नाटकवेळा (अतुल पेठेसाठी)

सदासर्वदा पूर्वापार, लेखक-आशुतोष पोतदार/दिग्दर्शक-शर्मिष्ठा साहा 

 १. घंटेपूर्वीची घंटा


प्रकाशाशिवाय प्रकाशमान करू शकतोस - तू हे हिरवे दिवे. हाकारत राहतात तुझे डोळे. उसवलेली रात्र. सूर्याच्या खांद्याला खांदा लावून. 

विरामाची सुरुवात. 


२. आदि 


सजवावा लागत नाही अवकाश. पावलानीशी रेखत जातो वामन. भारावलेली मने ठिबकत जातात आपल्या जागा. दिपून जातो शेजार.
रांगोळीचा प्रदेश. 


३. स्तब्धता 


पर्वताच्या पायथ्याशी बसून राहतो शब्द. समुद्र रेंगाळत राहतो हालचालींशी. ओवतोस तू पर्वत आणि समुद्र. वर्तमानाच्या कुशीत अतीत.
मोगरमाळ. 

४. कॅरॅक्टर्स 


बोलावतोस बेकेट. कधी नरेंद्र तर कधी गोविंद पाठीशी. रात्रीचा करतोस दिवस. दिवसाची पहाट. विरघळत राहतात असण्या-नसण्याच्या सीमारेषा. 

स्वप्नांच्या पारंब्या. 


५. मधली जागा 


कधी शब्द येतो. कधी विराम. कधी श्वास तर कधी सुस्कारा. ताम्रपटावर कोरलेला इतिहास खेळवतोस त्रिमितीच्या पल्याड.
समुद्रमंथनाचा कल्लोळ. 


६. रंगमंचामागचे नक्षत्र 


गुजगोष्टी करतोस निसटलेपणाच्या हुरहुरीशी. नोंदवून ठेवतोस निसरडे रस्ते.  खिशात घेऊन फिरतोस चौथ्या नक्षत्राला. दवाला निरखणारे पान.
कोऽहम्.  


७. रिहर्सल 


भयाचे बुजगावणे हात पसरून उभे. थयथयाट करत. नाटकवेळ आखत राहतोस तिसऱ्या-पलीकडल्या अवकाशात. उघडझाप करत राहतात दरवाजे.
बिजागरींचा रियाज.  


८. अव्याहत   


आकार-उकारात रचत जातोस  आडव्या तिडव्या रेघा. पाताळातल्या बाराखडींचे सूर स्वर्गाशी पैजा मारतात. स्वर्गातले ताल भूलोकावर ठेका धरतात. 

मितीच्या पलीकडे.


-आशुतोष पोतदार

(मार्च २०२१)



Comments

अप्रतिम नाटकवेळा!...
अप्रतिम नाटकवेळा!...
Ashutosh Potdar said…
धन्यवाद. तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्वाची आहें.
Unknown said…
नाटकवेळाचे हे आठ प्रहर फार अप्रतिम ! एकेका प्रहरप्रसंगाशी येऊन , तो नीट वाचून, जाणून त्याचे धागे पुढच्या प्रहरप्रसंगाशी पारंपरिक पद्धतीने जोडून एकसंघ अनुभूतीचा कन्फर्टनेस शोधत वाचक पुढे जाऊ पहातो - तर पुढचा प्रहर त्याहून वेगळी नि मागच्या गोष्टींचा धागा नकळत नाकारत नवी गोष्ट घेऊन येतो...घंटेपूर्वीची घंटा असो, आदि असो की वाचतानाही दीर्घ श्वास घेऊन कवितेशी वा प्रहरांशी “डिस्कनेक्ट” करून निर्विचार करू पहाणारी स्तब्धता असो....प्रत्येक प्रहरप्रसांनुभूती एकाच वेळी स्वतंत्र आणि प्रत्ययकारी...
मितीच्या पलिकडे पहाता येणाऱ्या दिव्य शक्तीच्या माणसाकडे व तो पहात असलेल्या दिव्य शक्तीकडे पहाता येऊ शकण्याची त्याहून दिव्य शक्ती आशुतोष, तू या रचनेत वापरली आहे...

हाकारत राहतात तुझे डोळे. उसवलेली रात्र.

दवाला निरखणारे पान.


उघडझाप करत राहतात दरवाजे.

या ओळी म्हणजे अमूर्त पेंटिंग्जच !

मला फार आवडलाय हा अनुभव.
- दत्ता पाटील, नाशिक
nirav said…
वा सर
खूप छान लिहिलीत कविता....