‘ना’ नाटकातला: रंगभूमीकडे पाहायच्या नजरा

राजीव नाईक नाटककार, कादंबरीकार, आणि नाटकवाला आहे. तो नाटक शिकवणारा नाटकवाला आहे. नाटकाची संहिता वाचून त्यावर कुणी काय लिहिलय याची जंत्री सांगून विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाने दबकून टाकणारा आणि कधी तास सुटतोय याची वाट बघायला लावणारा विद्यापीठीय मास्तर म्हणून राजीव प्रसिध्द नाही. त्याचं नाटक शिकवणं सगळीकडं असतं: फ़ोनवर असतं, घरात असतं, ललित कला केंद्राच्या प्रांगणात असतं आणि वर्ग नावाच्या चौकटीत असतं. ललित कला केंद्रातून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी पुण्यात असू देत किंवा दिल्लीत असू देत भेटले की राजीव नाईक सरांचा उल्लेख हमखास ठरलेला.

राजीव भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नऊच वर्षानंतर जन्मला. थेटपणे माझ्या आधीच्या पिढीचा. पण, त्याच्याशी बोलताना प्रेशर जाणवत नाही, वयाचे. भारतभरातल्या नाटयव्यवहाराचं राजीवला चिकित्सक भान. त्यामुळे, त्याच्याशी बोलताना बौध्दिक बेसावधपणा न परवडणारा!

तर, राजीवचे नाट्यविषयक लेखन.

राजीवने लिहिलेली नाटकाविषयीची पुस्तके अवघड संकल्पना सोप्या करुन समजेल अशा भाषेत सांगणारी. खरंतर, हा त्याच्या शिक्षकी पिंडाचाच भाग. सोप्या भाषेत म्हणजे संकल्पना सुटसुटीत करुन सांगतो. अनौपचारिक शैलीत, भारदस्त न वाटणारे शब्द वापरुन लिहित असणा-या राजीवची पुस्तके त्याच्या भाषिक खुबीमुळे ‘अकॅडमिक’ गटात बसणार नाहीत. पण त्यातल्या आशयाला वजन असते. ‘ना’ नाटकाचा या पुस्तकाच्या प्रस्तावनेत तो म्हणतो: “माझ्या लिखाणाची, अनुभव घेण्याच्या पध्दतीची, वैचारिक जडणघडणीची संदर्भचौकट नजरेस आणायची होती इतकंच. ती लवचीक आहे, तिला आपल्यातच मस्त-मशगुल राहण्याचा सोस नाही, वेगळेपणाचा टेंभा मिरवण्याची हौस नाही, संकुचित होण्याची तर सुतराम इच्छा नाही.” (८, ‘ना’ नाटकातला).

मराठीतल्या नाटकाबद्दलच्या (नाट्यइतिहास नव्हे) लिखाणाला जुनी परंपरा आहे. के. नाराय़ण काळे, क. बा. मराठेंपासून ते प्रा. अशोक रानडेंपर्यंत. याव्यतिरिक्त, वर्तमानपत्रातुन लिहिली जाणारी तात्कालिक परीक्षणे. प्राध्यापकी वळणाचे नाट्यसंहितांना समोर ठेवून केलेले लिखाणही इकडे तिकडे प्रकाशित होत असते. पण, एखाद्या संकल्पनेवर, तात्कालिक नसलेले लिखाण फ़ार होत नाही. राजीवने अशा लिखाणाची तीन पुस्तके लिहिली आहेत: नाटकातील चिन्हं, खेळ नाटकाचा, आणि नाटकातलं मिथक. चौथं: पद्मगंधा प्रकाशनाचे ‘ना’ नाटकातला. याशिवाय, नाटकाची तीन पुस्तके: एकूण नाटके, दहा. त्याचबरोबर, सहा भाषांतरे. नऊ पाठ्यपुस्तकांची संपादने. चार सहसंपादने. फ़िक्शन आणि कविताही, शिवाय. त्याच्या कविता मी वाचलेल्या नाहीत. असं रग्गड काम त्याच्या नावावर. आणखी एक, ‘होमी भाभा’सारखी खणखणीत, नावाजलेली पाठ्यवृत्ती.

