डीयर देवलमास्तर,


डीयर देवल मास्तर,
 
मी सिंधू, सुधाकर, रम आणि इतर हे नाटक लिहिले तेंव्हा तुमची नाटके परत वाचुन काढली. माझं नाटक तुमच्या समकालीन नाटककाराच्या: गडक-यांच्या एकच प्याला या नाटकाची पुनर्भेट आहे. आजच्या नजरेतुन त्या नाटकाकडे, त्या काळाकडे पहाण्याचा प्रयत्न. सिंधू, सुधाकर, रम आणि इतर या नाटकाचे प्रयोग होताना तुमची आठवण पुन्हा एकदा येतीय. योगायोग म्हणा किंवा काही, गडकरीसुध्दा तुमचे चाहते. तुम्हाला भेटायला गेल्यावर “वंदन नाट्यमिलिंदा गोविंदा तव पदारविंदाना” या ओळीने सुरु होणा-या आर्या गडक-यांनी तुम्हाला अर्पण केल्या. भेटायला गेल्यावर लोक मिठाई किंवा इतर काही भेटवस्तु देतात. गडक-यांनी तुम्हाला कवितेच्या ओळी दिल्या! 


१४ जून १९१६ चा तुमचा मृत्यु. तुमच्या मृत्यूला शंभर वर्षे होतायत. अजुनही तुमच्या नाटकांनी आणि तुमच्या काळाने आमची पाठ सोडली नाही. तुमचा काळ आणि त्या काळातलं लेखन मॅड करणारं, वेगवेगळ्या कारणांनी.

तर, पुण्यातल्या ‘नाटक कंपनी’ चे आलोक राजवाडे आणि ओंकार गोवर्धन गडक-यांचे ‘एकच प्याला’ घेऊन आले आणि म्हणाले, “चल, आशुतोष करु याचं काहीतरी”. लागलो कामाला. जसाच्या तसा एकच प्याला काय घ्यायचा! मग, त्याचं पुनर्वाचन करायचं ठरलं. आमच्या नाटकाबरोबर तुमची नाटके आली, तुमचे गुरु किर्लोस्करांची नाटके आली, तुमचे समकालीन खाडिलकर आले. म्हणजे, टिळक-युग संपेपर्यंतचा १९२० पर्यंतचा काळ आला. सामाजिक सुधारणा की राजकिय स्वातंत्र्य, सनातन आणि पुरोगामी ब्राह्मण्य, नैतिकतेच्या कल्पना, बालविधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण, स्त्री-पुरुष नाते, सारदा कायदा, राष्ट्रवाद, शेक्सपियर, कालिदास, शोकांतिका, संगीत नाटक, नाटक कंपन्याची भरभराट ते कर्जबाजारी कंपन्या, मुकपट-बोलपट असं सगळं करत-करत सिंधू, सुधाकर, रम आणि इतर लिहून झाले. आलोकने ते दिग्दर्शितही केलं. त्याचे प्रयोगही होऊ लागले. पण, तुम्ही काही मनातुन गेला नाही. जात नाही.

मास्तर, तुमच्या आधी तुमचे गुरू, अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी आपल्या नाट्य-कर्तृत्वाने मध्यमवर्गीय मराठी माणसावर प्रभाव पाडला. ना सी फ़डक्यांनी किर्लोस्करांना सूर्याची आणि तुम्हाला चंद्राची उपमा दिली. खाडिलकर, गडकरी, कोल्हटकरांसारखे तुमचे समकालीन असताना आणि तुम्ही लिहित असताना ‘गडकरी युग’ जोरात असताना सुध्दा तुम्ही शांतपणे लिहीत राहिलात. तुमच्या नाट्य-कर्तृत्वाचा प्रकाश, फ़डके लिहितात त्याप्रमाणे, “प्रखर नव्हता; दशदिशा उजळून टाकणारा खरा पण मंद मृदु आणि आल्हादकारक होता.” तुम्ही दुर्गा (१८८५), झुंजारराव (१८९०), फ़ाल्गुनराव/संशयकल्लोळ (१८९४/१९१६), मृच्छकटिक (१८८७), विक्रमोर्वशीय (१८८९), शापसंभ्रम (१८९३), आणि शारदा (१८९९) अशी सात नाटके लिहिली. यातले, फ़क्त शारदा  स्वतंत्र नाटक. पण, या नाटकाने लेखन आणि समाज यातील नातेसंबधाबद्दलचा एक मानदंड घालून दिला.

