जेंव्हा गोविंद पानसरे माझ्या वर्गात असतात

शैक्षणिक वर्ष संपले तरी वर्गातल्या आठवणी सहज धुसर होत नाहीत. दरवर्षी नव्या आठवणी जन्माला येत असल्या तरी त्या नव्या आठवणी जुन्या आठवणींबरोबर खेटून उभ्या असतात. सरत्या वर्षातला नाट्य़लेखनाचा अभ्यासक्रम विशेष लक्षात राहाण्यासारखा. या वर्गात विद्यार्थ्यांशी बोलण्यातली गंमत काही न्यारीच होती. आमचा वर्ग फ़क्त वर्ग नसायचा, तांत्रिक अर्थाने. तो खोलीत असायचा, बाहेर पाय-यांवर असायचा आणि कधी चहाच्या टपरीवर. आपल्या भवतालच्या घटनांच्या मालिकांच्या साखळीमधली ती एक कडी असायची. आजुबाजूला आपापल्या आयुष्यात काय घडत असते याचे पडसाद वर्गात पडत. एखाद्या विद्यार्थ्याला रात्री नीट झोप लागली नसते. एखादा दिवस-दिवस मोबाईल मधे गुरफ़टलेला असतो आणि मग ठरवून दिलेले काम त्याने केलेले नसते. कुणाचे भावनिक मुद्दे असतात; मैत्रीतले, घरच्यांबरोबर. पाहिलेला सूंदर नाहीतर वाईट सिनेमा आणि भेटलेली एखादी मनस्वी व्यक्ती. सा-यांबद्दल वर्गात काहीबाही बोललं जात असतं. काही शिक्षक आत घुसून बोलतात. कधी कधी वर्ग संपला तरी एकमेकांच्या घरी त्यांचे विषय पसरत गेले असतात. ज्याच्या त्याच्या सवयी!

गोंविद पानसरेंच्या हत्येची दुःखदायक घटना वर्गात येणे क्रमप्राप्त होते. त्या दिवशी, बातमी कळली तेंव्हा विद्यार्थ्यांनी मला विचारलेच, "आज तबीयत ठिक नही है क्या, सर?" वर्गातले विद्यार्थी अमराठी भाषिक आहेत. त्यांचे सामान्य ज्ञान एकूणच अगाध आहे. वर्तमानपत्रे वाचतातच असे नाही. वाचले तर, इंग्रजी वर्तमानपत्राशिवाय काही वाचतील याची मला खात्री नसते. इंग्रजी वर्तमानपत्रवाले ‘इंटरनॅशनल’ तेवढेच छापतात, ब-याचवेळा. असे असले तरी काही मुले मात्र आजूबाजूच्या घडामोडीबद्दल एकदम सतर्क असतात. गोविंद पानसरेंच्या निधनाची बातमी मला अस्वस्थ करत होती. ती अस्वस्थता वर्गात येणे हे अपरिहार्य होते. वर्गात मी बोललो पानसरेंच्या दुर्दैवी हत्येबद्दल.

*

कसबा सांगाववरुन कोल्हापूरात शिक्षणासाठी आलो तेंव्हापासून गोविंद पानसरेंची ओळख म्हणजे चळवळीचे नेतृत्व करणारा खंदा वीर अशीच होती. त्यांच्या जवळ जायला तसे घाबरायचो. पण एका टप्प्यावर, कोल्हापूरात रुळल्यावर त्यांचे असणे ठळकपणे समोर येत होते. साहित्यापासून ते राजकारणापर्यंत सर्व क्षेत्रात या माणसाचा लीलया संचार असे. जनसंपर्क तर डोळ्यात भरण्याजोगा. वेगवेगळ्या स्तरातील, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक त्यांच्याशी सहज बोलायचे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांची वैचारिक बैठक पक्की असायची. कुठेही गडबड नाही. वेगवेगळ्या वैचारिक धारणांचा विस्फ़ोट होतोय असे म्हणून ‘गोंधळ’ सदृष्य ‘पोस्ट-मॉडर्न’ काळाचे वर्णन(गुणगान) करणा-यांनी एका कुठच्या अभ्यास शाखेचा बैठक मारुन अभ्यास केलेला असतो का याबद्दल मला शंकाच वाटते. पण, या ‘गोंधळा"चा बाऊ न करता पानसरेंचे विश्लेषण आणि तेही डाव्या विचारसरणीच्या चौकटीत अण्णांची हातोटी काही अजबच होती. ज्ञान, साधना आणि भवतालाचे भान यातूनच अण्णांची विचारांची पक्की बैठक आणि चौकट तयार झाली असणार.

