नाटकाचे वाचन

स्वतःचे नाटक वाचणे हा नाटककारासाठी एक परफ़ोर्मंन्स असतो. स्वतःचा आवाज ऐकण्याचा एकांत नाटककाराला नाट्यवाचन देत असते. नाटक घडण्याच्या प्रक्रियेतला हा एक असा टप्पा असतो की नट संच वा दिग्दर्शकाचा प्रभाव नाटकावर अद्याप पडलेला नसतो. नाटककाराला स्वतः लिहिलेले शब्द ऐकायला आवडतात. रंगमंचावरुन ऐकताना त्यात दिग्दर्शक, नट आणि बाकीच्या बाबींनी शब्दांना बरेच फ़िल्टर लावलेले असतात. नाटकाच्या रुपाला अनुसरुन आपल्या शब्दांचे वेगवेगळ्या बाजूंनी इंटप्रिटेशन झालेले असते. मग, क्षणभर, हे आपणच लिहिले आहे काय असे वाटावे. त्या रंगमंचीय अनुभवापर्यंत पोहोचण्याआधीचा आदिम अनुभव संहिता-वाचनातून येतो. नाटकातील पात्रे आणि त्यांची रचना घोटवण्याची एक नामी संधी नाट्यवाचन देत असते. नाटकातील पात्रे कशी बोलतील, नाटकातला अवकाश कसा खेळ खेळेल याची कल्पना करण्यानी ही एक संधी असते आणि नाटककार ती घेत असतो. नाटकाचे वाचन खाजगी स्वरुपात आपल्या मित्रमंडळींच्यात असो वा सार्वजनिक ठिकाणी एखाद्या नियोजित कार्यक्रमात वाचन करणे असो. 

मला माझी दोन नाटके बोधी नाट्य परिषदेच्या कार्यशाळेत वाचायला मिळाली याचा आनंद वाटतो. बोधी नाट्य़ परिषदेच्या कार्यशाळात विकसित होण्याच्या टप्प्यावरील: वर्क इन प्रोग्रेस नाटके वाचण्याची संधी नाटककाराला दिली जाते. पूर्ण झालेले नाटक वाचण्यापेक्षा पूर्णत्वाकडे जाणारे नाटक वाचणे ही नाटक लिहिणा-याला शिकण्याच्या वेगवेगळ्या शक्यता प्रदान करत असते. माझी वाचने इंटेन्स होती. ऐकायला बसलेले श्रोते, मोजकेच असले तरी ते ऐकण्यात सक्रियतेने सहभागी होते. आम्हा नाटककारांना त्यांनी गंभीरतेने घेतले. आपल्याला गंभीरतेने घेतले जाणे हे थ्रिलिंग असते. अर्थात कलाव्यवहाराकडे गांभीर्याने पाहाणे हा बोधी नाट्य़ परिषदेचा मुलभूत विचार आहे. कला ही ज्ञानशरण आहे असे मानणारी बोधी नाट्य परिषदची कार्यशाळा नाटककाराने नाटक लिहिले आहे याला निव्वळ भावनिक प्रतिसाद देऊन बोधी नाट्य़ परिषदेची कार्यशाळा पुढे जात नाही. नाटककाराला अवघड प्रश्न विचारले जातात. सिनिकल न राहाता ऐकणारे जेन्युइन्ली नाटकाला भिडतात. बोधीमधल्या नाट्य़वाचनाला इंटरेस्टींग श्रोतावर्ग असतो. एका बाजूला थेअरिटिकल मांडणी करणारा आणि त्याच वेळेस त्याचे व्यावहारिक आकलन मांडणारा थिएटरवालाही असतो. नाटकाची संकल्पना, त्यामागचा विचार जेवढा महत्वाचा असतो तेवढेच त्याचा फ़ॉर्म, पात्रांचे ‘दिसणे’-‘असणे’ या बाबीही तितक्याच महत्वाच्या. माझ्यापुरते बोलायचे तर, रंगभुमीवर सक्रिय असणारे नाटकवाले नाट्यवाचनाच्या वेळेला उपस्थित असणे महत्वाचे होते. मी वाचताना ऐकणारे पात्र इमॅजिन करत होते. नाटकातल्या एका सीनबद्दल, एका नटाने मला सांगितले की तो सीन अर्थपूर्ण असेल पण त्याला मी म्हणतोय ते ‘दिसत’ नाही. निरिक्षण महत्वाचे होते. 

फ़ोटो: महेंद्र सुके
नाटककाराला त्याने जे लिहिले आहे त्याचा पुनर्विचार करतो. पुनर्विचार होताना त्याचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. एका टप्प्यावर अंडर कॉन्फ़िडंट होऊन क्रिएटिव ब्लॉक तयार होण्याच्या शक्यता असतात. अर्थात, बोधीतील वाचनादरम्यान नाटक लिहिणारा अंडरकॉन्फ़िडंट होणार नाही याची काळजी संयोजक आणि श्रोते घेतात. नाट्य परिषदेची धुरा प्रेमानंद गज्वींसारखे नाटककार सांभाळतात. त्यांना नाटक लिहिण्यातले गुंते चांगलेच माहिती असल्याने नाटककार निराश होणार नाही याची काळजी ते घेत असतात. इथे भर असतो तो नाटकाच्या सबटेक्स्टच्या वाचनावर. त्यादृष्टीने, मला या कार्यशाळेची मदत झाली. सबटेक्स्टची इथे पापुद्रे काढल्याप्रमाणे चिकित्सा होते. पर्सनली, मला, निळकंठ कदम, अवधूत परळकर आणि प्रेमानंद गज्वी यांनी केलेल्या नाटकावरील विवेचनाने माझ्या लेखनाकडे चिकित्सकपणे पाहाण्याचे भान दिले. लोकेशन, पात्रे, गोष्टीतल्या वेगवेगळ्या त-हा आणि त्यातली नाटकियता. नवे विचार, नवे तंत्र या बाबींवर खोलवर चर्चा झाली. नाटकाची रचना, त्याचे प्लॉटिंग, शैली, आणि खोलवर जाऊन तुमचा विचार काय आहे याविषयी त्यांनी मला विचारप्रवृत्त केले. बोधीतील वाचनानंतर, माझ्यासारखा खोलवर स्वतःच्या लेखनाला तपासून बघू शकला. इथे नाटककाराला थांबून स्वतःच्या लेखनाकडे पाहाण्याचा वेळ मिळतो: आपले बलस्थान. कमकुवत जागा. आणि नाटकाबद्दलची पुढची दिशा ठरवता येते.

(बोधी नाट्य परिषदेच्या २०१३च्या स्मरणिकेत हे टिपण प्रसिध्द झाले आहे.)

Comments