नाट्य़ प्रशिक्षणाचे ‘रिंगण’

भारतातील नाट्य-प्रशिक्षण प्रस्थापित होऊन बराच काळ उलटून गेला आहे. नॅशनल स्कूल ऑफ़ ड्रामाची स्थापना होऊनही आता पन्नास वर्षे होऊन गेली आहेत. नाटक करणा-यांच्या पिढ्या बदलत गेल्या, काळ बदलत गेला तसे नाट्य-प्रशिक्षणची तंत्रे बदलली आणि पध्दतीही बदलल्या आहेत. काय बदल झाले, ऐतिहासिक दृष्ट्या, शैक्षणिक बाबी बदलल्या तसे नाट्य-प्रशिक्षण कसे बदलले याची चिकित्सा करणे हा हेतु इथे नाही. तो माझा अभ्यासाचा विषय नाही. पण, नाट्य-प्रशिक्षण देणारी संस्था तिथे शिकणा-या मुलांच्या नाटकाचे सादरीकरण करते तेंव्हा काही मुद्दे मनात येत राहातात ते मी इथे मांडत आहे.

निमित्त:

तत्वत:, नाट्य-प्रशिक्षणाचा भाग म्हणून सादर केलेले नाटक ‘थिएटर इन मेकिंग’ या प्रक्रियेचा भाग म्हणून पाहिले जाणे महत्वाचे असते. नाट्य-प्रशिक्षणादरम्यान निर्माण केलेल्या प्रयोगाकडे दिग्दर्शिकीय कौशल्य किंवा दिग्दर्शकाची नाटक बसवण्याची स्वप्नपुर्ती वा नटांची स्वतःला रंगमंचावर प्रदर्शित करण्याची इच्छापूर्ती एवढयापुरते पाहाता येणार नाही. त्या प्रशिक्षणामधे नटाला तयार करणे (त्याचा/तिचा आवाज, शारिरीक हालचाली-भाव इत्यादी), नट आणि नाटकिय सामग्री वापरणा-यांचे (प्रकाशयोजनाकार, स्थळरचनाकार वैगरे) नाट्यअवकाशाविषयीचे विद्यार्थ्याचे भान समृध्द करणे या आणि इतर बाबी कशा पार पडल्या आहेत याची चिकित्सा करण्याचे भान विध्यार्थी शिक्षक आणि समाजाला यावे अशी सार्थ अपेक्षा कष्टपूर्वक उभारलेल्या प्रयोगातून असते. अर्थात, असे भान यावे यासाठी नाट्य-प्रशिक्षण देणा-या संस्थेने जाणीवपूर्वक करणे महत्वाचे असते. त्यातून, संस्था शिकत असतात, स्वतःच्या प्रशिक्षण प्रारुपांकडे चिकित्सकतेने पाहातात, वेळोवेळी त्यात बदल करतात. यामुळे, शिक्षण घेणा-या विद्यार्थी नाट्यकलेबद्दल आधिक सजग होऊन शिक्षण घेण्याच्या नव्या शक्यता निर्माण होतात.

पुणे विद्यापीठाच्या ‘ललित कला केंद्रा’च्या विद्यार्थ्यानी बसवलेल्या बर्टोल्ड ब्रेख्तच्या द कॉकेशियन चॉक सर्कल या नाटकाचा मी पाहिलेला प्रयोग सगळे जमून आलेल्या चांगल्या नाट्यकृतीचे प्रदर्शन होते असे  म्हणणार नाही. संहितेच्या भाषांतरापासून त्याच्या सादरिकरणात उणीवा होत्या. त्या उणीवा दाखवणे हा हेतू  या टिपणाचा नाही. इथे, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या नाट्य- प्रशिक्षणाचे ते प्रदर्शन होते याकडे पाहाणे मी महत्वाचे मानतो. त्रेचाळिस विद्यार्थ्यांच्या कामातून उभ्या राहिलेल्या या प्रयोगातून ब्रेख्तियन नाट्यशैलीतील विविध तंत्राच्या वापराचे घेतलेल्या प्रशिक्षणाचे विविध नमुने विद्यार्थ्यांनी सादर केले. द कॉकेशियन चॉक सर्कल च्या मराठी भाषांतराची संहिता विद्यार्थी-कलाकारांनी ब्रेख्तच्या ‘न -परिणामा’चे वेगवेगळे नमुने सादर करत उभी केली. त्यांचे सादरीकरण जाणतेपणाचे होते हे महत्वाचे. ‘विद्यार्थी म्हणून शिकण्याच्या प्रक्रियेतुन आम्ही जातोय त्यामूळे कसलेले नट आणि गायक तुम्हाला इथे दिसणार नाहीत’ याची जाणीव त्यांच्या प्रयोगातून दिसत होती. चुकत असले तरी त्यांच्याकडे आत्मविश्वासाचा अभाव नव्हता. चुका झाल्यातरी, कच्चेपण जाणवत असले तरी ब्रेख्तच्या रंगभुमीचे त्यांचे आकलन मांडण्याचा प्रयत्न मला महत्वाचा वाटतो. तो आत्मविश्वास देण्यासाठी डॉ प्रवीण भोळे, डॉ राजीव नाईक, डॉ हिमांशू स्मार्त अशा त्यांच्या शिक्षकांचे प्रयत्न कारणी आले आहेत हे जाणवत होते.

