'खेळ खेळतो उंबरा' विषयी अरुण ठोके, १२ जून २०२१

 


मेलेला, त्याचे आत्मकथन: आशुतोष पोतदार

प्रस्तुत कवितेत एका मरण पावलेल्या बांधकाम मजुराची गोष्ट आहे.ती गोष्ट त्याच्या आत्मकथनातून साकारलेली आहे. छोट्या नगरांचे मोठ्या शहरांत व शहरांचे मोठ्या महानगरांत रुपांतर होतांना ग्रामीण भारतातील छोट्या गावांतील अनेक तरुण रोजगाराच्या शोधार्थात महानगरांत येतात. या महानगरांतील विशाल रस्ते, मोठ्या इमारतींचे टॉवर्स, महानगरांत निर्माण करावयाचे बगीचे अशा विविध प्रकारच्या बांधकामांसाठी या तरुणांनी आपला घाम व रक्त आटवलेले असते. त्यांना दिलेल्या अल्प मजुरीतच त्यांनी कृतार्थ राहणे, अशी व्यवस्थेची अपेक्षा असते. या मजुरांचे शहरांतील अस्तित्व हे उपलब्ध असलेल्या कामावर अवलंबून असते. एका ठिकाणचे बांधकाम पुर्ण झाले की त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेले जाते. महानगरांतील माणसे त्यांना सतत उपरे मानत असतात. हे तरुण गावाला दुरावलेले असतात व महानगरातही आपण परागंदा असल्याचा अनुभव पदोपदी घेत असतात. अशाच एका बांधकाम मजुराचे कामाच्या ठिकाणी निधन झाल्यावर निर्माण झालेल्या स्थितीचे त्याच्याच नजरेतून केलेले कथन म्हणजे ही संहिता होय. विशेष म्हणजे महानगरात आलेल्या अशा बांधकाम मजुरांची कोणतीही अधिकृत नोंद घेणारी शासकीय यंत्रणा सक्रीय नसल्याने तो कोण? त्याचे नाव काय? किंवा त्याच्याविषयी कुणालाही फारसे काही जाणून घेण्यात रस नसतो. बांधकाम मजूर हीच एक त्याची ओळख. म्हणून त्याच्या मृत्यूने महानगरातील समाजाला फारसे काही सोयरेसुतक नाही. मेलेला बांधकाम मजूरच कवितेतील ‘मी’ म्हणून जिवंत होऊन स्वतःच्याच मृत्युनंतर आपल्या वर्तमान भूत-भविष्याविषयी बोलत आहे. कवीने हे कथन रचताना निवेदकाकरवी अथवा तटस्थपणे स्वतःच का रचले नाही? असा प्रश्न पडतो. मेलेल्या बांधकाम मजुरालाच का बोलते केले? भारतीय समाजात अशी परंपरा आहे की, ज्या घरी मृत्यू झाला असेल त्या घरातील माणसांना अतीव दुःख झालेले असते. भावनिकदृष्ट्या आधार देण्यासाठी नात्यातील भाऊबंदकीतील, शेजारी व गावातील माणसे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होतात. मृताच्या अंत्यविधीची तयारी भाऊबंद व नातलग करतात. मेलेल्या व्यक्तीच्या चांगल्या स्मृती जागविल्या जातात. त्याच्याविषयी, घडून गेलेल्या घटनेविषयी कुटुंबातील सदस्यांशी अनेकजण बोलतात. त्यामुळे कुटुंबियांना आधार, दिलासा मिळतो. एकटेपणा वाटत नाही. महानगरातील बांधकाम मजुराचे गाव शेकडो किमीवर आंध्र प्रदेशात आहे. त्याचे नातलगही तिकडेच असावेत. तो शहरात मरून पडल्यावर त्याची बायको पुर्णतः एकटी पडलेली आहे. तिला धीर द्यायला कुणीच नाही. महानगरातील बांधकाम मजुराचे माणूस म्हणून असलेले अस्तित्व किती गौण करण्यात आलेले आहे, हे महानगरातील माणसांचे अमानवीपण, त्यांच्या संवेदनहीनतेचा प्रत्यय मेलेल्या बांधकाम मजुराच्या आत्मकथनातून येतो. माणूस मरून पडल्यावर त्याचे कुणालाच काही न वाटणे हे घोर हिंसक वाटावे असे वर्तन महानगरीय समाजाच्या बिघडलेल्या स्वास्थ्याचा निर्देश करते. या कथनातून बांधकाम मजूर आपल्या मृत्यूचा शोक करीत नाही. तर तो स्वतःला जिवंतच समजत असतो.त्यामुळे या कथनातील घटितांतून रंजकता, उपहास व चिंतनशीलता प्रकट होत राहते.
