आ म्हणजे आणखी काय?सकाळ झालीय. तो उठलेला नाही. म्हणजे, जागा झाला आहे. पण, उठून बसलेला नाही. उठून बसण्यापेक्षा त्याला अंथरुणातच बसुन राहावंसं वाटतंय. अंगातली थंडी जात नाही. खरं तर एकुणच थंडी संपतच नाही. सगळे जण म्हणतायत किती महिने थंडी वाजत आहे. वर्तमानपत्रातुन, टीव्हीवर बातम्या आदळतायत नुसत्या: ‘इस साल मौसम का जादु खतमही नही होगा’ ‘थंडीचा काळ असाच चालू राहणार’. ऋतुमान चित्रविचित्र रित्या बदलतेय. आधी पाऊस संपतच नाही असे वाटले. त्याआधी, उन्हाळा संपत नाही असे वाटले. सगळेच आळीपाळीने, अव्याहत सुरू आहे असे वाटतेय. ऋतुंमधील अंतर नाहीसं होत चाललय. सकाळ आणि दुपार एकमेकांना मिठी मारून बसलेत. सकाळ संपतच नाही. थंडी आवरत नाही. काल तर पाऊसही पडला. अजूनही थंडी अंगाला धरून बसलीय. तो अजूनही घरीच आहे. अंथरुणात पडलेला. तो कुस बदलतो. पाय पसरतो. अखेरीस उठून बसतो. बेड शेजारच्या खुर्चीत बसतो. खुर्चीची दिशा बदलून पाहतो. मग बाहेर जाऊन कोचवर बसतो. बसण्याची पोझिशन बदलतो.  उठतो आणि खिडकीतुन डोकावतो. वरच्या मजल्यावरून खालीपर्यंत एकटक बघत राहतो. लांबवर येणारे आवाज कानावर परत परत पडत राहतात. कान जागे राहतात. कुठूनतरी ड्रिलिंग मशीनने खणण्याचे आवाज येत राहतात. कोणीतरी जमीन खणतय. माती ओढतय. तो बेडवर येऊन बसतो. मोबाईलवर मेसेज येऊन पडल्याचा आवाज येतो. तो मोबाईल उघडून पाहतो. कुठूनतरी लांबवरून कसले-कसले आवाज येत राहतात. आवाजाची धरपकड करून त्यांना मोबाईलमधे बंदिस्त करावे असे त्याला वाटुन राहाते. खिडकी लावुन आवाज बंद होणार नाही तरीही त्याला खिडकी बंद करावीशी वाटतो. पण, त्याला उठवत नाही.  तो गप्प बसून राहतो. कान देऊन बाहेरच्या आवाजाला ऐकतो. आवाजाला कान देतो. कानाचे भोक देतो. कानाचा पडदा देतो. आवाज घेत राहतो. कानात आवाज येत राहतात. आवाज येत राहतात. झोपतले तोंड तसेच आहे अजुन, चिकट. बिलगलेले ओठ आणि टाळूला चिकटलेली जीभ ओढून बाजूला काढु पाहातो. चिकट टाळूवर जीभ निसटल्याचा आवाज येतो. बाहेरचा आवाज काही वेळानंतर कधीतरी बंद होतो. आवाज बंद होतो की त्याचे कान बंद करुन घेतात आवाजांना की आवाज सवयीचा होऊन आवाज बंद होतात? त्याची जीभ टाळूला चिकटते. आतला, तोंडातला आवाज तोंडातच राहातो. घशातून कानात शिरतो. कानाच्या पडद्यामागुन डोक्यात शिरतो. 

तो आरशाकडे जातो. आरशासमोर उभा राहतो. आरशात स्वतःला पाहू लागतो. तोंड मोठे करतो. जबडा डाव्या बाजूला वळवतो. जबडा उजव्या बाजूला वळवतो. नाक दाबतो. जिभेवर नाक दाबुन बघतो. नाकावर आलेले काही केस उचकटून काढतो. काही दिवसापुर्वी कुणीतरी त्याचे नाक किती चांगले आहे असे बोलले होते. तेंव्हापासुन तो आपल्या नाकाची विशेष काळजी घेऊ लागला आहे. आंघोळीपूर्वी नाकावर लिंबुची फोड घासणे, रात्री झोपायच्या आधी नाकावर आणि नाकाच्या आत तुप लावुन ठेवणे असे प्रकार करुन तो नाकाचे कोडकौतुक करण्याची संधी दवडत नाही. आता कुणीतरी कान चांगले आहेत किंवा पाय चांगले आहेत असे म्हणण्याची वाट तो बघत असावा. म्हणजे, त्याच्या मनात असा विचार आला की आपण एवढे चांगले आहोत तर आपल्याला या इतर अवयवाबद्दल कुणी कसं काही म्हटलं नाही. कुणी काही म्हटले नसले तरी येत्या काळात नक्की म्हणणार याची त्याला खात्री आहे. त्यामुळेच, गेले काही दिवस रात्री झोपताना बॉडी लोशन लावुन झोपतो. आठवड्यातून एक दिवस अंगभर तेल लावतो. मग, गरम पाण्यात इऊ द कोलोन घालुन त्या पाण्याने आंघोळ करतो. शिवाय, आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर हळद लावून चेहरा साफ करतो. सिनेमात काम करणा-या नटांच्या तोडीसतोड आपण दिसतो याचा त्याला अभिमान आहे. स्वतःवरच्या प्रेमाने त्याने आपल्या डोक्यावरुन हात फिरविला. कानामागचे केस दो-यासारखे खरखरीत झाले होते. कानामागच्या केसांवर पुन्हा एकदा हात फिरवतो. दोन दिवसापुर्वीच शाम्पू वापरला होता तरी केसातला राठपणा तसाच होता. 

