'खेळ खेळत राहतो उंबरा' विषयी सुचेता खल्लाळ -
खेळ खेळत राहतो उंबरा : बहुआयामी,उत्क्रांत काव्यरचना
कलेच्या एकाहून अधिक प्रांतात स्वैर मुशाफिरी करणाऱ्या बहुआयामी कलावंताची 'कविता' कशी असू शकेल, या प्रश्नाचं उत्तर असंच असू शकेल, की ती 'आशुतोष पोतदार यांच्या' कवितेसारखी असेल!
'हाकारा'चे संपादकीय लेख आणि इथेतिथे सुट्यासुट्या वाचण्यात आलेल्या कविता वाचून ही कविता एकत्र संग्रहाच्या स्वरूपात वाचायची उत्कंठा होतीच, 'खेळ खेळत राहतो उंबरा' च्या निमित्ताने तो आनंद मिळवता आला !
खरंतर या कविता वाचणं हा एका अर्थाने लिहिता कवी (कवयित्री!) म्हणून कवितेच्या नव्या उत्क्रांत रचनेचा अभ्यास करणं, असंही म्हणता येईल. सबंध संग्रह वाचून झाल्यानंतर सकृतदर्शनी असे म्हणता येईल की आशुतोष पोतदार यांची कविता ही दरवेळी एका नव्या दृश्यात्म संघटनेची घटनावली रचत जाते ! ही दृश्यात्मकता बहुतांशवेळा अमूर्त पातळीवर काहीएक घडामोडी घडताना उमटलेली असावी. अशी अमूर्तता चित्रात रेखणे जितके गूढ असू शकले असते, अथवा एखाद्या नाट्य-संहितेत दिग्दर्शित करणे जितके अनेकार्थी असू शकले असते तितकेच ते कवितेत चितारणेही असते - कवीच्या आणि वाचकाच्या पातळीवरही! अशाच अमूर्ततेचा अनुभव सबंध संग्रहातून गूढ, अनेकार्थी, व्यामिश्र स्वरूपात सबकाॅन्शसच्या पातळीवर येत राहतो.
खरंतर ही कविता नेणिवेच्या पातळीवर कसलेतरी धुसर बांधकाम चढवत नेते, ज्याच्या नेमक्या नकाशाची आपल्याला कल्पनाही नसते असे अनाकलनीय बांधकाम. ते पेलवणे ही एक वाचक म्हणून मोठीच कसरत.
समजा ते धुसर बांधकाम कविता नाहीय, नाटकाची संहिता आहे, तर ते कसे असेल ? तर ते 'ढेकूण रात्री' कवितेसारखे असेल. मोठीच मजेशीर गोष्टंय ही. पण तरी 'ढेकूण रात्री' ही काही नाटकाची संहिता नसते, तर ती कविताच असते!
समजा ते अंधूक बांधकाम कविता नाहीय, एक अमूर्त चित्रंय, तर ते कसे असेल ? तर ते ' हे घर' कवितेसारखे असेल ! तरीही 'हे घर' चित्र नाहीय, ती आहे एक कविताच.
'लोंबकळणारा रविवार', 'अ फ्रोजन नाईट', 'अ नॅप इन अ टाॅयलेट', 'मेलेला, त्याचे आत्मकथन' ही सगळी अशीच फसवी धुसर बांधकामं !
त्यातच या कवितेचं वेगळेपण अधोरेखित होतं.
एखाद्या दृश्यकलाशास्त्र शाखेच्या अभ्यासकाची कविता कशी असेल तर ती ' मेटॅमाॅरफाॅसिस' सारखी असू शकेल ! 'तुम्ही इथे आहात' सारखी कविता एकाचवेळी मिथकांच्या परिप्रेक्ष्यात पाहता येईल तसंच ती भरकटलेल्या भौतिकवादी उत्क्रांतीचं अपत्य म्हणूनही अभ्यासता येईल.
लोकपरंपरेच्या प्रशस्त पायावर उभारलेली दुर्मीळ अशी महानगरीय जंजाळाची स्वतंत्र प्रतिमाव्यवस्था आशुतोष पोतदार यांच्या कवितेत जागोजागी पाहायला मिळते.
'तू लिहितोस अक्षरे तेव्हा समुद्रमंथनाची चाहूल लागते तू पुसतोस अक्षरे तेव्हा भूमिगत सीता रामायण रिवाईंड करते'
ही 'माय कर्ली बाॅय' नावाची चार ओळींची कविता. मिथकीय प्रतिमांचे सांकेतिकरण करून वर्तमानकालीन वास्तवाची उकल एवढ्या अल्प अवकाशात करणे ही फक्त काव्यजाणिवेची प्रगल्भता नसते, तर समकाळाचा गुंता उकल करून सोडवू पाहण्याचे मोठे कसबही असते.
