नाटक कुणाचे?


नाटक कुणाचे हा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. ते नटांचे? दिग्दर्शकाचे? की नाटककाराचे? कुणाचे नाटक हा प्रश्न खरच महत्वाचा आहे का? कारण, नाटकाचा व्यवहार सादरीकरणाचा आहे. तो कुणा एकट्या-दुकट्याचा नसतो. तो निव्वळ नट, दिग्दर्शक वा नाटककाराचा का समजावा? थेटरची व्यवस्था बघणा-या मॅनेजरचा का समजू नये? किंवा संगीतदिग्दर्शकाचा वा नेपथ्यकाराचा का असू नये? थोडक्यात काय तर, नाटक बरेच काही सामावून घेत असते. पाण्यासारखं. अनेक रंग त्यात मिसळू शकतात. मग जो तो म्हणू शकतो भांडय़ातले जे काही आहे ते त्याच्या रंगाचे आहे. पाण्याबरोबर आणि त्यातल्या रंगाबरोबर भांडेही महत्वाचे आहे. कुठल्याही भांड्यात ते पाणी ठेवले तर मजा येणार नाही. भांडी आणि पाण्याचे हे उदाहरण नाटकासारख्या कलेला चपखल लागू पडते. सत्य, हिंसा, व्देष, प्रेम, माया, आपलेपणा हे मुद्दे सार्वकालिक आहेत आणि राहतील. बदलतात त्या त्यांच्या छटा, त्यांना प्रभावित करणारे घटक आणि हे मुद्दे जिथे विविध रंगांबरोबर मिसळलेले असतात ते भांडे. जसे भांडे तशा त्याच्या छटा बदलत जातील.

नाटक थ्रिल करते. अंधा-या नाटक घरात शिरलो तो अंधार बोलतो. अंधाराला कापणारा प्रकाश दिव्यत्वाची प्रचिती देत असतो. वाईटातले वाईट नाटक असले तरी रंगमंचाकडे आपण अंधारातुनच शिरतो. या अंधारातून प्रकाशाकडे शिरण्यासाठी तिकिट काढूनच जायला पाहिजे असे नाही. त्यासाठी बंदिस्त थेटरमधेच जायला पाहिजे असे नाही. पीटर ब्रुक हा विचारवंत दिग्दर्शक म्हणतो की मला कुठलीही मोकळी जागा द्या त्याला मी मोकळा रंगमंच म्हणतो. एक मनुष्य या मोकळ्या रंगमंचावरुन चालत जातोय आणि दुसरा एखादा त्याला निरखतोय. नाटकासाठी एवढच लागतं. पीटर ब्रुक नी साठीच्या दशकात लिहून ठेवले. त्याचे द एम्प्टी स्पेस हे पुस्तक नाटकवाल्यांचा संदर्भग्रंथ आहे. ब्रुक दिग्दर्शक आहेत आणि ते मुलभूत तात्विक मांडणी करतात, नव्वदी ओलांडलेले पीटर ब्रुक अनुभवातून अधिक प्रगल्भ होत गेले आहेत. असे विचारवंत आपलीच मांडणी खोडतात किंवा ती पुढे घेऊन जातात. म्हणून, ते ग्रेट असतात. नाटक आकाराला येण्यासाठी मोकळ्या जागी चालणारा आणि त्याला निरखणारा अशा दोन घटकांमधे ब्रुकनी अजुन एक घटक आणला. तो म्हणजे, मोकळ्या जागी चालणारा माणूस कुणाशी तरी बोलत असला पाहिजे तरच ती नाटकीय कृती ठरते.

नाटकीय कृती हा केवळ शब्दांचा खेळ नाही. तो शब्दांच्या अलिकडचा आणि पलिकडचाही आहे. तो शब्दाशिवायच्या वागण्याचाही आहे. वागण्याच्या त-हांचा आहे. वागण्यांच्या त-हा कशा दिसतात आणि दाखवल्या जातात याचाही आहे. म्हणून, नाटक लिहिणे, बसविणे आणि दाखवणे हे एकमेकांत बांधलेले सूत्र आहे.