काल रात्री त्याला छान झोप लागली. सकाळपासून तो उत्साहाने घर आवरु लागला आहे. आवरता आवरता आज एकादशी आहे की अमावस्या की पौर्णिमा याचा तो विचार करत होता. आपल्याला वार आठवत नाहीत पण एकादशी आणि अमावस्या आठवतेय. याचे त्याला आश्चर्य वाटून राहिले. पण, सोमवार म्हटल्यावर आपण काहीतरी व्हिज्युअलाईज करु शकतो. जसे की रविवार नंतर येणारा दिवस. ज्या दिवशी रस्त्यावर गर्दी दिसते असा तो दिवस म्हणजे सोमवार. पण, तसे एकादशी म्हटल्यावर होत नाही. एकादशी म्हणजे त्याला खाणे आठवते. पण, सोमवार म्हटल्यावर रस्त्यावरची गर्दी दिसते. आजी असताना एकादशीला शेंगदाण्याची आमटी, साबुदाण्याची खिचडी आणि वरीची सोजी व्हायची. आजकाल हे पदार्थ आपण कुठल्याही दिवशी खाऊ शकतो. मग आजच का आठवली एकादशी? मागच्या आठवड्यात वर्ष सुरू झाल्यावर त्याने नवीन कॅलेंडर आणलं. तेच कॅलेंडर तो कालही पाहत होता बराच वेळ. त्याला कॅलेंडर वाचायला आवडतं. तो खोलवर शिरुन विचार करु लागला. काळ कितीतरी पध्दतीने मापता येतो. पण, सोमवार ते रविवार या आठवडी वारात आपण काळाला अडकवून टाकलय. मान तिरकी करुन सरळ रेषेत पाहु लागला. मनात काहीतरी खोलवर चालु असेल तर तो मान तिरकी करुन सरळ रेषेत पाहू लागतो. मान तिरकी करून पाहाण्याचा प्रकार त्याच्या भावाला आश्चर्यचकित करतो. भावाला का आश्चर्य वाटते एवढे? कुणाला तरी का आश्चर्य वाटावे एवढे? त्या दिवशी, भाऊ आणि त्याची मुलगी आली होती तेंव्हा आलाच हा मुद्दा. 

“आता तु असाच एकटा किती दिवस राहाणार आहेस?”, भाऊ.

“माहीत नाही.”, तो.

“माहीत होईपर्यंत घरी चल”

“इथे छान आहे.”

“आईला काय वाटेल.”

“आई नाही आता.”

“आम्ही तुझे कुणी नाही आहोत काय?”

या प्रश्नाचे काय उत्तर त्याने काही दिले नाही. दोघांच्यात एक अस्वस्थ अशी शांतता पसरली. तो मान तिरकी करून सरळ रेषेत पाहत राहिला. भावाला काय करावे हे समजेना. तो खिडकीकडे पाहत राहिला. खिडकीला पडदा लावला होता. पडद्यावर फुले रेखाटली होती. खिडकीवर ठेवलेल्या कुंडीतील फुल वाळत चालले होते. हे फुल कधी आणून कुंडीत ठेवलेय हे तो आठवत राहिला. आठवत राहिला, खिडकीकडे पाहत राहिला. खिडकीच्या पडद्यावर फुले आणि कुंडीतले फुल एकात एक मिसळुन राहिले. 

“मला इथेच राहावेसे वाटते”. तो भावाला म्हणाला.

गेले सहा महिने तो वेगळ्या घरात एकटाच राहात आहे. त्याची आई गेली तेंव्हापासुन त्याला त्या घरात स्वतःला जोडुन घ्यावे असे काही वाटत नव्हते. त्याचा भाऊ, त्याची बायको आणि चार वर्षाचा मुलगा त्याच्याशी चांगले वागत. त्यांनी कधी त्याला त्रास दिला नाही. घरही मोठे होते. अडचण व्हायला नको म्हणुन आई असतानाच त्यांनी घर दोन मजली करुन घेतले होते. खाली तीन खोल्या आणि वरच्या मजल्यावर दोन खोल्या. त्याच्यासाठी वेगळी खोली होती. पण, आता त्याला आपले आपले राहायला आवडते. दररोजच्या घडामोडीत कोणीही असु नये असे त्याला वाटते. आपले आपण उठावे, चहा घ्यावा, नेटफ्लिक्स पाहावे. वाटले तर जेवण करावे. नाही वाटले तर बाहेरुन मागवुन घ्यावे. उरलेल्या वेळात फ्रीलान्सींगचे काम करावे. आई-वडलांनी त्याच्या नावावर ब-यापैकी पैसे आणि प्रॉपर्टी ठेवली आहे. पण, त्याने अजुनतरी त्या प्रॉपर्टीतले स्वतःसाठी काही वापरलेले नाही.

"पण एकटा का राहातोस?" त्याच्या भावाने त्याला परत विचारले होते.

त्याने लॅपटॉप उघडला. पण तो समोरच्या खिडकीकडे पाहत राहिला. त्याचा भाऊ त्याच्यापेक्षा चारपाच वर्षांनी मोठा असेल. त्याच्या भावाशी तो कधी थेट बोलु शकत नाही. ते एकमेकांच्या अंगाखांद्यावर कधी असे खेळलेच नाहीत. पण, तरीही त्यांना एकमेकांबद्दल काही वाटत नाही असे म्हणता येणार नाही.

भावाबरोबर आलेल्या चार वर्षाच्या मुलाने आपल्या वडलांना विचारले होते. "कुठं पाहातोय काका?"

"त्यालाच विचार.", भाऊ.

मुलगा पुढे गेला. त्याने आपल्या त्याच्या हाताला हात लावला. 

"काका, कुठे बघतोय तु?"

"विहिरीत." मग तो हसत सुटला.

"बाबा, हा काय बोलतोय?", मुलगा.

"तु त्यालाच विचार." बाबा.

मुलगा काही बोलला नाही. त्याच्याकडे एकटक पाहत राहिला. तो एकटक खिडकीकडे पाहत राहिला. मुलाने त्याच्या हातावरचा आपला हात काढुन घेतला.