कवितेच्या पुर्वार्धात, कोसळणाऱ्या पावसाचे पाणी, या बांधकाम मजुराच्या निळ्या प्लास्टिकच्या ताडपत्रीच्या झोपडीशेजारील प्रेताच्या अंगावर पडत आहे. या कथनातील ‘निळ्या प्लास्टिकच्या ताडपत्रीचे’ छत हे त्याच्या गरीबीचे, तात्पुरत्या रहिवासाचे, अशाश्वतीचे प्रतीक ठरते. त्याने जिवंतपणी भोगलेल्या वेदनांतून त्याची मुक्ती झाल्याचा मनस्वी आनंद पावसाला झाला आहे म्हणून सुखाचे, आनंदाचे प्रतीक असलेला पाऊस त्याच्या अंगावर येतोय; या मजुराचे कुणीच नाही म्हणून त्याच्या अंगावर पडून त्याच्यावर स्नेह-प्रेम वर्षाव करतोय. या मजुराच्या झोपडीकडे कुणीही येऊन थांबत नाहीये. म्हणून पाऊस ‘रेंगाळलेला’ आहे, असे कथन केलेले आहे.
या ताडपत्रीच्या झोपडीत फुललेल्या संसाराच्या सुखद स्मुतींना तो आळवतो. झोपडीत फिरणाऱ्या चंद्रप्रकाशात ‘गोंदलेय मी माझ्या बयेच अंग’ या ओळीतील ‘अंग गोंदणे’ या प्रतिमेतून शारीर संवादाचे संयत वर्णन करण्यात आलेले आहे. एका बांधकामाच्या साईटवरून दुसरीकडे गेल्याचा संदर्भ धुरकटलेल्या चुली एका ताडपत्रीखालून दुसऱ्या तांबड्या किंवा पिवळ्या ताडपत्रीखाली नेल्याच्या कृतीतून देण्यात आलेला आहे. खूप वेळ लोटून गेल्यावरही त्याचे प्रेत कुणीच न हलवल्याने मला माझ्या घरात हलवा, असे म्हटल्यावर आवाज ऐकूनही ही महानगरातील माणसे न ऐकल्यासारखी करीत आहेत. कारण आपण या गावात बाहेरचे आहोत, ही तुटलेपणाची खंत व्यक्त करण्यात येते. दुपारच्या वेळी जेवणासाठी घरी जात असलेल्या नोकरदारांनी प्रेत पाहिल्यानंतरही भरपेट जेवण केले असेल. त्याच्या नाकात कोंबलेले कापसाचे दोन बोळे बघून त्यांना काहीच वाटले नसेल. कारण महानगरात फुटपाथवरचे मरण जाता-जाता पाहून डोकावण्याची त्यांची सवय त्याला ठाऊक होती. उलट हा माणूस इथेच येऊन कसा मरून पडला? असा विचार करीत या बाहेरच्या लोकांनीच शहराला घाण केल्याचे ते आपल्या मुलांना शिकवतील. त्यांचे स्वीट-चिली टोमॅटो सॉस खाताना स्वतःशीच गुणगुणणे त्यांच्या चंगळखोर वृत्तीचे निदर्शक ठरते. असे असंस्कृत असलेले लोकच स्वतःच्या कॉलनीला सुसंस्कृत समजून, उपऱ्या मजुराने मेल्यावरही आपल्या कॉलनीला सोडले नाही, असे दोषारोप करणार हे त्याला ठाऊक आहे.
महानगरात वास्तव्याला असलेला बांधकाम मजूर कबुतरांशी तादात्मिकरण करून घेतो. महानगरातील माणसांपेक्षा कबुतरांशी त्याचे हृदय नाते होते, याचा प्रत्यय तो कबुतरांना रोज दाणे खायला देत असे, यावरून येतो. त्या कबुतरांना दाणे टाकण्यासाठी हात हलवून बघतो तर ते हालत नाहीत, दात घशात शिरल्यासारखे वाटणे, बोलताही न येणे या वर्णनातून त्याच्या सहृदयतेची जाणीव करून देण्यात आलेली आहे. परिसंस्थेतील छोट्या जीवांकडे-कबुतरांकडे सहानुभूतीने पाहणे, त्यांच्या भुकेचा विचार करणे यातून बांधकाम मजुरात असलेल्या मानवतेचे दर्शन घडते. तर बांधकाम मजुराच्याप्रती वागणाऱ्या सोपिस्टिकेटेड माणसांच्या वागण्यातून, त्यांच्यातील अमानवीपणाचा प्रत्यय येतो.
मजूर स्वतःविषयीची माहिती देताना, तो मागच्याच आठवड्यात आपल्या मूळ गावी फॅमिली फोटो काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्या बायकोच्या मालकिणीने या कृतीवर ‘माजलेत’ असा मनातल्या मनात शेरा दिला असेल, असे तो जाणतो. गोतावळ्यातील सगळ्या लोकांनी त्याची तब्बेत खराब झाल्याचे त्याला सांगितले. यातून त्याच्याप्रती त्याच्या लोकांना असलेले प्रेम व जिव्हाळा व्यक्त होतो. ही त्याच्यासाठी एक सुखद स्मृती आहे. अशीच आणखी एक सुखद स्मृती बांधकामावरच्या मालकाची लहानगी मुलगी खायला देत असलेले खाद्यपदार्थ तो त्याच्या चिमुकल्यांना घरी नेत असे. तिने दिलेला खाऊ चिमुकल्यांना देण्यासाठी त्याने केलेल्या अट्टाहासातून त्याच्यातील पितृहृदयाचे दर्शन घडते.

