नाटकाच्या जमिनीचा अभ्यास


समीक्षकी थाटाचं नसलेलं, लालित्यपूर्ण असं जे काही लिखाण असतं त्याकडे मांडणी म्हणून गांभीर्यानं पाहिलं  जात नाही. समीक्षणाला जसा 'क्रिटिकल डिस्कोर्स' मध्ये वाटा मिळतो तसा लालित्यपूर्णतेने आणि गंभीरपणे लिहिलेल्या लेखनाला मिळत नाही असे आपल्याला दिसते. यामागची कारणे वेगवेगळी असू शकतात.  अकॅडेमिक क्षेत्रात अशा लेखनाला मान्यता नसते. त्याचबरोबर, असे लेखन 'व्यक्तिगत' स्वरूपाचे मानले गेल्याने अभ्यासक्रमात अशा पुस्तकांची दखल घेतली जात नाही. शिवाय, पुस्तकांच्या बाजारपेठेत अशा पुस्तकांना कुठे बसवायचे याबद्दलही एकवाक्यता नसते. आणि मग ती बाजूला पडतात. 

पण लालित्यपूर्णतेने लिहिलेल्या पुस्तकात अभ्यासाची बैठक नसते असे म्हणणे योग्य ठरणार नाही.'मला काही काही सांगायचे आहे' या भावनिक गरजेतून लिहिली गेलेली,सहज समजू शकेल अशा भाषेतील पुस्तके कष्टपुर्वक अभ्यासातून साध्य झालेली असतात हे आपल्याला नाकारता येणार नाही. वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथाची यादी असलेल्या पुस्तकात दिसू येणारी 'सैद्धांतिक' चौकट लालित्यपूर्ण रीतीने लिहिलेल्या ग्रंथात ठळकपणे, आखीव-रेखीव नसली तरी ती नसतेच असे आपण म्हणू शकणार नाही. डोळे उघडे ठेऊन स्वतःचा शोध घेणारा कलाकार काही मांडत असेल तर त्यांचे आकलन आपण अभ्यासू नजरेतून करून घेणार नसू तर सजग वाचक/अभ्यासक म्हणून आपली दृष्टी अपुरी पडते असे म्हणावे लागेल. अर्थात मी हे लिहितोय ते उत्तम पुस्तकाबद्दल आणि त्यातल्या विचारपूर्वक मांडणीबद्दल लिहितोय. भाषा-निवड आणि शैलीच्या आधारे आपण एखाद्या 'अभ्यास'पूर्ण नाही असे आपण म्हणू शकणार नाही. व्यक्तिगत प्रतिसाद म्हणून लिहिलेले पुस्तक 'स्कॉलरली' मानले जात नाही पण इथून तिथून गोळा करून 'करियर' साठी लिहिलेले पुस्तक आपण अभ्यासपूर्ण मानले जाते. मराठीपुरते बोलायचे तर चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस, दुर्गा खोटे किंवा अलीकडच्या काळात गिरीश कर्नाड, महेश एलकुंचवार, विजयाबाई मेहता, सतीश आळेकर, अतुल पेठे अशा कलाकार म्हणून मान्यता असणाऱ्यांनी केलेले लेखन वेगवेगळ्या भूमिकांतून आणि साहित्यप्रकारात लिहिले असले तरी अकॅडेमिक स्तरावरही महत्वाचे ठरू शकते. अर्थात, अकॅडेमिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी तेवढी व्यापक आणि इमॅजिनेटिव्ह भूमिका घेतली आणि अभ्यास-साधनांचा खुबीने वापर करून नवीन पद्धतींचा विचार केला तर हे शक्य आहे.

समीक्षकी थाटाचे नसलेले आणि ओघवत्या भाषेत लिहिलेले रवींद्र दामोदर लाखे यांचे नाटक: एक मुक्त चिंतन (ग्रंथाली प्रकाशन, २०२०) हे पुस्तक अलीकडे मी वाचले. 

इमॅजिन करतो की हे पुस्तक मराठी साहित्य आणि नाटकाचे संशोधन करणाऱ्या अभ्यासक-प्राध्यापकाने लिहिले असते तर कसे झाले असते. मला खालीलप्रमाणे वाटते:

१. भाषा अकॅडेमिक - स्टॅंडर्ड मराठी - असती. त्याप्रमाणे वाक्यरचना, शब्दनिवड इत्यादी ठरले असते, 

२. प्रकरणांच्या स्वरूपात मांडणी असती आणि त्याप्रमाणे सुरुवात, मध्य आणि शेवट अशी एकरेषीय रचना,  

३. वेगवेगळ्या फूटनोट्स आणि संदर्भांचा वापर,

४. 'अभ्यासू' शीर्षक,

५. दुय्यम दर्जाचा अभ्यास असेल तर 'कॉपी-पेस्ट' केलेले 'मटेरियल'.