**

तो आपल्याच विचारात तळमळत पडला होता. विचार मनात येत होते जात होते. अंथरुणात तो तसाच तळमळत पडला होता. कधी काळी घड्याळात किती वाजले असतील हा विचार मनात येत नसे. झोप ही झोप असे. ती सहज येत असे. ती सहज संपत असे. लहानपणी कधी कधी घाबरून जाग यायची. पण त्यावेळी, कशामुळे झोप मोडली हा विचार तो करत नसे. तसाच आईच्या कुशीत सरकत असे. झोप  नाही आली तरी किती वाजले असतील असा काही विचार यायचा नाही. तसाच डोळे उघडे ठेऊन, अधुन मधुन मिटलेले ठेऊन घराच्या मागच्या परसदारात काय चालले असेल? तिथे मनी झोपली असेल की त्या भयानक सापाबरोबर खेळत असेल? असे विचार त्याच्या मनात येत असत. मनीला कितीदा सांगितलेले असते नको खेळत जाऊ त्या सापाबरोबर म्हणुन. पण ती ऐकतच नाही. आता तिला घरातच बांधून ठेवायला हवे. आपण, फक्त तिलाच बांधुन ठेऊ शकतो. कारण सापाला कसे बांधून ठेवणार? 

त्याला मग कधीतरी झोप लागे. तिला सकाळी आईच्या हाकेने जाग येई.

मोठा होत गेला तसे झोप येत नसेल तर विचारांची चक्रीवादळं मनात तयार होतात. 

आताही तसेच झाले. झोप मोडल्याचे लक्षात आल्यावर विचारांच्या चक्रीवादळाला सुरु होणार हे त्याला कळून चुकलं. तो उठून बसला. त्याने डोळे चोळले. पायावरचे पांघरूण बाजूला केले. मनाशी काही विचार केला. डोळ्यात खोल शिरणारी रात्र त्याच्या डोळ्यात चांगलीच खुपसत होती. तो अंधारातल्या प्रत्येक कणाकडे तो पाहत राहिला. निरखुन डोळे फोडून मोठे करून पाहात होता. तो सारखा कशाचा तरी विचार करत असतो. येणारी प्रत्येक रात्र त्याच्यासाठी काय देत असेल? हर एक दिवस, न चुकता दरवेळी ही रात्र येते. दररोज येते. सकाळच्या बातम्या लागतातच लागतात. आपल्या पंतप्रधानांचा फोटो दररोज दिसतोच दिसतो. तसा दिवस होतो तशी रात्रही होते. पण, कधी कधी रात्र संपतही नाही. दिवस होऊनही दिवस झालेला नसतो. म्हणजे काही दिवस  तो काहीच करत नसतो. रात्र तशीच चालू राहते. सुंदाडभाऊ सारखा तो पडून असतो. रेलून राहतो भिंतीला. पाठ टेकून राहतो मिळेल त्या जमीनीला किंवा खुर्चीला. त्याला दिवसाचा प्रकाश दिसत नाही. बाहेर दिवस उगवलेला असतो. त्याच्यासाठी मात्र तो कोलगेटच्या पेस्टसाठी तो उगवलेला असतो. कमोडच्या फ्लशसाठी. गोष्टीतल्या कोंबड्याच्या आरवासाठी. वाघबकरीच्या चहासाठी. मग, उजवा पाय उचलू की डावा पाय उचलु हा विचार करण्यातच सकाळ निघुन जाते. रात्रीच्या कभिन्न काळोखात तो कोण असतो? त्याला स्वतःचे काय  दिसत असते या रात्रीत? त्याला स्वतःकडे पाहण्यासाठी रात्रीचा जन्म झाला असावा. त्या रात्री पडलेल्या स्वप्नात एक आरसा त्याच्या समोर आणि दुसरा आरसा त्याच्या पाठीशी होता. समोरच्या आरशावर ‘आ’ असे लिहिले होते पण मागच्या आरशावर काहीच लिहिले नव्हते.  तो संभ्रमात पडला. एकाच आरशावर काहीतरी लिहिलेय पण दुस-या आरशावर काहीच कसे लिहिले नाही. जे काही लिहिलेय ते कुणी लिहिलेय. ‘आ’ म्हणजे काय ? तो विचार करत राहिला. मान तिरकी तिरकी होत राहिली. आ म्हणजे आयेगा. आ म्हणजे ये, आ आओ. आ म्हणजे जांभई की आ म्हणजे आणखी काय? रात्रीची वेळ म्हणजे स्वतःशी बोलण्याची वेळ.      “माझ्याकडेच चमकुन पाहत राहातोस तु आणि आ करतोस माझ्यावर. मलाच माझे जग दाखवतोस. खरे जग दाखवतोस की मला हवे ते जग दाखवतोस की माझ्यातले काळे जग घेऊन येतोस मला दाखवयाला? तु हवा आहेस की नको आहेस हेच मला कळत नाही. मीच तुला ‘आ’ म्हणतोय म्हणुन ‘आ’ दाखवतोस की तु मला ‘आ’ म्हणतोयस म्हणुन मला आ दाखवतोयस?”  यापुढे तो काय बोलत होता याची काही त्याला लिंक लागेना. आपण किती वेळ स्वतःशी बोलतोय याचा विचार करत त्याने डोळे मिटुन घेतले. अंथरुणात लोळत पडल्या-पडल्या समोरच्या आरशात त्याला आपला पाय दिसु लागला. किती काळे झालेत पायाचे तळवे. आपण स्लीपरशिवाय तर कधी घरात चालतही नाही. तरी एवढे काळे. हॉलमधे कधीतरी बिनस्लीपरचे फिरतो आपण. हा आरसा सारं काही काळं तेच दाखवतोय. त्यामुळे, आपल्याला पाय काळा दिसतोय. आरसा आपण जसे आहोत तसे दाखवतो की त्यापेक्षा आपल्या मनातले काही दाखवतो. की आपल्याला पाहिजे त्याच्या बरोबर उलटे दाखवतो. मनात विचारांचा कल्लोळ सुरु झाला. आरसा बेभरवशाचा ठरू शकतो हे त्याला कळून चुकले होते. पण त्याची जाणिव झाली नव्हती. आपण सहसा कधी कुणापासुन दगा खात नाही. तरीही सावध राह्यला हवे. पण, आरशाकडे पाहिल्यावाचुन त्याला करमत नाही. तो बेडवर उठून बसला. स्वतःच्या बसलेल्या मूर्तीकडे पाहुन त्याला छान वाटत राहिले. आपले पोट किती छान आहे. वाढलेले नाही. पण, वाढु शकते या भितीने तो पोटावर हाताने थापटू लागला. जीममध्ये वर्कआऊट वाढवायला हवे. आरशाकडे पाहुन तो खुदकन हसला. केसावरुन अलवार हात फिरवला. त्याच्या कानामागच्या केसांचा पुंजका वाढुन तो राठ झाला होता. मान वळवुन वळवुन आपल्या कानामागे काही दिसत नव्हते. पण त्याला त्या केसांच्या पुंजक्याचे काय झालय हे दिसत नव्हते. मोबाईल घेऊन मागुन सेल्फी घेतली. त्यात काही नीटसं दिसत नव्हतं. या मोबाईल कंपन्या कसले हॅंडसेट्स काढतात. फुकट पैसे द्यायचे. साल्यांना, फासावर लटकवायला हवं. तो रागाने मनातल्या मनात बोलला. शेवटी दोनचारदा प्रयत्न केल्यावर एकदाची चांगली सेल्फी मिळाली. केसांचा पुंजका छान दिसत नव्हता. उद्याच्या उद्या हेअर सलूनमधे जाऊन पुंजका कापुन टाकायचं ठरवलं आणि तिरका होत तो आरशात पाहत राहिला.

