगातून या दोघांकडे पहाणे.

या दोघांच्यात पाहिलेल्या जुन्या कॉंग्रेसी परंपरेचे अप्रुप वाटते, अजुनही. काही लाख या परंपरेच्या मर्यादा असल्या तरी ती आता हवीशीही वाटतेय या चवताळलेल्या काळात. एक दिवस कॉंग्रेसी सर्वसमावेशकेतेकडे इथली लोकशाही परत वळेल. त्यावेळेस त्या दोघांनाही आठवण येईल त्या समावेशकतेची, परत. एकमेकांचीही आठवण येईल. आपणही आठवण काढू परत. काही नाही झाले तरी गावच्या दंतकथा असतीलच आपल्या सोबत. श्रध्दांजलीची औपचारिकतेपेक्षा हे दोघे भवताली असण्य़ाच्या दंतकथाच अस्सल.

Comments