#सायकलगोष्टी

सायकल चालवायला लागून पंधरा मिनटे झालीयत. काही किलोमीटर्स चाकांनी पार केलेयत. तिकडून एकजण सायकलकडं टक लावून बघतोय. सायकलकडं कुणीतरी बघतच असतं दरवेळी. कायाय एवढं तिच्यात असं मी मनातल्या म्हणतो तेवढ्यात बाईकवाला मोठा मनुष्य माझ्या डाव्या बाजूला घासून उभा राहातो. त्याच्या नाकाखाली थोड्याशाच वाढलेल्या मिशा. अर्ध-पाव भरलेलं जोंधळ्याचं पोतं दोन्ही बाजूला लोंबतं तसं त्याचे पाय त्याच्या बाईकच्या दोन्ही बाजूला लोंबत होते. त्याने पाय जमीनीवर टेकवले आणि तो पुढे उभारलेल्या गाडीच्या जाण्याची वाट बघत अधीरतेने पाय हलवत राहिला. त्याच्या हालणा-या पायाचा धक्का माझ्या सायकलीच्या गिअर बॉक्सला लागू नये म्हणून सायकलीला मागच्या बाजूने मी हळूच उचलून बाजूला ठेवतो. गाडीवर बसलेल्याचे ढूंगण इतके अवाढव्य दिसत होते की त्याच्या बुडाखालची गाडी मी लहानपणी जिच्यावर बसायचो ती सायकलीची ती नळी वाटत होती. इअर बड कोंबलेल्या कानात तो मोबाइलवरचे गाणे किंवा काहीतरी ऐकत असावा. त्याच्या चेह-यावर उध्दटपणा दिसत होता. असा उध्दटपणा नाटक बघून बाहेर पडणा-या इंटेलेक्च्युअल ऑडियन्समधे दिसतो, कधीकधी. मी त्याचे ढुंगण मनातुन प्रयन्तपूर्वक दूर करून रस्त्यावरच्या गर्दीत फ़ेकून दिलं तशी गर्दी ओसरली. मी जोराने पाय मारले.

वहाने वेगाने पुढे जाऊ लागली तशी आम्हाला गती आली.

बाजूने येणा-या वहानावरचा मनुष्य एकदम रुबाबदार होता. केस नीटसे विंचरलेले नव्हते आणि अर्ध्या बाह्याचा शर्ट घातलेला हा रस्त्यासमोर-वर लावलेला अपार्टमेंटच्या जाहिरातीकडे पहात गाडी चालवत होता. "अरे, पुढे बघ" असं मी मनातल्या मनात म्हणत होतो त्याक्षणी त्याने माझ्याकडे बघून मला स्माईल दिले. शिवाय, मला थोडी जागा करुन देण्यासाठी त्याने आपल्या गाडीची गती कमी केली. मीही माझ्या स्माईल-थ्रू त्याला थॅंकू दिले. त्यानेही सहज मान लवून इट्स ओके म्हटले आणि तो पूढे निघून गेला.

येणारी-जाणारी माणसं आपलं-आपलं गाणं घेऊन येत असतात. माणसांना एकमेकांचं गाणं ऐकू येत येतं काय? आणि, वहानांना एकमेकांचं? माझ्या सायकलीला माझं तरी गाणं ऐकू येत असावं. या गावच्या खड्य़ांमधनं ती कितीदातरी ठेचकाळत असते. पण, ते ठेचकाळणं ती माझ्यापर्यंत येऊ देत नाही.

एक्स्प्रेशन लॅबच्या कलाकारांसमोर मला बोलायचय आहे. माझी तयारी झालीय. मनातल्या मनात उजळणी करतोय. मुद्दे मनात आहेत पण मला ऐकणारे कसे असतील? माझं बोलणं त्यांच्यापर्यंत पोहचेल काय? कुठेही बोलायचे असले की असे प्रश्न पुनःपुन्हा मनात येतात. दररोज बोलण्याचा उद्योग मी करत असतो. तरी, दरवेळी तेच  प्रश्न आणि नर्वसनेस!