पाश्चात्य रंगभूमीचा अभ्यासक्रम तयार करताना आणि तो राबवताना मोठा अडथळा असतो तो म्हणजे ज्या सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभुमीवर तिथले कलाकार आणि त्यांचे तंत्र आकाराला येते त्याचे आकलन विद्यार्थ्यांना देणे. अर्थात, यासाठी सैध्दांतिक मांडणीचे अभ्यासक्रम आयोजलेले असतात. पण, सैध्दांतिक अभ्यास आणि नाटकी तंत्राचे आकलन प्रॅक्टिकल्स मधुन मांडताना ब-याच बाबी निसटून जातात. उदाहरणार्थ, रिंगण नाटकासाठी द कॉकेशियन चॉक सर्कलचे भाषांतर करताना निवडलेली भाषा आणि नटांचा ‘वेस्टर्न’ अवतार. अर्थात, ब्रेख्त समजुन घेण्याचा प्रयत्न म्हणून नाटकाचा मुळाबर हुकुम प्रयोग केला हे समजू शकतो. पण, त्यातला शिक्षणाचा भाग कसा आणि कितपत ताकदीने येतो हे समजायला प्रयोग मदत करत नाही. कदाचित, प्रयोगानंतर प्रेक्षकांबरोबर चर्चा झाली असती तर ते समजायला मदत झाली असती. नाटकाविषयी दिलेल्या टिपणात द कॉकेशियन चॉक सर्कल ची नाटकीय संहिता तयार करताना काफ़्काची लघुकथा मिसळली आहे असे दिले आहे. अशा मिसळण्यामागची भुमिका काय? ब्रेख्त आणि काफ़्का असे विचित्र वाटू शकणारे मिश्रण नाट्यप्रशिक्षणाचा कसा काय भाग होऊ शकते? याचे आकलन त्या दिलेल्या टिपणातुन होत नाही. (याच दोन पानी टिपणामधे ब्रेख्त, त्याच्या नाट्य तंत्राविषयी माहिती आणि द कॉकेशियन चॉक सर्कल करण्यामागची भुमिका विषद केली आहे. नाटक समजून घेण्यासाठी अशा टिपणांची खुप मदत होते.)
रिंगण च्या एका तालमीचे दृश्य: प्रवीण भोळेंच्या फ़ेसबुकवरुन साभार.
द कॉकेशियन चॉक सर्कल या नाटकाची अभ्यासक्रमाचा भाग म्हणून निवड केली हे महत्वाचे आहे. असे मल्टिफ़ॅसेटेड नाटक निवडल्याने विद्यार्थांना शिकायला खुप वाव मिळतो. त्यात नाच-गाणी असतात. त्याचबरोबर, नाटकाच्या रचनेचा भाग असतो. अभिनयाची वेगवेगळी अंगे शिकता येतात. शिवाय, नाटकाच्या निमित्ताने विचार-मंथन होते. डॉ प्रवीण भोळे त्यांच्या मुलाखतीत म्हणतात त्याप्रमाणे, “ दुसरे असे की कोणताही कलावंत हा केवळ कलेचा साधक नसून तो त्याच्या भवतालच्या समाजाचाच एक जबाबदार घटक असतो. म्हणून आपली कला आणि समाज यांच्यातला नातेसंबध विद्यार्थ्यांच्या नीट लक्षात यावा, तसेच या समाजाप्रती आपल्या असलेल्या कर्तव्याची त्यांना जाणीव व्हावी हाही एक हेतू आहेच.” (‘ब्रेख्तची माणसं जास्त भावली’, दिग्दर्शक प्रवीण भोळे यांची मुलाखत. ही मुलाखत प्रयोगाआधी प्रेक्षकांना छापील टिपण दिले जाते त्यामधे प्रकाशित केली आहे.)

