सलाम

‘सलाम’चे पोस्टर, ज्यात गिरीश कुलकर्णी आणि त्याचा मुलगा दाखवला आहे, पाहुन सिनेमा बघायचा एखादा टाळायचा. (किंवा, असे ते पोस्टर आहे म्हणून बरेच जण बघायलाही जातील!) पण, पोस्टरमधे दाखवला आहे एवढा सिनेमा सरधोपट नाही.


गिरीश कुलकर्णींचे आधीचे काम मला माहिती आहे आणि किरण यज्ञोपवित यांनी सिनेमात ‘सलाम’ च्या आधी केलेले काम माहिती नाही. कुलकर्णी (एव्हाना त्याच्या स्थिरस्थावर झालेल्या अभिनयशैलीने) सिनेमा आणि दिग्दर्शकिय ट्रिटमेंट गिळून टाकू शकतात हा धोका पत्करुन मी ‘सलाम’ बघायला गेलो. दिग्दर्शकाने तसे त्यांना करु दिलेले नाही यात दिग्दर्शकिय जबाबदारी ठळकपणे जाणवते. तर, कुलकर्णी आपल्या रिअलिस्टिक अभिनयाने आपल्याबरोबर इतरांनाही सिनेमात जागा दिली आहे यातून तो नट म्हणून प्रगल्भ झाला आहे हेही जाणवते. (इन फ़ॅक्ट, ’सलाम’मधे पडद्यावरच्या आपल्या मुलाबरोबर ते इतके डिटॅच राहिले आहेत याने मी कोड्यात पडलो. सिनेमातला वडील चटकदार वाक्ये मुलाला नदीकिनारी किंवा मोठ्या झाडाखालचे पाणी बघून सांगतो पण वडील कोरडा वाटला. तो मुलाला मोकळेपणाने जवळ का घेत नाही!) 

किरणचा यज्ञोपवित यांचा आधीचासुध्दा सिनेमा मला बघायला हवा. 

‘सलाम’ वास्तवदर्शन सेंटिमेंटल करुन सुलभ करत नाही. सैनिकाचे बलिदान आणि देशभक्ती, पोलिसांचे दहशतवाद्यासमोर झालेले बलिदान आणि ‘खरी’ देशभक्ती, ‘खरे’ शौर्य बघायचे असेल तर भारत-पाकिस्तान सीमेवर जा किंवा मुंबईचे पोलिस कसे राबतात ते पहा असे सांगून आधुनिक राष्ट्रवादाचे जुनेच विकाऊ दळण किरण दळत नाही. यात किरणनी मोठा रस्ता नापला. दळण न दळण्यासाठी निर्मात्याने पैसे घातले हेही महत्वाचे.
 

कुणीतरी म्हटलयं की सिनेमाचे स्क्रिप्ट अर्धे काम करते. सिनेमा लिहिण्यावर यज्ञोपवित यांनी फ़ार काम केले आहे. एखाद-दुसरी लाईन अशीच येते पण हा मला चांगला लिहिलेला सिनेमा वाटतो. मुख्य म्हणजे, मुव्हिंग इमेज मेकिंगच्या या जमान्यात स्क्रिप्ट मधल्या भाषिक बाबींवर त्यांनी खुप लक्ष दिले आहे. गावाकडची भाषा म्हणून कुठेही त्याला विनाकारण ‘ग्रामीण’ टच देण्याचा प्रयत्न ते करत नाही. अत्यंत सोपी, सहज आणि ओघवती भाषा. विशेषकरुन, कॅमेराचे प्रेशर न घेता पडदाभर व्यापलेली डाऊन टु अर्थ मुले या सिनेमाला ओघवता ठेवतात. मुलांमधले काही (ओव्हर) ड्रामॅटिक प्रसंग वगळता संयत भाषा हा सिनेमाचा विशेष आहे. विशेष मजा येते ती शिवाजीचे नाटक बसवण्याच्या रिहर्सल्स मधून. इतिहास-कालिन आणि वर्तमान-कालिन वास्तव एकत्र गुंफ़ुन वास्तव मांडण्याचा प्रयत्न निश्चित्तच वाखाणण्याजोगा आहे. हे तंत्र नवीन नाही. पण इतिहास-सेन्सिटिव मराठी माणसाला खास वाटावे असे ते जमवले आहे. 