मालकाने औषधोपचारासाठी पैसे न देता नुसतेच डॉक्टरकडे जायला सांगणे त्याला कळत होते. लाखो- कोट्यावधी रुपये कमावणारे मालक आपल्या नोकराच्या आजाराविषयी उदासीन असणे, त्याला मदत न करणे, उलट त्याच्याकडून बांधकाम मजुरीचे काम करवून घेत राहणे, ही नव्या शोषणव्यवस्थेत रुजलेली वेठबिगारीच आहे ,असे म्हणता येते. या आत्मकथनातून तो स्वतःचेही तटस्थपणे वर्णन करतो. त्याचे दारू पिणे त्याच्या बायकोला खटकत असे. ती तिच्या मालकिणीजवळ याविषयी ओक्साबोक्सी रडत असे. आता त्याच्या मृत्यूमुळे ती रडतेय. आपण रात्री-बेरात्री पिऊन आल्यावर तिला बेदम मारत असल्याचीही तो कबुली देतो. दिवसभराच्या कष्टाच्या वेदना सहन होत नसल्याने मद्यपान करीत असल्याचे तो सांगतो. त्याची बायको मालकिणीप्रमाणे कपाळाबरोबर केसांत कुंकू भरते याचे त्याला अप्रूप वाटते. पोरं उठायच्या आत ती सर्व कामे निपटते, यावरून तिच्या कष्टाळूवृत्तीचा प्रत्यय येतो. तिच्याप्रती असलेले प्रेम त्याच्या मनात दाटून आल्याने तिच्या कपाळाला हात लावून तुझे कुंकू जिवंत असल्याचा तिला दिलासा द्यावा म्हणून तो प्रयत्नही करून पाहतो,परंतु हे स्वप्नच ठरते.

