॥ काळीज खुलवण्यास सायकललो इथे ॥

नुकतंच उजाडतंय. बाजूने भरधाव धावणा-या वहानांची संख्या कमी असली तरी एखाद्या वहानाचे वेगाने जाणे मला धस्स करतं. अंगभर वारा खेळवत मी सायकलवर पाय़ंडल मारतोय. हॅंडलवरचा माझा तळवा घामेजुन गेलाय. आता एका निर्मनूष्य रस्त्यावर मी पोहचतो. शेजारी ओळीने साथ करणारी झाडे माझ्यासाठी वारा फ़िल्टर करून देतात. चाकांची गती वाढते, सायकलीची गती स्थिर होते तसं मनाला चाकांचा रिदम येतो. चाकांची गती आणि विचारांची लय एकमेकांबरोबर बोलत राहातात. घडलेल्या घटना आणि सुख-दुःखाचे प्रसंग मागे-पुढे करत चाकांच्या फ़िरत्या अवकाशात स्वतःला जागा करुन घेत राहातात. लहानपणी सदलग्याचे आजोबा आम्हाला भेटायला येत असत. ते आले की घरी रात्री गाण्यांची बहार असायची. बाजूला गुळाची वाटी आणि हार्मोनियम. त्याचे श्रवणीय असे गीतरामायण होत असे. ते आमच्याबरोबर दिवसा शेतावर येत असत. आम्ही पोरं सायकल चालवत तर आजोबा लोक चालत. सदलग्याचे आजोबा सायकलीस्टही होते. कन्याकुमारीला वैगरे सायकलीवरुन गेलेले. आता आजोबा झाले असले तरी सायकलवरचा त्यांचा जोम तरण्या माणसाला लाजवेल असा. ते सायकल घेत आणि मी त्यांच्या मागे कॅरियरवर बसे. या शहरातल्या निर्मनुष्य रस्त्यावर त्यांच्या खादीच्या कुर्त्या-पायजम्याचा स्पर्श आता आठवतोय. 

सायकलणे म्हणजे एक नाटकच. पाय मारताना विचार येऊन जाऊन असतात. सायकलीची गती आणि येणारे-जाणारे विचार गुंगवून टाकणारे असतात. गुंगवून टाकते ते नाटक. विजय तेंडूलकरांच्या ‘सफ़र’ या नाटकानेही मला असच गुंगवून टाकलं. सायकल हे ‘पात्र’ असणारं मला माहित असणारं मराठी नाटक. तेंडूलकरांनी सायकलीला नाटकातले एक पात्र केले. उत्तम अभिनेता तेंडूलकरांच्या नाटकाच्या ‘सफ़री’वर जाताना सायकलीशी संवाद साधत स्वतःशी संवाद साधू शकतो. रंगमंचावरची हरेक प्रॉपर्टी तुमच्याशी संवाद साधत असते. ‘सफ़र’ मधील सायकल माणसाला स्व-त्वाचा शोध घेत सांस्कृतिक आणि सामाजिक वास्तवाचे भान मांडायची संधी देत असते. उर्जा-स्त्रोत म्हणून सायकल नेहमीच तेंडूलकरांसारख्या नाटककारांना खुणावत आली आहे. 