**

लहानपणापासून तो केस फारसे वाढवत नसे. वाढवलेच तर केस डोक्याच्या वरवर वाढत. काही दिवसात केसांची टोपी होत असे. अशावेळी केसात कंगवा फिरविणे अशक्य होई.  त्याच्या लहानपणी टोपीसारखे केस दिसेपर्यंत त्याला कुणी केस वाढवु देत नसत. थोडे तरी केस वाढू लागले की त्याची रवानगी केशकर्तनालयात होत असे. केशकर्तनालय हे दुकानाच्या पाटीवर लिहिलेले नांव. अन्यथा, त्या दुकानाला न्हाव्याचे दुकान म्हणत. केस कापणारे मामा म्हणजे दिलखुलास व्यक्ती. गावभरच्या बातम्या ऐकवुन केशकर्तनालयात येणा-या लोकांचे मन खुश ठेवण्याचे काम मामा करत असत. ज्या गतीने डोक्यावर मामांची कात्री फिरे त्याच गतीने त्यांच्या तोंडातुन शब्द बाहेर पडत. त्यांच्या बोलण्यात कात्रीचा आवाजही ऐकू येईनासा होई. घरचे असे सांगत की त्याचे जावळ याच मामांनी काढले. पण, जावळ काढताना त्याने कोणताही त्रास दिला नाही. जावळ काढताना मनापासुन तो शांत राहिला आणि त्याने जावळ काढतानाचा फोटोही काढुन दिला. अगदी अलीकडेपर्यंत हा फोटो आई सर्वांना दाखवायची. आता आईच नसल्याने कुणाला त्याच्या त्या फोटोचे कौतुक वाटणे शक्य नाही. जसे वय वाढत गेले तसे त्याला बरेच छंद लागले. पण, केस वाढवायचा छंद काही लागला नाही. दाढी वाढवुन पाहीली पण केस काही वाढवु शकला नाही. केस वाढु लागले की त्याला विचित्र भावना यायची आणि तो पटदिशी हेअर सलूनमध्ये जाऊन केस कापून यायचा.   