कवितेच्या उत्तरार्धात असे वर्णन करण्यात आलेले आहे की, मजुराच्या मृत्युनंतर त्याच्यासाठी माणसे कुणीच जमत नाहीत. ज्या दोन कबुतरांना तो दाणे खायला घालत असे त्या कबुतरांनी त्याच्याविषयीचे दुःख व्यक्त करण्यासाठी कितीतरी कबुतरांना बोलावून आणले आहे. हे दृश्य बघून कबुतरे घाण करतील म्हणून आजुबाजूचे घरमालक रागावतील असे तो सांगतो. त्याला आजुबाजूच्या माणसांपेक्षा कबुतारांसोबत राहून निष्कपट प्रेम, अहिंसात्मक जाणीवा वृद्धिंगत झाल्याचा प्रत्यय येतो. आपण या पृथ्वीवरील दुःखी-कष्टी जीवनानुभवांपेक्षा अलौकिक सुखाचा अनुभव कबुतरांच्या सान्निध्यात घेतो, ही खास अनुभूती हवेत ‘उडायसारखं वाटतं’ या शब्दांतून व्यक्त करण्यात आलेली आहे. या अनुभवाची तुलना तो मालकाने विमान हवेत वर तरंगत असल्याचे सांगितलेल्या अनुभवाशी करतो. मृत्युनंतर आपण हवेत तरंगलो आहोत, आपल्याला अधांतरी ठेवू नये, जमिनीवर घ्यावे, असे आवाहन तो त्याच्या बायकोला करतो. ‘वर राहून काय करू’ या प्रश्नातून त्याचे जमिनीशी असलेले घट्ट नातेच अधोरेखित होते.

कवितेच्या शेवटी तो आवाहन करतो की, कुणीतरी त्याच्या बायकोची समजूत घालावी. ती दांडगी हिम्मत असलेली स्री आहे. तिने गोतावळ्याला जमा करावे आणि आपले प्रेत मूळ गावाकडे घेऊन जावे. कारण गेल्यावेळी पलीकडील गल्लीतील कुंड्या नावाच्या बांधकाम मजुराला बाहेरगावचा/उपरा मानून स्मशानात जाळायलाच मनाई करण्यात आली होती. आपल्या प्रेताचीही तशीच गत होईल, अशी भीती त्याला वाटते. तिने त्यासाठी काहीही व्यवस्था लावावी तोवर ‘मी लटकत राहतो इथंच वर’ तो असे म्हणतो. इथे कविता संपते. मात्र अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहतात. महानगरांना उभारणारी, त्यांना सुंदर करणारी, वेळ -प्रसंगी त्यातील घाण उपसणारी कष्टकरी माणसे आपले सर्वस्व महानगरासाठी देतात. महानगरासाठी झटताना त्यांच्या श्रमांचा अवमान होतो, ‘माणूस’ म्हणून त्यांना वागवले जात नाही, त्यांच्या शोषणाविषयी कुणालाच काहीच वाटत नाही. निष्ठुर, संवेदनहीन होत- होत महानगरीय माणूस कसा हिंसक बनलेला आहे, याची पोलखोल या कथनातून करण्यात आलेली आहे. झाडे, जंगले नष्ट झाल्याने कबुतरांनी महानगरातील बहुमजली इमारतींत, आपले अस्तित्व टिकवण्यासाठी तडजोड स्वीकारलेली आहे. ते जसे असुरक्षित,उघड्यावर आहेत त्याप्रमाणेच दुष्काळ, नापिकी, बेरोजगारी यासारख्या समस्यांमुळे खेड्यांतील तरुणांनी महानगरांत येऊन आपल्या अस्तित्वासाठी निवडलेला तडजोडीचा पर्याय त्यांच्यासाठी वेदनादायक ठरतो. या वेदनांची ठसठस म्हणजेच हे मेलेल्याचे आत्मकथन होय.
अरुण ठोके, १२ जून २०२१.

Comments