नाटक लिहिताना मी गडकरी वाचत गेलो तशी लक्षात राहिली गडक-यांची लांबलचक स्वगते. शेक्सपियरच्या नाटकाच्या प्रभावाने ‘मराठी शोकांतिका’ लिहिणा-या गडक-यांच्या नाटकातील पल्लेदार आणि भावविवश भाषेशी जोडून घेताना अडचण यायची. त्यावेळेला, तुमची शांत, लयदार, साधी, थेट मनाला स्पर्श करणारी भाषा हवीहवीशी वाटायची. शारदेच्या तोंडचे हे छोटेखानी भाषण नेहमीच लक्ष वेधुन घेतं: “ मी किती नको नको म्हटलं तरी काळ कुठें ऐकतो आहे? त्याचा आपला क्रम चालायचाच. पंधरा दिवसाचे आठ, आठांचे चार राहिले, आणि चारीचं एकावर आलं. आजचाच दिवस काय तो मधें; आणि उद्या? उद्या काय- “लग्न नव्हे मरण उद्यां ठरलें ते टळत नाही.”

तुमच्या प्रत्येक नाटकातल्या क्राफ़्टवरची हुकूमत साहित्याच्या विद्यार्थ्याला, नाटक लिहिणा-यासाठी शिकण्य़ासारखी असते. तुम्ही केलेली रुपांतरे तुमच्याकडे असलेलेले संस्कृती आणि भाषा-भान दर्शवित असतात.

१३ नोव्हेंबर १८५५ रोजी सांगलीजवळ हरिपूरसारख्या समृध्द सांस्कृतिक भूमीत जन्मलात आणि तिथे वाढत असतानाच हरितालिका, मंगळागौरीसाठी गाणी लिहून दिली. तिथेच तुम्हाला लिखाणाची आवड लागली असावी. किर्लोस्करांच्या कंपनीत काम केलत. किर्लोस्करांच्या मृत्युनंतर त्यांना गुरुस्थानी मानुन लेखनाचा वसा घेतला. मृच्छकटिकचे भाषांतर करुन १८८७ मधे रंगभूमीवर आणले. महादेवराव कोल्हटकरांच्या ऑथेल्लो मधे भूमिका केली. तुम्ही कोल्हटकरांच्या ऑथेल्लोचा झुंझारराव करुन नाटकाची रंगावृत्ती तयार केली आणि ती प्रकाशित केली. आजकाल, जगभरात परफ़ॉर्मन्स स्क्रिप्ट किंवा रंगावृत्ती हा प्रकार रंगभूमी-अभ्यासात संशोधनाच्या दृष्टीने परवलीचा बनला आहे. त्याचा विचार तुम्ही शंभर वर्षापूर्वी केला होता हे महत्वाचे. पुढे, इंग्रजी नाटकाचे फ़ाल्गुनराव हे रुपांतर तुम्ही केले ते नंतर संशयकल्लोळ नावाने प्रसिध्द आहे. फ़क्त नाट्यक्षेत्रातच तुम्ही थांबला नाहीत तर श्रीनिवास भिकाजी देसाई यांच्या बरोबरीने ‘कादंबरीकलाप’ नावाचे मासिक सुरु केले. सुरस कथा आणि कादंब-या यांची भाषांतरे छापण्याच्या उद्देशाने काढलेल्या या मासिकात रेनॉल्डचे मिस्टरीज ऑफ़ लंडन या पुस्तकाचे मराठी भाषांतर द्यायला तुम्ही सुरुवात केली पण ते पुढे बंद पडले. पुणे वैभव या वृत्तपत्रात “गरीब रयतेचे काळ” हा ब्रिटीश सरकारच्या धोरणांवर टीका करणारा लेख लिहून तुम्ही सरकारचा रोष ओढवून घेतला.

तुमच्या काळाला सूवर्णकाळ म्हणतात ते उगीच नाही. भारतातल्या सरंजामी व्यवस्थेने कलाकार आणि त्याच्या कलेला जगवलं, प्रोत्साहन दिलं. बडोद्याचे गायकवाड, इंदोरचे होळकर आणि कोल्हापूरचे राजर्षि शाहू छत्रपती यांचा तुमच्यासारख्यां नाटकवाल्यांवर विशेष लोभ. तुमचे मृच्छकटिक हे आमच्या कोल्हापूरच्या महाराजांचे आवडतं नाटक. नटश्रेष्ठ भाऊराव कोल्हटकरांची चारुदत्ताची पदे ऐकण्यात महाराज दंग होऊन जात. मृच्छकटिक मधील सातव्या अंकातंतील ‘बाळा घालोनिया गळा’ हे पद ऐकतांना महाराजांच्या डोळ्यातुन अश्रु येत असत असं मी वाचलय. आमच्या खुद्द राजाचे तुम्ही काही दिवस शिक्षक होतात हे ही मी वाचलय.