रात्री हाताला लागणारा केसांचा पुंजका असा का लागत आहे हा विचार करत तो झोपी गेला. झोपी गेल्यावर त्याच्या मनात काय यावे यावर काही त्याचा ताबा नसे. कुणाचा असतो म्हणा. पण त्याच्या मनात विचारांची शृंखला असते तशी त्याच्या मनात स्वप्नांची शृंखला तयार होते. कधी कधी सकाळी उठल्या उठल्या आपल्याला कुठले स्वप्न पडले होते याचा विचार करण्यात त्याची सकाळ संपुन जाते. आज त्याच्या मनात विहिरीचे विचार येत राहिले. अलीकडच्या काळात त्याने विहीर पाहिलेलीही नाही. जी काही पाहिली आहे ती लहानपणी. पण विहीर त्याला नितांत आवडते. लहानपणी अनेक तास त्याने विहिरीवर घालवले होते. आड, बाव, कूप, गोल विहिर, चौकोनी विहिर, पुष्करणी, बारव, भुडकी, वाव अशी नाना नावं विहिरीला असली तरी दोनच नावाच्या विहिरी त्याला माहिती होत्या: पाणी ओढायसाठीचा आड आणि पोहायसाठीची विहीर. पाणी ओढायसाठी आडावर घागर सोडली की त्या पाण्यात पडतानाचे दृष्य त्याला खेचून घ्यायचे. विहिरीच्या कठड्यावर बसल्या बसल्या त्याला स्वतःला पाहात येत असे. पाण्याबरोबर आपणही त्यात का शिरु नये असा प्रश्न पडायचा. पण, घागर पडुन आडातले पाणी डचमळले की त्याचा आडातल्या पाण्यातला इंटरेस्ट संपून जायचा. मग, तो आडाभोवती चिमण्यांनी बांधलेल्या घरट्यांकडे बघत राहायचे. सकाळ संध्याकाळ तो पोहण्यासाठीच्या विहिरीवर जाऊन बसायचा. रविवारची शाळा नसायची तेंव्हा तो विहिरीवरुन संध्याकाळपर्यंत घरी यायचा नाही. दहावीला गेल्यावर रविवारीही सकाळची शाळा असायची. ती एक्स्ट्राच्या क्लासेसची शाळा असायची. त्याला शाळा काही आवडायची नाही. एक्स्ट्राचे क्लासेसही आवडायचे नाहीत. मग, तो सकाळचे क्लासेस बुडवून पोहायच्या विहिरीवर जाऊन पाण्यात पडायचा. शाळेतली हुशार मुले त्याला किती पाण्यात पडतोस म्हणुन चिडवायची. एकदा रविवारचे पोहायला गेला पण जाताना बदलण्यासाठी दुसरी चड्डी घेऊन जायचा विसरला. त्याला पोहायचे तर होते. मग, आहे त्या चड्डीवर पाण्यात उतरला. पोहून झाल्यावर ओली चड्डी विहिरीवरच्या पम्पिंग मोटरच्या खांबावरल्या कपाटावर वाळत टाकली. विहिरीत बघत बसला. चड्डी वाळत राहिली. पण, पुर्ण चड्डी काही वाळली नाही कारण एक्स्ट्राच्या क्लासला जायचे होते. शेवटी, जेवढी काही वाळली होती तेवढी चड्डी घालुन तो क्लासला पळाला. वर्गात शिरताना त्याची अजुनही ओली असलेली चड्डी पाहुन काही जण फिदीफिदी हसले. शिक्षकही त्याच्याकडे एकटक पाहातच राहिले. तो मागच्या बाकावर जाऊन बसेपर्यंत त्याच्याकडेच बघत राहिले. सर्वजण त्याच्याकडे पाहत राहिले. "आलात थेट विहिरीवरुन राहिलात उपकार करुन. आता जा वेळ असेल तेंव्हा केशकर्तनालयात आणि राहा आईबापावर उपकार करुन." शिक्षक त्याच्याकडे पाहत बोलले. राग आला की ते यमकात बोलत. पण कधी मारत नसत. त्याने आपल्या डोक्यावर हात फिरवला. पाणी ओघळत होते. हात वर करुन दंडावरच्या शर्टाने त्याने डोके पुसले. लाजलेला तो खाली बसला.

**

केसांची स्वप्न का पडत आहेत आपल्याला? शिवाय लहानपणीची स्वप्न पडतायत. भूतकाळ आठवतोय. आपण नॉस्टॅल्जिक होतोय. वर्तमानात काही नसेल तर भूतकाळ आठवतो. असे कुणी म्हणाले होते की त्याने तसे कुठेतरी वाचले होते हे त्याला आठवेना झाले होते. तो डोळे चोळत राहिला. चार दोन मेसेजेस वॉट्स ॲपवर येऊन पडले होते. मेसेजेस त्याने उघडून पाहिले. त्यात, एक रघुचा आणि दुसरा पायलचा होता. बाकीचे दोन तीन असेच फॉरवर्ड्स होते. रघु विचारत होता डिझाईन तयार झाले काय. तर, पायल विचारत होती विकेंड ट्रिप करायची काय. रघुने विचारलेल्या प्रश्नाला त्याने उत्तर दिले पण पायलने विचारलेल्या प्रश्नाला तो काही उत्तरला नाही. त्याला पायल बोअर करते. तो तिच्यापासनं शक्य तेवढा लांब राहतो.  एकुणच, कुणी फार जवळ आलेले त्याला पसंद नसते. जवळ आले की तो काय खातो, कुठे जातो, त्याची गर्ल फ्रेंड काय करते असल्या चौकशा येतात. ते त्याला आवडत नाहीत. रघु कामापुरतेच बोलतो ते त्याला आवडते. अर्थात, त्याला मैत्रिणी वैगरे आवडत नाहीत असं नाही. त्याची खुप छान मैत्रिण होती. ती लांब केसांची आणि तिचे नाव लैला होते. लैलाची आणि आईची ओळखही करुन दिली होती. आईलाही लैला आवडायची. तिचे नांव आईला आवडायचे. पण त्याच्या भावाला आणि त्याच्या बायकोला लैला हे नाव आवडायचे नाही. आई तिला सालपापड्या तळून पाठवायची. मग ती त्याच डब्यातुन आईला मफिन्स करुन पाठवायची. त्याला डबे देवाणघेवाण करायला आवडायचे. तिला त्याची आई आवडत असे. ती म्हणायचीही, "तुझी आई तुझ्यापेक्षा छान आहे. उसकोही मेरी गर्लफ्रेंड बनाऊ." ती एकटीच राहायची. तिची रुम पार्टनरही होती. रुम पार्टनर नसायची तेंव्हा तो तिच्या खोलीवर जाऊन आला होता. तिने त्याला आपल्या केसांची वेणी घालायला शिकविले होते. पहिल्या दमात त्याला केसांचे पेरही पकडता येत नव्हते. दोनदा प्रयत्न केल्यावर तिची वेणी झाली. वेणी घातल्यावर ती वेणी त्याने सोडुन केस मोकळे केले. त्याला राहावले नाही. त्याने तिच्या ओठांचे चुंबन घेतले. तिलाही राहावले नाही. तिनेही चुंबन घेतले. दोघांनी एकमेकांच्या पाठीवर हात फिरवला. एकमेकांच्या कुशीत शिरले. 

आई गेली तेंव्हा तिनेच त्याला खुप सपोर्ट दिला. 