वेगवेगळ्या देव-देवतांची उंदरापासून ते वाघापर्यंतची वहाने हा मोठा कौतूकाचा आणि संशोधनाचा विषय असतो. नाटककार, कादंबरीकार, आणि कवींचे खात्रीशीर वहान म्हणजे सायकल असे ‘पार्नासूस ऑन व्हील्स’ या कादंबरीचा लेखक ख्रिस्तोफ़र मॉर्ले म्हणतो. लिओ टॉलस्टॉय, अल्डॉस हक्झले, ब्रुनो शुल्ज, सिमॉन द ब्वॉ, सॅम्युएल बेकेट, हेन्री मिल्लर, आर के नारायण, अर्नेस्ट हेमिंग्वे, व्लादिमिर नॉबोकाव, चिनुआ अचेबी, आयरिस मर्ढोक अशा कितीतरी लेखकांचा सायकलीशी पाला पडलेला आहे. त्यांच्या आयुष्याला सायकलीने प्रभावित केले आहे. एका चाकाची सायकल, लाकडी सायकल, तीन चाकी सायकल, हात-गाडीची सायकल...‘दो बिघा जमीन’ मधल्या बलराज साहानींच्या हातगाडीच्या सायकलीने आणि डि सिकाचीच्या ‘द बायसिकल थिफ़’ ने सायकलीला अजरामर केले. अर्थात, असंही नाही की प्रत्येक कलाकाराने सायकलीचे गोडवे गायलेत. मार्क ट्वेन साठी सायकलणे म्हणजे अपघातांची आणि दुर्घटनांची मालिकाच होती. तो लिहितो, “सायकल घ्या. तुम्ही जीवंत राहिलात तर तुम्हाला साय़कल घेतल्याचा खेद होणार नाही!” एच जी वेल्सचे सायन्स फ़िक्शन, त्याचा विचार आणि सायकल यांचा अन्योन्य संबध आहे. ‘व्हील्स ऑफ़ चान्स: अ हॉलिडे अ‍ॅडव्हेंचर’ ही कांदंबरी म्हणजे मि. हूपड्रायव्हरची गोष्ट. तो आपलं घरदार मागं सोडून गावोगावी सेकंड हॅंड सायकल घेऊन फ़िरणारा. बरं, नुसतच सायकल चालवणारे पात्र दाखवून वेल्स थांबत नाही. त्यापलिकडे, आपल्या सॉशॅलिस्ट विचारधारेला अनुसरून वेल्स उच्च वर्गीयांच्या मानसिकतेवर भाष्य करतो. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला सफ़्राजे चळवळीची आघाडीची कार्यकर्ती सुसान बी अ‍ॅन्थनीनी जगातल्या बायकांसाठी इतर कशाही पेक्षा सायकलीचे योगदान प्रचंड मोठे आहे हे मान्य केले आहे. सिमॉन द ब्वॉ या विचारवंत-विदुषीने जॉं पॉल सार्त्रबद्दल लिहिताना त्याच्या सायकलप्रेमाचे वर्णन केले आहे. सार्त्रला चालण्याच्या एकसूरीपणापेक्षा सायकल चालवायला आवडत असे. मला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. नाटककार, लेखक किंवा आईनस्टाईन सारख्या शास्त्रज्ञाला सायकलीची एवढी भूरळ पडायचे काय कारण? असं असेल: सायकलीच्या शांत बैठकीवर कलाकार वा शास्त्रज्ञ बसुन स्वप्नांच्या जगाची सैर करु शकतात. 

भारतात शिलाई मशीन, टाईप-रायटर आणि सायकलीनं आधुनिक तंत्रज्ञानाला माणसाच्या कर्तूत्वाची जोड मिळाली. गांधीजीच्या चरख्याचेही तसेच एक कर्तूत्व. साठीच्या दशकात भारत अणुउर्जा निर्मिती करण्याच्या कार्यात असताना हेन्री कार्टियेर या प्रसिध्द छायचित्रकाराने काढलेला इस्रोच्या दोन शास्त्रज्ञांचा फ़ोटो मला एकदम नाटकीय वाटतो. तिरुवनंतपूरमच्या इस्रोच्या प्रयोग शाळेकडे सायकलवर टाकून कोन घेऊन जाणारे शास्त्रज्ञ म्हणजे भारताच्या समाज आणि विज्ञानावर चिंतनीय भाष्य. दोघांच्या मधे असलेली सायकल आधुनिक भारताचे नवे स्वप्न. यातील वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीची स्वप्ने किती पुरी झाली आणि माणसाच्या सुख-दुःखांनी किती मिळवलं आणि गमावलं याचा लेखा-जोगा वेगळ्यानेच मांडायला पाह्यजे. विसाव्या शतकाच्या आरंभी किर्लोस्कर नाटक कंपनी ‘रंगभूमी’ हे मराठी नाटकाला वाहिलेले मासिक चालवत असे. या मासिकातील ब-याच लेखांचा शेवट रेघ मारुन न करता सायकलीचे चित्र छापून केला जात असे. कदाचित, ‘लेख माला’ पुढे चालूच राहिल असे सुचवायचे असेल. 