खरंतर आशुतोष पोतदार यांच्या सगळ्याच कविता बहुआयामी आहेत. रचनेच्या अंगाने एक कविता दुसरीसारखी आहे असं नाही घडत सबंध संग्रहात. प्रत्येक कवितेच्या रचनेची धाटणी एक वेगळा प्रयोग आहे असं जाणवतं.
उदाहरणादाखल, 'ढेकूण रात्री' कवितेचे तीन काल-अवकाश बघता येतील.
'अ कविता ऑन कुजके दिवस' मधे तर खूपच वेगळा रचनाबंध वापरला आहे. या एका कवितेवरच खरंतर खूप दीर्घ असं विवेचन करता येऊ शकेल. कारण ही कविता आशय, भाषा, रचनाबंध, विचार-प्रक्षेपण या प्रत्येक अवकाशात काहीतरी वेगळं मांडताना दिसते. एकाच वेळी ती बौद्धिकतेच्या आणि अमूर्ततेच्या पातळीवर वेगळीच उंची गाठताना दिसते.
'मामी आजी', 'नक्षत्र', 'पन्हाळा', 'स्थळ: कॅफे काॅफी डे' अशा कविता ती ती व्यक्तिचित्रे, प्रसंग, घटना एकाचवेळी कवितेच्या, नाट्यसंहितेच्या, दृश्यात्मतेच्या पातळीवर शब्दात कोरलेल्या अब्स्ट्रॅक्ट चित्राचा अनुभव देतात ; पण त्या असतात मात्र कविताच ! आणि हीच या कवितेची कमाल आहे !
मराठी कवितेचा एक नवा प्रयोग म्हणून आशुतोष पोतदार यांची कविता या सगळ्या आयामांना नीटपणे लक्षात घेत समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
ज्यांनी आपल्या अनेकांगी कलासक्त जाणिवांनी मराठी काव्याच्या वाटा प्रशस्त आणि प्रगल्भ केल्या त्या अरुण कोल्हटकर, दिलीप चित्रे यांच्या परंपरेशी नातं सांगणारी आणि नव्या दृश्यात्म काव्य-परिमाणांची भाषा बोलणारी ही कविता म्हणूनच महत्त्वाची आणि वेगळी अशी म्हणता येईल.
ही कविता रचनेच्या पातळीवर नवे बांधकाम उभारतेच, शिवाय समकाळ संभ्रमित आणि दहशतीचा करणाऱ्या, या आणि त्या गावातल्या बागांची नासधूस करणाऱ्या मर्जीतल्या बड्या माश्यांची, भयग्रस्त करणाऱ्या राक्षसाच्या धमकीचीही जोखीम उचलून धीर न सोडता शांततेची प्रार्थना करायलाही सांगते. तेव्हा ही कविता वारंवार आत्यंतिक भौतिकवादाचे क्षुद्रत्व सिद्ध करत भांडवलदारांची बेबंद हुकूमशाही धुडकावण्याचे आवाहन जनमाणसाला करते. स्वतःच्याच जगण्याच्या प्रश्नात गुरफटलेला टोकाचा व्यक्तिवादी झगमगाट 'नर्मदेची डियर मेधा' ला आठवतो, पण 'मिस' करत नाही हे उपरोधिक सत्य दाखवताना वक्रोक्तीची भाषा वापरताना दिसते. 'अनंताच्या बिंदूवर थांबला असेल तो शब्द, उल्कापाताच्या प्रतीक्षेत' तो शब्द, ती भाषा उच्चारण्याचे आवाहन करणारी ही कविता हरवलेलं काही मौलिक संचित हुडकू पाहते पुन्हा पुन्हा...
जगण्याच्या राक्षसी गतीत जागच्या जागी थबकून असलेला उंबरा, त्याच्या अंगावरून कायकाय सरकत जातं आपल्याच लगबगीत, आणि तो वाट पाहत असतो कोणत्यातरी नव्या दिवसांच्या किरणांची...
मानसिक, बौद्धिक, भावनिक पातळीवर जाणिवांना-नेणिवांना अमूर्त कसरत करायला लावणारी ही कविता मनस्वी आवडली !
'हाकारा' चे संपादक म्हणूनही मराठी वाङ्ममयव्यवहारात दरवेळी नवनवे विषय हाताळत विस्मयकारी लेखनप्रयोग अनुभवायला देणारी ही कलासक्त टीम मराठी साहित्यातही हाकाराच्या रूपानं क्षितिजं रुंदावताना दिसते.
शुभेच्छांसह...
- सुचिता खल्लाळ
Comments