आई गेल्यानंतरच्या आठवड्यात तो तिच्या घरी गेला होता. त्याला आईच्या आठवणीने इमोशनल व्हायला झाले होते. त्याने तिचे केस मोकळे केले. तिने त्याच्या डोक्यावरुन मायेने हात फिरविला. दोघांनी एकमेकांची चुंबने घेतली. त्याने तिचे कपडे काढले. तिने त्याचे कपडे काढले. पण, त्याच्याकडे कंडोम नसल्याचे तिच्या लक्षात आले. मनाविरुद्ध जाऊन त्यांनी परत कपडे चढवले.

खोलीत तिची रुम पार्टनर नसे तेंव्हा ते खोलीवर भेटत असत. फार नाही, क्वचित. इतर वेळेस, बाहेर एखाद्या कॉफी हाऊसमधे पॅटर्न ठरला होता. या पॅटर्नचा तिला कंटाळा आला होता. तिला हे सगळं बोअर व्हायला लागले. त्याला कळेचना आपल्यात असं काय झालं की तिला बोअर व्हायला लागला. त्याचे त्याला आश्चर्य वाटायचे. "तुला वर्षभरात कसे काय बोअर व्हायला लागले", त्याने एक दिवस तिला विचारले.

"माहित नाही, यार." ती.

"मी बोअर करतोय?" तो

"नो यार. इट्स नॉट युवर फॉल्ट." ती.

"देन?" तो.

"ओव्हर थिकींग मत करो." ती.

"ये क्या आन्सर है?", तो. 

"तुमसेही सिखा है." ती

"क्या? ऐसा आन्सर देना?" तो.

"नही, ओवर थिंकिंग."

माझ्याकडून शिकतेही म्हणते आणि माझ्याबरोबर बोअरही होते याची त्याला चिडचिड झाली. आपले आणि लैलाचे असे का झाले याचा विचार करुन त्याची मान तिरकी होत राहिली. त्याच्यासाठी लैला महत्वाची होती. ती नसल्याची पोकळी जाणवत होती. स्वतःच्या मनात स्वतःबद्दल राग राग होत होता. कारण आपण आपण तिचे मन समजु शकलो ही भावना. त्याचे मन हेही सांगत होते की काही दिवसांनी ती पहिल्यासारखी होईल. पण, पुढचे पंधरा दिवस काही तिचा मेसेज आला नाही. तिला मेसेज पाठवण्या सारखे नव्हते. शिवाय, त्याची आई गेल्यावर त्याच्या आयुष्यासंबधातल्या जनरल गप्पा मारणारे कुणीच राहिले नाही. त्याच्याशी ती जनरल बोलु शकायची नाही. दोघांच्या भेटीगाठी संपल्या. कधी कधी त्याला तिची खुप आठवण येते. तिलाही त्याची आठवण येत असणार. पण, तेवढ्यापुरतीच. मधे, राहवले नाही म्हणुन त्याने तिला ‘Thinking of you' असा मेसेज पाठवला. वॉट्सॲपवरुन दोघांचे खुप प्रेमाप्रेमा चाललेले असे. पण, यावेळी ‘Thinking of you' ला तिने तो त्या दिवसभरात मेसेज पाठवला नाही. तो अस्वस्थ होता. उगीच मेसेज पाठवल्याची गिल्ट दिवसभर राहिली. आरशासमोर उभारुन त्याचे स्वतःशी बोलुनही झाले.

एक मन:  कशाला रे तुला नस्ती उठाठेव. बसावे थोडे शांत. 
दुसरे मन: शांत बसवत नाही. जीव लावलाय.
एक मन:  तिचाही जीव आहे.
दुसरे मन: जीव असता तर मेसेज पाठवला असता.
एक मन: कामात असेल. धीर धर.
दुसरे मन: आणि तिने सांगितलेय की तुला तु बोअरिंग आहेस.
एक मन: मी बोअरिंग आहे असं नाही. पॅटर्न बोअरिंग आहे.

दुस-या दिवशी तिचा मेसेज आला. "I really miss Kaku."

**

रघुच्या मेसेजला उत्तर पाठवून चार तास उलटून गेले. त्याने पोहे करुन खाल्ले. दोनदा चहा झाला. घराच्या मालकाला फोन करुन झाला. फेसबुकवर फोटो बदलून झाले. आता उठून काम करायला हवे याची त्याला जाणीव झाली. ठरवुन तो उठला. लॅपटॉप उघडला. खिडकीचा पडदा सरकवला. खुर्ची टेबलाजवळ ओढली. टेबल हलवून घट्ट बसवुन घेतले. समोर ठेवलेल्या बाटलीत पाणी आहे काय ते पाहिले. त्यात थोडे पाणी होते. बाटली नंतर भरुन घेऊ असा विचार करुन त्याने आपल्या लॅपटॉपकडे नजर वळवली. लॅपटॉप सुरु केला आणि काम करावे म्हणुन बसला. पण लगेच बाजूला सरकवला. त्याला काही सुचेना. का कुणास ठाऊक त्याचे लक्ष लागेना. त्याचे लक्ष खिडकीकडे गेले. तो उठला आणि खिडकीकडे चालत गेला. खिडकीबाहेर सारं ओलं ओलं दिसत होतं. रात्रभर पाऊस पडला असावा. पाऊस कधीही पडतो याची त्याला चिडचिड झाली. रस्त्यावर जागा मिळेल त्या दिशेने पाणी आपल्यासाठी जागा करुन घेताना त्याला दिसले. दिसेल तिथे लग्नाच्या जेवणानंतर विस्कटलेले अन्न बघावे तसे पाणी आजूबाजूला साठले होते. जागा मिळेल तिथे दाटीवाटीने ओघळ तयार झालेत. यातुनच आपल्याला भाजी वगैरे सामान आणायला जायला लागणार. त्याच्या अंगावर काटाच आला. आपण ओघळावरनं पाय नाचवत पाण्याला पाय न लावता आपण उडत जाऊ असे त्याला वाटते. आपण भाजी आणायला उडत चाललोय असे आपल्याच मनाला सांगितले. मनातल्या मनात तो चालत राहतो. अधेमधे उडत राहातो तर आता समोर टी आकाराचे वळण दिसते. डाव्या बाजूला जाणारा रस्ता बाजाराकडे जातो तर उजव्या बाजूला जाणारा टपरीकडे. डाव्या बाजुला गेलं की भाजी मिळते तर उजव्या बाजुला हेअर सलुन, टपरीवर चहा आणि सिगरेट. बस झाले मनातल्या मनात बोलणे. 