यातले काहीही रवींद्र लाखेंच्या पुस्तकात आपल्याला दिसत नाही आणि तरीही ते अभ्यासपूर्ण आहे. 

पुस्तकाच्या अखेरच्या पानावर, 'समापना'त लिहिल्याप्रमाणे, हे पुस्तक "नाटकाच्या निर्मिती प्रक्रियेतून, सर्जनप्रक्रियेतून..मिळालेल्या काही कलात्मक मूल्यांची मांडणी केलेले" आहे. प्रस्तावनेत 'नाट्यप्रेमी' हे पुस्तक वाचतील अशी अपेक्षा करत नाटकाच्या संबधातलाच वाचक गृहीत धरला आहे. अर्थात, असे ना म्हणता लाखेंना आपला वाचकवर्ग अधिक विस्तृत ठेवता आला असता. आजच्या जमान्यात नाटकवाला आणि विचारी माणूस नाटक आणि नाटकाची निर्मिती याकडे उघड्या डोळ्याने आणि तरलतेने कसा पाहतो हे समजून घेण्यासाठी रवींद्र लाखेंचे नाटक: एक मुक्त चिंतन हे पुस्तक सर्वानी वाचावे असे मला वाटते.

मराठी नाटक, मुख्यत्वेकरून, प्रयोगशील आणि अव्यावसायिक नाटक माहिती असणाऱ्यांना परिचयाचे असणाऱ्या  लाखेंनी जवळपास २५ नाटके आणि ३० एक एकांकिका दिग्दर्शित केल्या आहेत याची कल्पना आहे. त्याचबरोबरीने, त्यांच्या तीन प्रकाशित काव्यसंग्रहाद्वारे कवी म्हणूनही मराठी वाचकाला परिचित आहेत. विविध पुरस्कार मिळविलेल्या  लाखेंना त्यांच्या पिढीतील तसेच नंतरच्या काळातील तरुण रंगकर्मींकडून प्रेम आणि आदर मिळत असतो.   त्यांना मिळणारे प्रेम आणि आणि आदर त्यांच्या आपुलकीपूर्ण वागणुकीमुळे असते तसेच त्यांच्या लेखनातील आणि नाट्यप्रयोगातील नावीन्यपूर्णतेमुळे असते. नाटक: एक मुक्त चिंतन हे पुस्तकही त्याला अपवाद नाही.  सतीश भावसार यांच्या विचारपूर्ण दृष्टीतून आणि मांडणीतून आकारलेल्या मुखपृष्ठातून नाटकातील काळ, अवकाश आणि भारतीय ते पाश्चात्य रंगभूमीबद्दलचे भान दिसून येते. विविधांगी 'मुक्त चिंतनाचा' आरसा असल्याप्रमाणे समोर येणारे मुखपृष्ठ अवाजवी वाटत नाही. भरतमुनींपासून, स्तानिस्लावस्की, काल्व्हिनो ते चं प्र देशपांडे, श्याम मनोहर वैगरे नाटककारांची नाटके दिग्दर्शित करताना  आलेल्या 'स्थानिक' नाट्यानुभवापर्यंत मुक्त मांडणी या पुस्तकात जागोजागी दिसते. माणूस आणि कला, नाटकाची भाषा आणि मांडणी, आतली आणि बाहेरची लय, जाणिवा आणि नेणिवा, साधना आणि प्रयोग, कथावस्तू आणि सादरीकरण, वाचिक आणि कायिक, अधले मधले अवकाश आणि मंचीयकरण, नटाचे शरीर आणि मन, नाटकीय तत्व आणि कृती असे वेगवेगळे मुद्दे ते पुस्तकातील लेखनातून समोर येतात. स्वतःच्या अनुभवातून सुरु करून  नाटकाच्या उत्पत्ती, उत्क्रांती आणि निर्मितीचा प्रवास ओघवत्या आणि संवादी भाषेतून आपले विचार मांडत रवींद्र लाखे 'दिग्दर्शकाचे मॅन्युअल' सादर करतात.  