मेलोड्रामा आठवणींच्या प्रदेशात नेतो. ‘सलाम’ सिनेमाही हे करतो. ऐंशी-नव्वदच्या दशकात खेड्यात राहून शिकलेल्या मला हे प्रकर्षाने जाणवले. गाव, शाळा, शाळेच्या भिंती. पोस्टऑफ़िस, विहिर आणि घरातली म्हातारी. पाश्चात्य सिनेमाची आठवण करुन देणा-या संगीताला ऐकत आपल्या गावाची उजळणी करणे हा सिनेमॅटिक अनुभव होता. कितीतरी मित्रांच्या वडलांचे घरात लावलेले फ़ोटो समोर आले. गावाजवळच्या वाडीत राहाणारा राजकुमार नावाचा आमचा मित्र सैन्य-गीते धडाधड म्हणायचा. त्याच्या कुटूंबात सैन्यात गेले नाही तर कमीपणाचे मानले जाई. गावातल्या शौर्याच्या गाथा परत ऐकू आल्या. किशोर कदमच्या रुपाने आतनं ढवळून काढणारे शिक्षक समोर आले. ‘सलाम’ च्या टिमने शुटिंगसाठीचे केलेले विचारपूर्वक फ़िल्डवर्क, त्यांचे विविध त-हेचे कॅमेरावर्क परत परत भूतकाळाकडे सजगपणे नेत होते. अर्थात, मधे-मधे कॅमेराला ढिलेही सोडले होते त्यामुळे लॅंडस्केप्स, विटी-दांडू, गोट्या, मुलांचे पाण्यात हुंदडणे, गावाचे सौंदर्य इत्यादी भरुन खळाळणा-या वाहणा-या ओढ्यासारखे येत होते. काही का असेना, दाखवण्यामधे कुठे जातीय वा सामाजिक कटुता नव्हती तर उतरंड आणि भेदांचे भान होते. नाहीतर, गाव म्हटले की पाटील इत्यादि येणार त्याबरोबर नाकात बोलणारा बामण वा अभ्यास करणारा त्याचा पोर. याअर्थाने, गावच्या पात्रांचे-आलुते/बलुतेदारांचे- पोलरायझेशन नव्हते. सुलभीकरण नव्हते. कुठलाही आव आणून सैनिकांच्या वा पोलिसांच्या जीवनावरचा सिनेमा आहे अशीही ट्रिटमेंट नाही. काही एक सामाजिक वास्तव दाखवायचे ही पोझ पण हा सिनेमा घेत नाही. आताशा गावें समोर ठेऊन बरेच सिनेमे येतायत. वर्ग-संघर्ष, जाती-संघर्षाबद्दलचे. कुणी ’सलाम’मधल्या मुलांमुळे कुठल्या इराणी सिनेमाची आठवण काढेल. सरतेशेवटी, समुह आणि व्यक्तिच्या सामाजिक/सांस्कृतीक संदर्भात मेलोड्रामा काय दाखवतो आणि काय दिसतो हे ठरणार. 

मेलोड्रामाचे मला वावडे नाही. वावडे नाही मला आदर्शवत वाटणा-या मुल्यांचे. पायाला घाण लागू नये म्हणून जप म्हणुन सांगताना मनालाही जप असे आपल्या मुलाला कळवळ्याने सांगणारी श्यामची आई मला ‘उत्तर-आधुनिक’ सिनिसिझमच्या काळात मला गलबलून टाकत नसली तरी निरर्थक वाटत नाही. महत्वाचा मुद्दा असतो तो मेलोड्रामा कसा गुंगवतो आणि गुंतवतो. चांगले-वाईट, शौर्य-नेभळटपणा अशा संघर्षात नांगर टाकुन जागोजागी आदर्श मुल्यांची पेरणी करत राहणा-या मेलोड्रामाला भारतीय परंपरेत वेगळीच धार येते हे आतापावेतो आपल्या ध्यानातही आले आहे. मेलोड्रामाची धार विविंध स्तरांवर तरल आणि काव्यात्म होते का यात मला रुची आहे. विशेषतः राष्ट्रवादी विचारसरणीला दोन देशांतील संघर्ष वा दहशतवादाचे अस्त्र वापरुन खतपाणी घातले जात असताना त्याच अस्त्रांचा वापर करत काव्यात्म मेलोड्रामा आधिक गुंतागुंतीचा, ओरखडे काढणारा कसा होतो हे पाहाण्यात मला इंटरेस्ट आहे. यापार्श्वभूमीवर, ‘सलाम’ सिनेमा काव्यात्म मेलोड्रामाच्या परंपरेतला आहे असे मला वाटते.
(फ़ोटो क्रेडिट:http://mumbainewsbox.blogspot.in/2014/04/salaam-marathi-movie.html)

Comments