हेअर सलुनमधे जावे आणि सिगरेट मारुन चहा पिऊन यावा म्हणून तो लॅपटॉपचे तोंड मिटवुन ठेवतो. 

पॅंट घालुन आवरायला आत  आरशासमोर उभा राहतो. आरशासमोर काहीतरी विचित्र वाटायला लागते. आपण असे का झालोय हेच त्याला कळेना. आपल्या डोक्यावर हे काय नवीन आलेय याचे काही त्याला कोडे उलगडेना. आरशात आपल्या डोक्याला भिंतीवरल्या कोळ्याच्या जाळ्यासारखे केस दिसु लागतात. जागोजाग पिंजारलेले केस त्याच्या कपाळावर रुळत होते. रुळत होते म्हणायला खुप काही रेलून बसले नव्हते. तर, काहीतरी अनाकलनीय. उंच डोंगरावरुन खाली दिसणा-या झुडपासारखं त्याचं डोकं दिसत होतं. केसांची वेणी घालायला तो शिकलाय. पण त्याला अशा केसांची वेणीही घालता येणार नाही. कसे केस दिसतायत? हातात कंगवा घेतो. केस विंचरू लागतो. पण, कंगव्याचे दात केसातुन निघतच नाहीत. मग दुसरा कंगवा घेतो. तोही केसात अडकून बसतो. मग अजुन एक कंगवा घेतो. तोही केसात अडकून बसतो. आता काय करावे हेच त्याला कळेनासे होते. त्याला एक आयडिया सुचते. तसेच केस आणि कंगवे घेऊन तो बाथरुम मधे जातो आणि केसांवर पाणी मारुन घेतो. केस भिजवून बघतो आणि केसातुन कंगवा फिरवतो. केस फक्त हलल्यासारखे वाटतात. 

हेअर सलुनकडे वळतो.

हेअर सलुन मधे केस कापणारे वेगळे आणि नंबर लावुन घेणारे गृहस्थ वेगळे. ते गृहस्थ समोर आले. 

“सर, बैठो नां. एक ही नंबर है.”

“ ओके. मेरा थोडाही काम है”

“शेव्हिंग करनी है?”
“ नही बाल करने है.”

“ हो जाएगा, सर. ये लिजिए पेपर.”
हेअर सलुन मधे एका बाजुला तीन आणि दुस-या बाजुला तीन अशा सहा खुर्च्या मांडल्या होत्या. गर्दी तुरळकच. तरी दोघेजणच रांगेत होते. रविवार असता तर अजुन गर्दी असती आणि बराच वेळाचे वाट पाहणे असते. त्याच्याशिवाय दुसरे गि-हाईक होते ते मोबाईलवर बिझी होते. मोबाईलमुळे वाट पाहण्यातला त्रास कमी झाले होता. वाट पाहाण्यापेक्षा बिजी राहाण्याने माणसाची अनेक त्रासातुन सुटका होत असेल. त्याच्या जवळही मोबाईल होता. पण, त्याला मोबाईलमध्ये कमीच इंटरेस्ट होता. अर्थात, त्याला लोकांशी बोलण्यातही कमीच इंटरेस्ट असतो. त्याला विचार करण्यात जास्त इन्टरेस्ट असतो. कसला विचार करण्यात असतो किंवा विचार खुप महत्वाचे असतात काय असले विचार त्याच्या मनात येत नसतात. विचारांच्या मालिकांत राहण्यात त्याने स्वतःला गुंतवून घेतलेले असते. विचार करणे प्रयत्नपुर्वक होत नसते. ते सहज होत असते. उदाहरणार्थ. आता या दुकानात आरशात पाहुन त्याच्या मनात विचार येत आहेत. सहा खुर्च्यांवर बसलेली सहा माणसे त्यांच्या भवताली असलेल्या आरशांत पाहातातय. इतके आरसे असताना प्रतिबिंबांची प्रतिबिंबे असे होऊन एकुण दिसणा-या प्रतिबिंबांची मोजणी तो करत आहे. आरशात दिसणारी प्रतिबिंबे सोडून एकमेकांच्या डोळ्यात दिसणारी प्रतिबिंबे वेगळीच. इतक्या सा-या प्रतिबिंबात खरे कुठले प्रतिबिंब मानायचे? 

"सर, आपका नंबर आया है." नंबर लावून घेणारे गृहस्थ त्याच्याकडे पाहुन बोलले.

"हां."   

तो इकडे तिकडे पाहत खुर्चीकडे पोहोचला. आरशात पाहात या सगळ्यांच्यात आपण किती उंच आहे याचा त्याला अभिमान वाटत होता. केस कापणा-या गृहस्थाने खुर्ची वळवुन त्याला बसायला जागा दिली. त्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याने विचारले, "कितना कट करना है?"

"छोटे बाल करने है."

"अभी तो छोटे है. और छोटे करेंगे तो बहुत छोटे दिखेंगे आप."

"कान के पिछे तो कितने बडे हुये है बाल"

" नही तो. देखिये." त्याने त्याच्या डोक्याच्या मागे आरसा धरुन त्याला दाखवले.

"अरे ऐसे  कैसे हो सकता है. मेरे आरसे में तो दिख रहा था."

"नही सर ऐसा कुछ बडा हुआ नही है. प्लेनही है."

"पर मुझे तो दिखा. मैने फोटो भी निकाला है. ये देखो ये फोनपर."