पानसरेंची वेगवेगळ्या विषयांवरची व्याख्याने वेगवेगळ्या वेळेला मी ऐकली. हरेक व्याख्यान विचार करायला प्रवृत्त करणारे. महत्वाचे म्हणजे, ‘डिस्कोर्स’ मांडण्याचा गाजावाजा न करता होणारी त्यांची मांडणी. ऐकणा-याशी थेट संवाद. कोणताही आडपडदा न ठेवता. आर या पार. माणसं आर या पार बोलणारी असली एकमेकांच्या जवळ जातात. सुरुवातीला आर-पारीचा त्रास होऊ शकतो. पण, तेवढ्यापुरताच. माणसाचे भान आले की ‘आर-पार’ गुणांवरचा विश्वास वाढतो. अण्णांच्या सहवासात माणसे समृध्द झाली.

कोल्हापूरातला दसरा चौक वैचारिक आणि सांस्कृतिक समृध्दीचा वारसा सांगणारा. इथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांचा साक्षीदार म्हणजे ‘दसरा चौक’. अर्थात, दसरा चौकातली पडझडही बदलत्या काळाचे प्रतिबिंब. इथले रस्ते आजुबाजूच्या गावांतून येण्या-जाण्याचे आणि कोल्हापूर शहरात जाणारे. दसरा चौक सगळ्यांना बांधून ठेवतो आणि मोकळे सोडतो. इथे येणारे जाणारे श्वास विसावा घेऊन एकमेकांशी गुजगोष्टी करतात. दसरा चौकातलं सामाजिक वैभव आमच्यापर्यंत पोहचले ते इथल्या व्याख्यानामधून, जवळपासच्या हॉटेलांमधून, चहाच्या टप-यांवरुन, सभोवती असणा-या वर्तमानपत्रांच्या कार्यालयांमधून आणि आम्ही राहायचो त्या हॉस्टेल्स मधून. पानसरेअण्णा दसरा चौक परंपरेचे एक अध्वर्यू. दसरा चौकातील वैचारिकतेची प्रगल्भ परंपरा त्यांनी पुढे नेली.

*

हे सारे माझ्या विद्यार्थ्यांसमोर मांडणे किती अवघड होते. पण, माझ्या मनात खळबळ होत होती. त्यामागचे सत्व तर त्यांच्यापर्यंत पोहचावे असे मला वाटत होते. त्यांच्यापर्यंत किती पोहचतेय किती नाही याचा विचार न करता मी बोलत राहिलो. मनातला त्रागा, संताप, दुःख सगळे ‘नाट्य-लेखना’च्या वर्गाचा भाग झाला. मनातले बोलून झाल्यावर, अर्ध्या-एक तासाने हलके वाटले. आपण काहीतरी बोलून जातोय आणि त्यांच्यापर्यंत काही पोहचले नसेल असे वाटुन मी गप्प बसलो. नंतर, अण्णांच्या अंत्यदर्शनाला कोल्हापूरला निघून आलो.

पानसरेंच्या निधनानंतर वेगवेगळी चर्चा सुरू झाली. सुरू आहे. हत्येमागचे राजकारण, राजकारणातले धागे दोरे इत्यादि. गावोंगावी सभा झाल्या. पुण्यात सभा झाल्या. मोर्चे काढले. लोकशाहीमधे विधींची काही कमतरता नसते. असे वाटावे, लोकशाहीमधले ‘लोक’ काढून ‘विधी’ ठेवावा. भाषणे, पुरोगामी-प्रतिगामी, डावे-उजवे. पण, या सगळ्यापलिकडे तो जीवंत माणूस होता तो गेला, तो मारला गेला ही भावना भीषण असते. समृध्दतेला विकृतीने संपवता येते हे कटू सत्य मन खात राहाते. सकाळच्या वेळेला दोन वृध्द चालायला निघाले असताना त्यांना जाता-जाता संपवले जाते हे कठोर सत्य पचवताना आतड्यांमधे पित्ताचे थरच्या थर साचतात. आपण राहातो त्या जागेबद्दल आपण असुरक्षित बनतो. कितीदा तरी पानसरेंच्या घरी, त्या बाजूला मी गेलोय. त्यांच्या घराच्या बाहेरच्या बाजूला, वर मेघाच्या घरी; कितीदा तरी त्यांना पाहिलेय. नमस्कार केलाय. अत्यंत शांत असा हा परिसर. बक-याच्या टकरीपासून आत शिरलात की त्यांचे घर. मला माहिती नाही त्यांची नक्की कुठे हत्या झाली. पण, त्या परिसरात आता मला माझी बाईक न्यावीशी वाटली नाही. ज्या परिसरात आपण वाढलो त्या परिसराबद्दल ही भावना आपल्याला मनात येते हे खूप त्रासाचे वाटते.