समकालिन काळात नाटकाचे हे सूत्र आधिकाधिक दृढमूल होताना दिसतेय. नाटक सांगण्यातून आणि ऐकण्यातून येते. तो बोलीभाषेतला व्यवहार. ना लिखा पढी, ना पाठांतर. गावच्या कट्ट्यावर, घरातल्या घरात, देवळात, परसुदारात, शेतात, पारावर, टी व्ही समोर. इथे-तिथे नाटक घडत असते. दिवसभर नाना त-हेची कामे करत करत लोक एकत्र यायचे आणि काहीएक ‘सादर’ करायचे. असे नाटक ही काही गतकाळातली कृती नाही की आपण ‘असे नाटक व्हायचे’ असे म्हणू. परवाच मी कोथरूडला माझ्या बहिणीच्या घरी गेलो होतो. तिचा पाच वर्षाचा मुलगा त्याच्या वयाला अनुसरुन एकदम अवखळ आणि खेळकर आहे. दोन दिवसापूर्वी त्यांच्या घरी पिण्याच्या पाण्याचा फ़िल्टर दुरुस्त करायला एक जण येऊन गेला होता. हा माझा भाचा त्या व्यक्तीची हुबेहूब नक्कल करुन दाखवत होता. ती व्यक्ती आली कशी, ती खुर्चीवर कशी बसली, त्याच्या पिशवीत काय सामान होते, इत्यादी. त्याची आजी त्याला ‘फ़िल्टर-काका’ म्हणून त्याच्याशी संवाद साधत होती. समकालिन काळातले नाटक असे जन्म घेतेय. ऐतिहासिक काळातही असेच घडत असणार. भूतकाळ आणि आताचा काळ एकमेकात मिसळूनच उभे आहेत. आता पात्रे बदलली असतील. त्यांची हत्यारे बदलली असतील. त्या मागचे ताणे-बाणे बदलले असतील. पूर्वीपेक्षा आताची आजी वेगळी असेल. पण तिच्याकडे थेट संवादाचे इम्पल्स असते ते नाटकीय कृतीला जन्म देते.

आजच्या काळातली नाटकीय कृती निव्वळ रंगमंच्यावर पडदा वर वा खाली करण्यापुरती नाही. ती नाटकीय कृती नटांपूरती मर्यादित नाही. आपण याला पारंपरिक अर्थाने नाटक नाही म्हणू शकणार. पण, ते नाटकीय़ आहे. उदाहरणार्थ, ‘सेल्फ़ि’सारखी एक्टीविटी. म्हटले तर, सेल्फ़िसाठी कुणीही अभिनय करत नसतो. पण कुणीतरी आपली सेल्फ़ी बघावी असे वाटत असते. खरे तर, कुणीतरी बघावे म्हणूनच सेल्फ़ी घेतलेली असते. आपल्या देशाचे पंतप्रधान जगभरात जात असतात तेंव्हा बाकीच्या कुठल्याही महत्वाच्या कामापेक्षा काय गाजते तर त्यांचे ‘सेल्फ़ी-नाट्य’. त्यांनी ते सोच-समझके केलेले असते. एकोणिसाव्या शतकात जेंव्हा नाटक सादर करायचे या उद्देशाने रंगमंचीय प्रयोग सादर केले जाऊ लागले तेंव्हा नटाने कसे उभे राहायचे यातून त्याच्या प्रोफ़ाईल अक्टिंगला मान्यता मिळाली. त्याचवेळेस, व्यापक प्रक्रियेचा भाग म्हणून चित्रकला आणि छायाचित्रकलाही विकसित झाली. त्याकाळाची याद यावी असा हा ’सेल्फ़ि-नाट्या’ चा काळ.

‘सेल्फ़ि-नाट्या’त दंग असलेल्या ‘प्रेक्षका’ला ‘मोकळ्या अवकाशात’ घडण्या-या नाट्याकडे कसे आकृष्ट करायचे याबद्दलच्या विचार आणि कृतीचा काळ आज आहे. अर्थात, त्या प्रेक्षकाचे कुठल्याही प्रकारे लांगूलचालन न करता वा नाटकवाल्यांबद्दल कळवळ्याचे गळे न काढता. हा मोकळा अवकाश असा आहे की ज्याच्या मागे-पुढे समाज आणि संस्कृतीचे धागे दोरे आहेत. भूतकाळाचे ‘आज’पर्यंत येणारे ओघळ आहेत. आपल्या असण्या आणि नसण्यामधे भवतालाने आपल्यावरच्या अस्मितांचे जू आहेत. त्या मोकळ्या अवकाशात खेळणा-या रंगकर्मींच्या स्वप्नपूर्तींचे इमले आहेत. प्रेक्षकांतून येणा-या उदगारांसाठी आसूसलेले ते इमले. रहदारीतून मार्ग काढत ‘मोकळा अवकाश’ सेलिब्रेट करायला ते आलेले असतात. संध्याकाळच्या दिलखेचक टीवी सिरियल्स किंवा फ़ेसबूकवरल्या अपडेटसना थोडावेळ बाजूला सारण्याचा जिम्मा उचलण्याची जीवापाड मेहनत करुन प्रेक्षक आलेले असतात. पण म्हणून इमोशनल होऊन अजुन एक एंटरटेनिंग एक्टिविटी आपण ‘मोकळ्या अवकाशा’त सादर करणार नाही. त्यांची एंटरटेनमेंट करु. पण, कलाकाराच्या टर्मस वर, मिनिंगफ़ुली. आपले नाटक जेवढे कलाकारांचे असते तेवढेच ते नाटकासाठी येणा-यांचे असते. त्यांना पाठींबा देणा-यांचेही असते. म्हणून, ते मिनिंगफ़ुली एंटरटेनिंग असावे. कसे, काय, किती हा ज्याचा-त्याचा नाटकी मुद्दा.

(पूर्व प्रसिध्दी: दैनिक दिव्य मराठी। ३१ मे, २०१५)

Comments