माझ्या सायकलची गती कमी झालीय. मोठा चौक आलाय. समोरची गर्दी बघून मी वेळेत पोहचेन की नाही याची धुगधूग आम्हा दोघांना वाटतेय. या चौकातल्या अंडरवेमधून आम्ही कधी गेलेलो नाही. आता ट्राय करावा म्हणून आम्ही बाजूच्या रस्त्याने अंडरवेमधे शिरतो. सायकलीबरोबर घेऊन हा कोण अंडरवेमधून चाललाय अशा प्रश्नार्थक मुद्रेने आजुबाजूचे लोक आमच्याकडे पहातायत. आम्ही वळसा घेऊन पुढच्या पुलाकडे जाण्याचा रस्ता पकडतो. तेवढ्यात मागून एक मुलगेला मनुष्य येतो. (आता मी त्याचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करतो पण तो समोर येत नाही.) त्याच्या हातात कुठलीशी बॅग असावी. कुठेतरी काम करुन तो परत येत असावा. "अहो", तो हाक मारतो. युजवली, पहिली हाक मला ऐकू येत नाही. ज्याला कुणाला माझ्याशी बोलायचे असेल तर त्याने दोनदा हाक मारावी असे, जणूकाही, माझ्या कानांनी ठरवले आहे. मी सायकलीला एका दगडावरून उचलतो पुढे जाऊ लागतो. तो परत, "अहो, तुमची ही सायकल रेसरची आहे काय?" मी हॅंडलकडे पाहातो आणि डोळ्यांनीच त्याला "काय?" असे विचारतो. तो परत विचारतो, "रेसरची सायकलय?" मी उत्तरतो, "मी चालवायला वापरतो ही सायकल. नेहमीचीच आहे." आम्ही दोघांनीही त्याचे फ़ार मनावर घेतले नाही. पुढचा प्रश्न काय येणार याचा आम्हाला अंदाज असतोच. आम्ही पुढे चालू लागलो. आम्हाला गती घ्याय़ची असते. इन फ़ॅक्ट, ढांग टाकून जायचे असते पण शक्य नसते कारण आम्ही गल्लीतून मेन रस्त्याला लागाय़चा रस्ता शोधत असतो. शोधताना एकाला पुढे मेन रोड आहे काय हेही  विचारतो. तर तो  आहे म्हणतो. आम्ही चालू लागतो. घरासमोरची भांडी, पार्क केलेल्या दोनचाकी गाड्या ओलांडत चालू लागतो तसा तो पुन्हा मागे: "अहो...ही सायकल किती रुपयची आहे?" हा प्रश्न अपेक्षित प्रश्नांपैकी एक. पण, कुणी विचारणार नाही म्हणून त्याचे उत्तर मनात तयार ठेवलेले नसते. मी ब-याच वेळी फ़सतो. अर्थात, एवढा थेट प्रश्न सहसा कुणी विचारत नाहीत. आडूनच विचारतात. सायकल महाग असेल नाही? छोट्या दुकानात मिळते अशी सायकल? या सायकलची दुरुस्ती करायला किती खर्च येतो? असे ते आडून विचारले जाणारे प्रश्न. प्रश्न आल्याक्षणी, सायकलीच्या किंमतीचा विचार चुकूनही केलेला नसतो आपण. सोबतच्या मित्र-मैत्रीणीची किंमत विचारत कुणी विचारत नाही. पण सायकलीची विचारतात. तर, कसाही प्रश्न आला तरी माझी तारांबळ उडते. "लई शाना हाईस" अशा अ‍ॅरोगन्सीची नजर आपल्यावर पडू नये म्हणून मी मनात येईल तो आकडा: चार हजारापासुन ते पंधरा हजारांपर्यंत बोलून रिकामा होतो. याशिरस्त्याप्रमाणे, आता "सात हजार" म्हणून गेलो. ‘स्वस्त वाटते’ असे वाटुन तो उत्साही झाला असावा. कारण, तो आमच्याकडे परत वळला आणि म्हणाला, "ही रेसिंगची सायकल आहे काय?" तो विचारतोय त्यामागचे त्याचे काहीतरी लॉजिक असणार जे मला लक्षात आले नाही. क्षणभर वाटलेही की थांबून त्याच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्यावीत. त्याला काय म्हणायचेय हे समजून घ्यावे. पण, एक्स्प्रेशन लॅब. सायकलवर पाय टाकत म्हणालो "ही चालवायची सायकलय." त्याच्यासाठी मी दिसेनासा झालो आणि माझ्यासाठी तो.



Comments