कधीतरी आपल्याला अपघात झालेला असतो. पण, काही दिवसानंतर त्यातले दुखणे जाणवायला लागते. वेदना परत फ़िरून आपल्याकडे येऊ लागते.

*

नाट्यलेखनाच्या वर्गात लिखाण-प्रक्रिया टिपणारी नोंदवही प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवायची असते. शंतनू किश्वर या माझ्या विद्यार्थ्याने पानसरेंच्या हत्येनंतर Where Does My Duty Lie? नावांची नोंद आपल्या ब्लॉग डायरी मधे लिहिली आहे. चांगल्या आर्थिक परिस्थितीतून आलेल्या या मुलाला, तो पानसरे हत्येनंतर मी भेटलो तेंव्हा सांगत होता, धक्का बसला. तो आपल्या डायरीत प्रामाणिकपणे लिहितो की, "To be honest, I had never heard of this name before today." पण, त्यानंतर त्याने जे लिहून ठेवले आहे ते मला खूप महत्वाचे वाटते. तो लिहितो:This incident raised a lot of questions in my mind. Other than the usual ‘what is happening in my country’ and ‘is it safe or should I just run away to another country because my parents can afford it’, it made me wonder about whether any of it could be changed. More particularly, could any of it be changed by me, especially me as an actor." अजून वीस वर्षेही वय नसलेला शंतनू वाळूत मान खूपसुन बसणा-यांचे प्रातिनिधित्व करु शकला असता. पण, मला आनंद वाटला की त्याच्या समोर प्रश्न पडला मी काय करु आता याचे. आपण काय भूमिका घेऊ शकते याचा विचार शंतनू करु शकला याचे मला विशेष वाटले. तो किती चांगले नाटक लिहिल यापेक्षा त्याला प्रश्न पडत आहेत आणि त्याप्रश्नांना त्याला समोर घेऊन जावेसे वाटते याचा मला मनापासून अभिमान वाटतो.

क्षणभर विचार आला: पानसरेंची प्रश्न उभे करण्याची, समाजाला प्रश्न पाडण्याची ‘दसरा चौक परंपरा’ नव्या पिढीपर्यंत पोहचतीय. ज्या एका व्यापक समाजभानातून पानसरेअण्णा समाजाकडे आणि इथल्या बदलाकडे पाहाण्याचे आवाहन आपल्या आयुष्यभराच्या कामातून करत आले त्या समाजभानाचे वारे शंतनूसारख्या विद्यार्थ्यापर्यंत पोहचू शकते हे किती उभारी देणारे आहे.

पानसरे गेले. पण, इथेच कुठेतरी, वर्गात, वर्गाबाहेर शिवाजी बद्दल सांगत, समजावत उभे आहेत असे वाटते. त्यांच्याकडे तोच जोश. तोच उत्साह. तीच न संपणारी आशा.

Comments

Anonymous said…
i completely relate to this 'aswasthata' and i, in no way, have any doubts about the genuineness of your or your student's feelings...but the thing is that every one of us wants to do 'something' and i am just not sure what that 'something' means and stands for. we are all living in our small zones with this idea of 'something' and there is no coming together of these 'somethings' in any way and we can not even envisage that in the near future. i know that i am sounding pessimistic. i am at the moment but with a hope that 'something' will emerge out of it. may be we need different ways and means. may be in a different form and shape. may be, i don't know.