पुस्तकासाठी योजलेले रूपही ताजे आणि नवे आहे. यातील प्रत्येक पानावर - डाव्या बाजूला - वेगवेगळ्या संकल्पना आणि विचारांच्या नोंदी ठेवल्या आहेत. वाचन-प्रयोग म्हणून आपण नोंदींचा पाठपुरावा करत आपल्याला हवा तो विचार आणि त्याबद्दल लेखकाचे चिंतन वाचू शकतो. 

नाटक: एक मुक्त चिंतन या पुस्तकातील विचार लाखेंच्या व्यक्ती म्हणून चिंतनातून आलेले आहेत तसेच त्यांच्या दिग्दर्शकीय कार्यातूनही आलेले आहे. या अर्थाने, विचार आणि कृती यांची सांगड घालत ते आपली मांडणी करताना दिसतात. एका बाजूला, माणसाच्या मनाच्या खोल तळाचा अदमास घेण्याची सर्जनशील धडपड आणि दुसऱ्या बाजूला, रंगमंचीय साधनांच्या साहाय्याने धडपडीचे कृतिशील रूप पाहण्याची इच्छा या प्रवासाचे दर्शन या पुस्तकातून आपल्याला होते.  इथे, त्यांच्यातला दिग्दर्शक दिसतो तसा कवीही दिसतो आणि वाचकही दिसतो. 

एके ठिकाणी ते लिहितात:

"रंगभूमीवरचा काळ हा प्रत्यक्ष काळापेक्षा वेगळा असतो. तो रंगभूमीवर घडत असलेल्या नाटकाचा असतो. काळाच्या बंधनातून सुटलेले असे कित्येक क्षण रंगभूमीचा स्वायत्त काळ रंगकर्मीला आणि प्रेक्षकाला देत असतो. अर्थात रंगभूमीची स्वायतत्ता सशरण  दोघांनी स्वीकारली असेल तर. अधिक खोलात घेल्यास रंगभूमीची स्वायतत्ता सिद्ध करणाऱ्या अजून काही वाटा सापडू शकतील." (१२१, नाटक: एक मुक्त चिंतन)

अशी मांडणी वाचताना छान वाटते आणि पुढे काय लिहिले आहे याबद्दलची उत्सुकता वाढवते. असे लिहिणारा माणूस खोलवर जाऊन विचार करतो हेही जाणवत राहते. अर्थात, जेंव्हा एखादा माणूस विचार करत असतो तेंव्हा त्याला, साहजिकच, फाटेही फुटत जातात. मुद्द्याची उकल करत विवेचन पुढे नाही सरकले तर ते विस्कळीत होण्याचा धोका असतो. लाखेंचे लिखाण असे धोके जाणवू देत नाहीत. 

पण, याचा अर्थ, लाखेंच्या मांडणीत अपुरेपण नाही असे म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ, स्वायत्तत्तेचा मुद्दा - जो लाखे प्रामुख्याने रंगमंचीय अवकाशात मांडतात. रंगमंचीय अवकाश म्हणजे निव्वळ नाटक, नट, दिग्दर्शक आणि रंगस्थळावरचा अवकाश एवढे ते गृहीत धरून चालताना दिसतात. खरंय की ते म्हणतात : "खरेपणा अथांग आहे" किंवा रंगभूमीसारख्या कलेला ते "शेतजमीन" म्हणून उद्देशतात. पण अशावेळी, स्वायतत्ता हे कलारूपाच्या 'संहिते'त ते शोधताना दिसतात. 

सादरीकरणाच्या कलेतील स्वायत्तता कलाकाराच्या आतंरिकतेतून बाह्य अवकाशात - जो संस्कृती/समाज सापेक्ष असतो- शोधावी लागणार हा मुद्दा त्यांच्या मांडणीत येताना दिसत नाही.  याचा अर्थ, अशी मांडणी करताना कला 'सामाजिक' ठरते वा तशी ती ठरवावी लागणार असे मला वाटत नाही. पण, स्वायत्ततेचे पदर शेतजमीन आणि त्या जमिनीच्या बाहेर असणाऱ्या अवकाशात व त्या अवकाशाशी असणाऱ्या जटिल नात्यातही उलगडावे लागणार असे माझे मत आहे.  इथे, आध्यात्मिक आणि सामाजिक, सौंदर्यतत्त्व आणि समाजदर्शन अशी ढोबळ विभागणी करून सुलभीकरण करता येणार नाही. तर, त्या रंगभूमीच्या आयताकृती अवकाशाच्या पलीकडे सृष्टीकडे खरेच पाहावे लागणार. अर्थात, लाखे त्याचा निर्देश करतात पण त्याकडे  खोलवर, अवकाशाच्या व्यापक संदर्भात पाहात नाहीत. 