अर्थात, द कॉकशियन चॉक सर्कल सारख्या नाटकाच्या निवडीने जबाबदारी वाढते. नाट्य-प्रशिक्षणाचा कार्यक्रम फ़क्त ‘नाट्य’ प्रशिक्षण येवढाच असेल तर संगीत-गायना सारखी अंगे दुर्लक्षित राहाण्याचा धोका असतो. विशेषतः, ब्रेख्तच्या नाटकात संगीताला अनन्यसाधारण महत्व आहे. रिंगण  या नाटकात संगीत आणि गाण्यावरचा ब्रेख्तियन विचाराची रंगमंचावरली अनुभुती प्रेरणादाय़ी नव्हती. यामागचे मुख्य कारण, गाणा-यांची तयारी कच्ची हे होते. त्याचबरोबर, गाण्याच्या वेगवेगळ्या शैलींमधे त्यांचे शिक्षण पुरेसे झाले नव्हते असे वाटले. शिवाय, संगीताचे म्हणून स्वतःचे कथन विद्यार्थी त्या प्रयोगातून उभे करु शकले नाहीत, प्रेक्षकांना अंतरावर ठेवण्यासाठी ते रंगमंचावरल्या प्रसंगांना ‘काऊंटरपॉईंट’ देत नव्हते, जे ब्रेख्तियन ‘एपिक’ शैलीत अपेक्षित असते.

असो. घेतलेल्या वा घेत असलेल्या नाट्य-प्रशिक्षणाचे समाजासमोर प्रदर्शन करुन त्यानंतर अभ्यासाची दिशा ठरवणे इथे महत्वाचे असते. 'ललित कला केंद्र' आपले प्रयोग समाजासमोर आणत असते हे प्रशंसनीय. 

शेवटी, प्रदर्शनाच्या नाट्यप्रयोगाबरोबर आणखी कोण कोणत्या शक्यता असू शकतात याचा विचार होणेही महत्वाचे आहे, असे मला वाटते. उदाहरणार्थ, शिकण्याच्या काळात विद्यार्थ्यांनी काढलेल्या नोटस किंवा त्यांची नोंद वही प्रकाशित करणे. विद्यार्थ्यांची बैठक बोलवून त्यांना नाट्य-अभ्यासाविषयी-पध्दतींविषयी बोलते करणे. एखादी नाट्य-पध्दती/नाट्य-शैली अभ्यासासाठी निवडली असेल तर त्याबरोबर संबधित विषयावरील सिनेमे/चित्रे पाहाणे आणि त्याविषयी एकमेकात चर्चा करणे, इत्यादि.

पुण्यात नाट्य-प्रशिक्षण देणा-या ललित कला केंद्राव्यतिरिक्त फ़्लेम स्कूल ऑफ़ परफ़ॉर्मिंग आर्टस सारख्या उच्च शिक्षण देणा-या संस्था आहेत. विविध ठिकाणी शिकणा-या विद्यार्थ्यांच्यात संवाद होण्यासाठी काही प्रयत्न होणे महत्वाचे आहे. यातुन, विद्यार्थी आपले संपर्क जाळे तयार करतील आणि त्यातून शिकण्याच्या आणि नंतर जगण्याच्या नव्या वाटा तयार होऊ शकतील. जगभरात शास्त्रीय पध्दतीने नाट्य शिक्षण देणा-या संस्थानी जाळे निर्माण करुन एकमेकाला जोडून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जेणेकरुन, विचार आणि प्रशिक्षण-व्यवहाराची देवाण-घेवाण होईल. पुण्यातसुध्दा प्रशिक्षण एकमेकांचे नाट्यप्रयोग एकत्र पाहू शकतात आणि एकमेकांशी असणारा संवाद वाढवू शकतात.

Comments