पुणे विद्यापीठातल्या ललित केंद्रातील विद्यार्थांच्या रिंगण या डॉ प्रवीण भोळेंनी दिग्दर्शित केलेल्या अभ्यास नाटकाचा प्रयोग पाहून आल्यावर राजीवच्या ना-नाटकातील या पुस्तकातल्या चौदा प्रकरणांपैकी ‘कथक रंगभूमी: ब्रेख्तचं एपिक थिएटर’ हे अकरावे प्रकरण मी पुन्हा वाचले. पुस्तकात लिखाणाच्या ब-याच चुका आहेत. पण, त्याकडे दुर्लक्ष करुन राजीवचे ब्रेख्त प्रकरण वाचून काढले. राजीव त्याच्या इतर लेखनाप्रमाणे, इथेही विषयाची फ़क्त ओळख करुन देऊन थांबत नाही. विषयाचे विश्लेषण करतो. ब्रेख्त बद्दल लिहितो. त्याच्या नाटकी कामगिरीबद्दल लिहितो. त्याच्या काळाबद्दल लिहितो. ब्रेख्तने ड्रामॅटिक आणि एपिक थिएटरमधे जी विभागणी केली आहे त्याचीही तो माहिती देतो. ब्रेख्तच्या अ-परिणाम (एलिएनेशन इफ़ेक्ट) बद्दल बोलताना तो लिहितो: “अ-परिणाम अभिनयातून साधणं मात्र अवघड आहे. एका बाजूने नटाने पारंपारिक अभिनयच केला (जसा ब्रेख्तच्या नाटकांतून अनेकदा केलाही जातो) तर, इतर सर्व घटकांमध्ये अ-परिणाम प्रयत्न करुनही प्रेक्षक भावनिकरित्या गुरफ़टणारच; तर दुस-या बाजूने भावनारहित, कोरडा होण्याची आणि म्हणून कुठलाच परिणाम न साधण्याची भीती आहे.” पुढे, राजीव महत्वाचे निरिक्षण नोंदवतो: “ब्रेख्तने ह्या प्रकारच्या अभिनयाबद्दल खूप लिहून ह्याबद्दल अजून संदिग्धता आहे.” (१२३, ‘ना’ नाटकातला)

ब्रेख्तच्या नाट्यतंत्राबद्दल उत्सुकता असणा-या प्रत्येकाने वाचावे असे हे प्रकरण.

 राजीव फ़क्त पाश्चात्य रंगभूमीच्या पार्श्वभूमीवर ब्रेख्तच्या कामाकडे तो पाहात नाही. भारतातील तमाशा-कथकली अशा नाट्यपरंपरांच्य पार्श्वभूमीवर ब्रेख्तच्या अ-परिणामाचे यशापशय तो जोखतो. इथे मला भारतात जे ब्रेख्तियन नाटकाचे प्रयोग केले गेले त्यासंदर्भात अजुनही वाचायला आवडले असते. उदारणार्थ, विजया मेहता यांनी केलेला ब्रेख्त, जो मला, अर्थातच, पहायला मिळालेला नाही. पण, त्याबद्दल त्यांच्या आत्मचरित्रातून वाचले आहे. ब्रेख्तचे प्रयोग फ़क्त नाट्यतंत्रातील प्रयोग म्हणून पाहिले जात नाहीत. तो त्याच्या राजकीय भुमिकेचा परिपाक होता. मग, त्याचे नाट्यतंत्र वजा राजकिय विचार असे होते त्यावेळेस ब्रेख्तियन रंगभूमीला आपण कसे सामोरे जातो? विजया मेहता यांच्या ब्रेख्त प्रयोगात असे झालेय असे दिसते. ब्रेख्त करताना विजया मेहतांची त्यांच्या थेटर ग्रुपची काय राजकिय/सांस्कृतिक घुसळण झाली याची चर्चा त्या आपल्या आत्मचरित्रात करत नाहीत. या पार्श्वभूमीवर, एखादा दिग्दर्शक एखाद्या विशिष्ट नाटककाराचे नाटक बसवतो किंवा विशिष्ट नाट्य़तंत्र अवगत करु पाहातो म्हणजे काय होत असावे या प्रश्नाचे उत्तर राजीव अधिक समर्पकपणे देऊ शकला असता.

अजुन एक, या पुस्तकात, ब्रेख्तियन नाट्यतंत्राचा अभ्यास जसा राजकिय आणि आर्थिक विचारप्रणालींच्या आणि स्तानिस्लावस्कीच्या संदर्भात केला जातो तसा तो राजीवने मेयरहोल्डसारख्या दिग्दर्शकाच्या (१८७४ ते १९४०) कामाच्या पार्श्वभूमीवरही करणे महत्वाचे ठरले असते. Fifty Key Theatre Directors या संपादित पुस्तकात शोमित मेतर आणि मारिया श्वेत्सोवा भारतात इतकासा पोहचला नसलेल्या मेयरहोल्डला ‘father of modern theatre’ म्हणतात. मेयरहोल्डवरच्या त्यांच्या लेखात मेतर आणि श्वेत्सोवा लिहितात की, “Second, a significant part of Meyerhold’s achievement is still wrongly attributed to Brecht. The break with Stanislavskian realism, the use of episodic structures punctuated with music and song, the tendency to draw attention to fictional basis of stage action, the use of projection and captions, the institution of a critical distance between the actor and the role are all devices which Meyerhold used well before Brecht, yet in the mind of the casual theatre-lover these are all associated principally with the work of Berliner Ensemble.” (27)

‘ना’ नाटकातला या पुस्तकात राजीव नाईक-स्टाईलमधे लिहिलेली इतरही चांगली प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरण रंगभूमीकडे पाहायच्या नजरा देतं.

 

Comments