इचलकरंजीच्या रस्त्यावर: अमीर ख़ाँ साहेबांचा नंद राग आणि चौसाळकर सर


गतकाळातला एखादा प्रसंग अचानक समोर येतो. तो येतो आणि आताच्या क्षणात तो प्रसंग परत घडू लागतो. एखादे कारण घडते आणि कुठल्यातरी एखादा प्रसंग, त्या प्रसंगातली व्यक्ती आपल्याशी पुन्हा बोलू लागते. आणि, आपण तिथे, इथे, दोन्हीमध्ये असे घरंगळत राहतो.

उस्ताद अमीर ख़ाँ साहेब आळवत असलेला नंद राग, आताचे कारण.

काही वर्षांपूर्वी कोल्हापूरहून प्रो अशोक चौसाळकरांना इचलकरंजीच्या आमच्या कॉलेजात कार्यक्रमासाठी घेऊन जात होतो. गांधी अभ्यास केंद्राचा कार्यक्रम आमच्या कॉलेजात आयोजित केला होता. कॉलेजचे प्राचार्य कासार सर कॉमर्सच्या अभ्यास शाखेतले. पण इतरही विषयांत रुची असणारे ते. (विशेषकरून, माझ्या नाटकातल्या कामाला त्यांनी खूप पाठिंबा दिला.) तर, गांधी अभ्यास केंद्र आणि इचलकरंजीची समाजवादी प्रबोधिनी मिळून एक छोटे अभ्यास शिबीर आयोजित केले होते. त्यासाठी, चौसाळकर सर.

सर म्हणजे विलक्षण साधे व्यक्तिमत्व. मी त्यांना पाहिलेय ते झब्बा आणि विजारीत. खांद्याला शबनम असायची. पण, ते कवी असल्याचे ऐकिवात नव्हते. राज्यशास्त्राचे अभ्यासक आणि प्राध्यापक म्हणून त्यांना मी पाहत आलो, ऐकत आलो. शिवाय, 'नवरात्र' हे त्यांचे अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी असणारे पुस्तक. तर, चौसाळकर सर कमी बोलणारे पण संवाद साधणारे. ज्यांच्यापासून दूर राहावेसे वाटणार नाही असे अभ्यासू आणि चिंतनशील व्यक्तिमत्व. थांबून बोलायचे. बोलण्यात तटस्थता असायची. पण, आपलेपणा असायचा. बोलण्यात वैचारिक भूमिकेचे अधिष्ठान असायचे पण पुढच्याचं ऐकायचा मोकळेपणा असायचा. शिवाजी विद्यापीठातल्या गांधी अभ्यास केंद्रात सरांचे आणि इतर अभ्यासकांचे विचार ऐकण्याचा वेगळाच अनुभव असायचा.

तर, हाय-वे सोडून इचलकरंजीच्या रस्त्याला गाडी लागल्यावर सीडी प्लेअरवर उस्ताद अमीर ख़ाँ साहेबांचा राग नंद लावला. कोल्हापुरातल्या महाद्वार रोडवरल्या वांगी बोळाच्या कोपऱ्यावरच्या दुकानात सीडीमध्ये पाहिजे ती गाणी घालून मिळायची. कुठून कसे आठवत नाही पण अमीर ख़ाँ साहेबांच्या गाण्याचा लळा लागला होता. आताही आणि तेंव्हाही गाण्यातलं कळायचं नाही. पण, आमच्या घरातल्या भजनामुळे असेल किंवा दसरा चौकात हॉस्टेलला शिकत असताना शिवाजी पुतळ्याजवळच्या नाईकांच्या खानावळीत जेवायला जायचो तेव्हा माजगांवकर गुरुजीही तिथे जेवायला यायचे त्यांच्या मायेमुळे असेल... राग संगीत आणि गाणं आजूबाजूला होतं.

तर, गाडीत नंद राग सुरु झाला आणि क्षणभरात चौसाळकर सर, छोटं स्माईल देत "अहो, तुम्ही अमीर ख़ाँ लावलाय." पॉज. इचलकरंजीच्या रस्त्यावरची धावणाऱ्या झाडांची रांग शांत, निरामय अशा स्वरांना साथ करत राहिली. राग कॉम्प्लेक्स आहे म्हणतात पण गाण्यात साहेबांच्या गळ्यात गोडवा. त्या इचलकरंजीच्या रस्त्यासारखाच संथ जाणारा ख़ाँसाहेबांचा स्वर, मधेच एखादी लकेर. सांगली फाट्यावरुन इचलकरंजीकडे वळताना एक असे वळण येते तशी ती लकेर. गाडी चालवत सरांच्या हरकलेल्या चेहऱ्याकडे पाहतो तर ते बोलले, "तुम्ही जन्मलाही नसाल त्यावेळी अमीर ख़ाँ साहेब गाऊन झाले आणि त्यांचे निधनही झाले असेल. पण, ते अजूनही ऐकले जातात." मध्ये एखादा संवाद,गाण्यातला गाण्यातली आवाज, शांतता असं होत आम्हाला पोहोचायचं होतं त्या आमच्या व्यंकटेश महाविद्यालयात आम्ही पोहोचलोही. नंतर, दिवसभरात आम्ही एखादे वाक्य बोललो असू. पण अमीर ख़ाँ चा नंद राग तर रेंगाळत राहिला त्या दिवसात. आता इचलकरंजी सोडून काळ लोटला. चौसाळकर सर भेटून कितीक वर्षे झालीत.

अमीर ख़ाँ साहेबांचे छायाचित्र उमटत राहते. त्यांचे स्वर शांत पसरत राहतात आणि काळ आळवत राहतात.

Comments