सायकलण्याच्या बाबतीत मी एकदमच नया खिलाडी आहे. नळीच्या आत पाय टाकून अर्धी पायंडल मारत, पडत-उभा राहात, दुखापती करुन घेत सीटवर बसून कधी सायकल चालवायला लागलो हे कळलंच नाही. दहा पैशापासुन ते पन्नास पैसे- एक रुपयापर्यंत सायकलीचं भाडं वाढत गेलं तसं सायकलही चांगली चालवायला येऊ लागली. पुढे, कॉलेजच्या दिवसांत सायकलच्या कॅरिअरला लोखंडी हूकला गॅस- सिलिंडर अडकवून घरी आणण्यापर्यंत सायकलशी दोस्ती टिकून राहिली. अर्थात, असं सगळ्यांचच होत असावं. लेख लिहून सांगावे की मी काही-बाही लिहितो तसं सायकलही चालवतो असं म्हणण्याएवढा मी सायकलण्यात वाकबगार नाही. मधल्या काळात तर सायकलबरोबरची माझी सोबतही संपली होती. पण अमेरिकेत असणा-या आरती रानडे या माझ्या मैत्रिणीने सायकल नव्याने माझ्यासमोर आणली. आरती अमेरिकेतल्या रस्त्यांवर आणि डोंगर-रांगात आपल्या मस्तीत धावणारी आणि सायकल करणारी. अलिकडे, तिने किलीमांजारो हा आफ़्रिका खंडातला सर्वोच्च उंचीचा पर्वत पादाक्रांत केला. तिच्यामुळं सायकलीतलं नाटक अधिक उजळून निघालं. ‘सिंधू, सुधाकर, रम आणि इतर’ या माझ्या नाटकात सायकल-कविता सादर करणारा शिवा सायकलवरुन रंगमंचावर अवतरतो अशी रंगसूचना लिहिताना मला एकदम मस्त वाटले होते. “सायकल नुसती चालवाया नाही आलो इथे/ तुमच्यासमोर काळीज खुलवण्यास सायकललो इथे” असे अभिमानाने सांगणा-या शिवाची भुमिका नचिकेत पूर्णपात्रे करतो. मुक्तिबोध, सुर्वे आणि अमरशेखांचा वाणीचा उद्घोष करणारा शिवा सायकलीला पांघरुण घालतो हे लिहिताना दूरवर रपेट करुन आल्यावर सायकलीला लाड करुन घ्यायला आवडते हे जाणवत असते. सायकलीच्या मनसोक्त सफ़रीवर मानवी संस्कृतीचा नकाशा सादर करण्याची महत्वाकांक्षा मनाशी बाळगत ‘सिंधू, सुधाकर, रम आणि इतर’ या नाटकातील शिवा आपल्या समोर नाट्य उभे करतो. 

सायकलीची शैली, गती आणि तिची ग्रेस, तिचे रुप आणि घाट अस्खलित कलासौंदर्याची प्रचिती देत असतात. माणूस आणि समाजाचे नाते, मुक्ती आणि स्वातंत्र्याची ओढ याविषयीचे व्यापक भान सायकल देते. शिवाय; आरोग्य, संगीत, श्वासोच्छ्वास सायकलीच्या गतीच्या प्रत्येक क्षणाबरोबर आपण अनुभवू शकतो. कधी-कधी वाटतं की आरंभ आणि शेवट यामधलं एक नाटक सायकल सादर करत असते. गिअरच्या प्रत्येक खटक्याबरोबर या नाट्याची रुप-रचना आकाराला येत असते. एक अंक पूर्ण झाला की रंगमंचावरची घंटा ऐकू यावी तसं प्रत्येक गिअरच्या खटक्याबरोबर सायकल-नाटक कुठं चाललय हे लक्षात येतं. आणि, प्रत्येकाचं काळीज खुलवायला असं सायकल-नाटक असतं.

Comments