त्याने दाखवायला फोन काढला. क्षणात त्याच्या लक्षात आले की आपण काढलेले फोटो डिलीट केले आहेत. फोन बाजुला ठेवला.

"मुझे कलही दिखा आरसे में. कमालही हुआ."

"हा सर. मै आरसे के साथही होता हुं. आरसे कमालके होते है. फस सकते हो आप."

"बाल काटने के लिये मै बाद मे आता हुं", तो तुटक बोलला. अंगावर घातलेले फडके बाजुला केले. दाबुन खुर्ची वळवली. भरदिशी बाहेर निघुन आला. 


**


भाजी घेतली नाही. टपरीवर जाऊन सिगारेटचं पाकीट विकत घेतले. आपला दिवस कसा विचित्र चालला आहे याचा विचार करत सिगारेटचे झुरके मारले. रस्त्यावरचे पाण्याचे ओघळ आपापल्या जागी स्थिरावले होते. सिगरेटच्या धुराला विचित्र चव होती. टपरीवाल्याला विचारलेही "सिगरेटच्या तंबाखुत भेसळ असते काय हो भाऊ?" पुडीने तोबरा भरलेला टपरीवाला नुसताच हसला. असे नुसतेच हसणा-या लोकांचा त्याला राग येतो. राग दाखवायचा काही मार्ग नव्हता. सिगरेट विझवून बाजुच्या डब्यात टाकली. पाण्याच्या ओखळावर दोन उड्या मारत तो चालु लागला. पण, उड्या मारतोय हे कुणी बघेल म्हणुन तो लाजला आणि नेहमीच्या गतीत चालु लागला. मनातला वैताग काही संपलेला नव्हता.


घरी आल्या आल्या बेडवर अंग टाकले. पसरलेले पाय समोरच्या आरशात अधिकच काळे दिसू लागले होते. आई असताना तिला आनंद दिला नाही म्हणुन हे काळे होत आहे की भावाच्या छोट्या मुलगीबरोबर नीट वागत नाही म्हणुन हे पाय काळे दिसत आहेत की आपण स्वतःचे पाय साफ ठेवत नाही? आपण स्वतःतच इतके मशगुल असतो की आजुबाजूचे काहीच दिसत नाही नीट आपल्याला? उठुन सिगरेट प्यायची इच्छा होतेय पण उठवत नाही. उठुन वॉशरुमला जायचय पण उठवत नाही. त्याला त्याचा स्वतःचाच राग येऊ लागला होता. आपल्याला गर्लफ्रेंडलाही नीट जपता आलं नाही. स्वतःलाही नाही जपता येत. मग, आरसा दाखवतो आपल्यातलेच काळे जग. तो स्वतःशी बोलत राहिला. स्वतःला सांगत राहिला. पडल्या पडल्याच सिगरेट काढली, पेटवली आणि कुशीवर वळुन झुरके सोडू लागला. सिगरेटचा धूर खोलीभर पसरुन गुढ असे वातावरण तयार झाले होते. छतावर गप्प लटकणारा पंखा डोळे फोडुन बघत होता. विजेची बटने, कोळीष्टके, बाजूला लावलेले शो-पिस सगळेच एकामागोमाग एक करुन त्याच्याकडे संशयाने पाहात होते. सिगरटची राख टाकायला पाहीजे म्हणुन अनिच्छेनेच तो उठला आणि आरशाजवळ ठेवलेला ॲश ट्रे उचलला आणि त्यात उरलीसुरली सिगरेट विझवली.


आरशासमोर उभा राहुन तो स्वतःकडे पाहु लागला. आपल्याला स्वतःचा एवढा आभिमान वाटतो पण मग, लैलाला का आपला कंटाळा आला? आपण तिच्या सेन्सिबिलीटीला समजुन घेतले नाही की तिच्याबरोबर फक्त कामापुरते राहिलो? तिच्या केसांची वेणी घालुन द्यायला कुणीही येईल. मग आपण काय फरक पाडला तिच्या आयुष्यात? आपल्याशिवायचे आयुष्य ती इतक्या सहजतेने कसे आपलेसे करु शकते?


खोलवरच्या अस्वस्थतेने त्याने स्वतःच्या डोक्यावरुन हात फिरवला. हाताला लागणारे कानामागचे केस आता वाढलेले होते. आरशात पाहुन तो डोक्यावरुन पुन्हा हात फिरवु लागला तर राठ केस डोक्यावर सगळीकडे वाढलेले हाताला लागले. केसांची टोके हाताला बोचु लागली होती. एखाद्या जनावराचे डोके वाटावे तसे त्याला स्वतःचे डोके वाटु लागले. तरीही त्याला स्वतःच्या डोक्यावरुन हात फिरवावासा वाटत होता. स्वतःच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत होता पण केस टोकदार होत चालले होते. अंग गरम होत होते. अंगातुन वाफा बाहेर पडु लागल्याचा भास होऊ लागला. अस्वस्थेतेने त्याने अंगातला शर्ट काढुन टाकला. पॅंटही नको आणि घातलेली बॉक्सीची चड्डी नको म्हणुन काढुन टाकली. आता तो स्वतःच्या उघड्या देहाकडे पाहु लागला. आरशावरचे ‘आ’ हे अक्षर वटारलेल्या डोळ्यांनी आपल्याकडे पाहातेय असे वाटू लागले. ‘आ’चे डोळेही आपलेच डोळे असल्याचा भास होऊ लागला. आपलेच डोळे त्याला थकवत राहिले. त्याची उभं राहण्याची ताकदही संपत चालली होती. त्याला पडावेसे वाटते होते. त्याने घामाळलेले शरीर बेडवर झोकून दिले. अंधुक होत चाललेल्या पंख्याकडे पाहात तो स्वतःशी बोलत होता की कुठल्या स्वप्नात होता हे त्याचे त्यालाच कळत नव्हते.    

('मुक्त शब्द' च्या ऑगस्ट २०२० च्या अंकात प्रकाशित. )

Comments