तुम्ही नाटक करत होता तेंव्हा मराठीत नवनवीन नाटके येत होती. नव्या-जुन्या नाट्यसंस्था नाटके उभी करत होत्या. पण, ‘दिग्दर्शन’ हे नाट्यकलेचे महत्वाचे अंग अद्याप आस्तित्वात आले नव्हते. त्याकाळी, तुम्ही ‘तालीम-मास्तर’ म्हणून काम केलं. नटांना ‘भाषण चांगले करायला’ शिकवलत. नवसुशिक्षित वर्ग नाटक पाहायला येऊ लागला तसं रंगमंचावरील भावप्रकटन आणि व्यक्तित्वदर्शन या दोन महत्वाच्या अभिनय-घटकामधे कंपनी नाटकांना सक्षम करण्याचे काम तुमच्या हातुन झाले.

मास्तर, तुमच्या निधनानंतर शंभर वर्षांनी ‘फ़ुल-टाईम’ नाटक करणे हा शब्द प्रयोग वापरात येईल असे तुम्हाला वाटलं नसेल. खरं सांगायचं तर, आज ‘फ़ुल-टाईम नाटक’ क्वचित कुणी करतो. ‘फ़ुल-टाईम नाटक’ करणारे सिनेमे, सिरियल्स आणि बाकीचे नाना प्रोजेक्टस करत नाटक करत असतात. पण, तुम्ही ‘फ़ुल-टाईम नाटक’ केलं. नाटकाने तुम्हाला पैसा दिला आणि प्रसिध्दी दिली. तुमच्या ‘संगीत शारदे’चे हक्क तुम्ही कुठल्या नाट्यसंस्थेपुरते सीमीत ठेवले नाहीत. प्रयोगांच्या रॉयल्टीतुन, पुस्तकांच्या हक्कातुन तुम्ही समृध्दीने जगला.
 

आता तर तुम्ही जाऊन १०० वर्षे झाली. शेक्सपिअरच्या मृत्युला शंभर वर्षे झाली तेंव्हा सॅम्युएल जॉन्सन वैगरे थोर-थोर लेखकांनी शेक्सपिअरच्या नाटकांच्या जोरदार प्रस्तावना लिहिलेल्या नव्या आवृत्त्या काढल्या. शेक्सपिअरला मरुन दोन महिन्यापुर्वी ४०० वर्षे झाली. आहे. जगभरात त्याचं चारशेवं स्मृतीवर्षाची धूम उडालीय. कितीएक भाषा शेक्स्पपिअरला घेऊन उत्सव करतायत, नव-नवीन ग्रंथ प्रकाशित करतायेत. नाटके सादर करतायेत. तुम्ही तिथुन पाहात असालच तुमच्या मृत्यूच्या शंभराव्या वर्षी इकडे शुकशूकाट आहे. इकडंच्या शिरस्त्याप्रमाणे आपल्या पूर्वसूरींचं थोरपण वैगरे काही लक्षात ठेवायला आम्हाला आवडत नाही. लक्षात ठेवलच तर थोरपणाच्या नावाने एखादा पुरस्कार किंवा पुतळयाला नाहीतर फ़ोटोला हार. मग, पेपरात एखादी बातमी.

पण, जाऊदे, स्मृतीवर्षाच्या औपचारिकतेत नको अडकायला.

भरत नाट्य मंदिरचे नाट्यकलाकार तुमच्या ‘शारदे’चे प्रय़ोग करत असतात. ज्या ‘नाटक कंपनी’ ने ‘सिंधू, सुधाकर, रम आणि इतर’ नाटक केले त्याच संस्थेचा तरुण दिग्दर्शक, निपुण धर्माधिकारी तुमच्या संशयकल्लोळचे राहुल देशपांडेंबरोबर प्रयोग करतोय. नाटक जोरदार हाऊसफ़ुल्ल होतेय. शिवाय, महाराष्ट्रातल्या गावागावातुन तुमची ‘शारदा’ गात असतेच. बरं, नाटक केलं नाही झालं तरी ‘शारदा’ इथे आमच्या सर्वांच्या मधोमध उभी राहुन जागल्याचे काम करते. शंभर एक वर्षानंतरसुध्दा “काय पुरुष चळले बाई।ताळ मुळी उरलां नाही” असं गायला सारखी कारणं मिळतात. कारण, पुरुषीपण. बहुतेक, तुमचे नाटक विसरूनच द्यायचं नाही असं ठरवलय इथल्या बापय-व्यवस्थेनं.

एकूणच काय, देवलमास्तर, तुम्हाला विसरणं सहज शक्य नाही.

तुमचा

आशुतोष पोतदार

Comments