एखाद्या कलाकाराचे चिंतन आपण वाचतो त्यावेळेस त्याला पडलेल्या पेचांना तो कसा समोर जातो हे कळते. लाखेंच्या बाबतीत, संहिता ते सादरीकरण या प्रवासाचा त्यांना पडलेले तात्विक आणि व्यावहारिक पेच मांडताना दिसतात.  दिग्दर्शक म्हणून झालेल्या अभ्यासातून आणि चिंतनातून जाणवलेली आव्हाने ते आपल्यासमोर मांडतात आणि त्या आव्हानांना ते स्वतः कसे सामोरे गेले हे मांडण्याचा प्रयत्न करतात. पण, विवेचनाला वैचारिक अधिष्ठान देताना उदाहरणे येत नाहीत. उदाहरणार्थ, त्यांनी नोंदवलेले एक महत्वाचे निरीक्षण पुढीलप्रमाणे येते:

"या पार्श्वभूमीवर असं म्हणता येईल की नाटकाची संहिता लिखित असण्याची गरज नाही आणि ती लिखित असली तरी लिखित न समजण्याची पराकोटीची गरज आहे. लिखित संहिता विसरता आली तरच वाणी गवसते, नाहीतर नट भाषेत किंवा इथे आपण म्हणू की वाचेत अडकून बसतो." (१९, नाटक: एक मुक्त चिंतन.)

इथे मुद्दे आकर्षक आहेत. पण, यासाठी त्यांच्या मनात कोणती नाटके आहेत हे लक्षात येत नाही. "नाटकाची संहिता लिखित असण्याची गरज नाही" असे म्हणताना मराठी नाटक त्यांच्या समोर नसावे असे वाटते. कारण, बिन-संहितेचे नाटक करण्याची आपल्याकडे किती प्रथा आहे याबद्दल मी साशंक आहे. पुढे जाऊन, "लिखित संहिता विसरता आली तरच वाणी गवसते" हे वाचायला छान वाटते पण असा "वाणी गवसून" घेणारा कोणता नट वा प्रयोग त्यांच्या मनात आहे हे कळत नाही. इथे, ते पाहिलेल्या नाटकांबद्दल, दिग्दर्शकांबद्दल, नटांबद्दल ते बोलू शकले असते. विशेषतः, त्यांच्या आजूबाजूचे नाटक, नाट्यविचार आणि नाट्यतत्व काय आहे याबद्दलची चर्चा करू शकले असते. 

नाटक आणि नाट्यतत्वांविषयीचे लेखन कमी- कमी होत चालले आहे. यासाठी, इथली प्रकाशन व्यवस्था, शिक्षणव्यवस्था जितकी जबाबदार आहे तितकेच नाट्यकर्मीही जबाबदार आहेत. बहुतेक जणांना, नाटक म्हणजे एक किंवा अनेक प्रयोगापुरती मर्यादित बाब वाटते. संहिता समोर ठेऊन प्रेक्षकांना थिएटरकडे आणण्यासाठी जे-जे करता येईल ते करण्याच्या आटोकाट प्रयत्नात नाटकातल्या तत्वाकडे, विचाराकडे आणि कृतीकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती कमी असल्याचे आपल्याला दिसते. सोशल मीडियाच्या 'लाईक्स' च्या हिंदोळ्यावर झोके घेताना नाटक आणि समाज, सजीवता, निसर्गदत्त, जीवनानुभव, अध्यात्म, काळ, अवकाश, रंगमंच, साधना, अभ्यास, सात्विक, भाषा, डिझाईन हे शब्द आणि नातेसंबंध ऐकू येईनासे झाले आहेत.  "प्रत्येक कला", लाखे लिहितात त्याप्रमाणे, "ही शेतजमीन आहे. तिचा वापर शेतीसाठी करायचा सोडून स्वतःचे इमले बांधण्यासाठी केला जातो आहे. त्यामुळे ती नापीक/एनए होत चालली आहे." (१२५, नाटक: एक मुक्त चिंतन) या पार्श्वभूमीवर, नाटक : एक मुक्त चिंतन  हे पुस्तक आणि त्याचे वाचन  नाटकाच्या जमिनीवर प्रयोग करण्यासाठी आणि तिचा अभ्यास करून ती अधिक सुपीक करण्यासाठी मदतीचे ठरेल. 

Comments