नवल

प्रिय प्रशान्त,

काही दिवसांपूर्वी तुझी 'नवल' ही कादंबरी वाचली. कादंबरीने आनंद दिला. आनंद, त्यातील भाषेमुळे. भाषा कधी निवेदनासाठी, कधी वर्णनासाठी, कधी संवादासाठी, कधी विधानांसाठी येत राहते. बहुतेक वेळेला ती सहज, असलेपणाच्या रूपात येत राहते.  वाक्यांची रूपे छोट्या कविता कविता वाटाव्यात अशी सहज येत जात राहतात. गद्य आणि पद्य यांची सरमिसळ होत स्थळ-काळ अवकाश निर्मितीच्या कितीतरी शक्यता कादंबरीतून समोर येत राहतात. कादंबरी मी थांबत थांबत वाचत गेलो. स्थिरावून, काय वाचलो हे समजून घेत गेलो तर जाणवले की तू भाषेबद्दल सजग आहेस. ठरवून सजग वाटत नाहीस. तर, सहज. सहज भाषिक अविष्कार तुझ्या शब्द पेरणीतुन येताना जाणवला. 

एक प्रश्न मनात येत राहतो-कथनात वर्णने असतात. मग, सौंदर्य? वर्णनातले सौंदर्य कादंबरीतल्या स्थळ आणि व्यक्ती चित्रणाच्या अवाढव्य सामाजिकतेत- संदर्भ चौकटीत  कादंबरी हरवून जाऊ न देत 'नवल' मध्ये येते. भाषा कशाची तरी वाहक असते असे असले तरी ती भाषा स्वतःतच एक अविष्कार असते याची जाणीव कादंबरी करून देत राहिली. 

'नवल' मधले कुणी ठणकावून बोलत नाही. कुणी सिद्ध करायचे म्हणून बोलत नाही. कुणीही निव्वळ संवाद करायचे म्हणून बोलत नाही. तरीही, प्रत्येकाची स्वतःची एक ओळख आहे. 

संवाद हा भाषेचा स्थायीभाव मानला तरी निर्मिती हाही भाषेचा स्थायीभाव असू शकतो. अगदी, मूलभूत स्तरावर शब्द निर्मिती आणि वाक्य निर्मिती, तसेच दोन किंवा अनेक शब्द आणि वाक्य यातील अवकाशाची निर्मिती. हे 'नवल' मधून साधले जाते. त्याचबरोबर, व्यावहारिक भाषेचे निर्मितीक्षम भाषेत रूपांतर करण्याचा तुझा प्रयत्न मला वाचनाच्या प्रक्रियेत गुंतवून ठेवला. 'प्रयत्न' हा शब्द मी वापरतो याचा अर्थ तुझ्या कथनाच्या भाषा निर्मिती मध्ये सहजता आणि क्राफ्टही आहे. त्यामुळे तुकड्या तुकड्याने येणारी स्थळ निर्मिती आणि त्याच्या भवतालीची व्यक्ती चित्रण निर्मिती भाषा आणि भाषेची मांडणीतुन कथन अवकाशात जागोजागी बांधून ठेवते.

'नवल' मधल्या भाषेचे नमुने मी कुठेकुठे माझ्या वहीत, आय पॅड वरच्या नोट्स मध्ये नोंदवून ठेवले आहेत.


ज्या दिवसांत 'नवल' वाचत होतो - एकापाठोपाठ पाने उलगडत वाचले नाही- तेव्हा मी माझी वही, नोट्स उघडून बघत असे. काय आहे असे या उतरवून घेतलेल्या वाक्यात, तुकड्यात? असा प्रश्न यायचा मनात. आताही येतो. 

समोर एक तुकडा आहे, ६४ क्रमांकाच्या पृष्ठावरचा:

"सफेद इमारतीच्या थोड्याशा पायऱ्या पार केल्यावर लागणारी 'शिंदे यांची मेस' ही जुनी जाणती पाटी; 'श' आणि 'द' चे वहिले वळसे; आत उदासवाण्या फरशीवर टेबलं, ताट, वाट्या, पेले, चमचे. महिन्याचे सहाशे रुपये भरून तो 'मेंबर' झालाय. आणि जिला 'दुपार' म्हणतात त्या रात्री तिथे जेऊ लागलाय. पोटभर. पोट भरताना खिडकीतल्या उन्हाभासात कसली तरी उघडीप पारखू लागलाय."

'नवल'मध्ये भाषा आणतोस. भाषेबद्दल बोलतोस. भाषेतून स्थळ-अवकाश आणतोस. भाषेतून भवताल आणतोस. 

भवताल निर्मितीसाठी भाषेला निष्कर्षाच्या दावणीला बांधत नाहीस. पण तरीही, कुणी ठरवलं तर, अर्थ-समाज-संस्कृती असे काही वाचायचीही संधी मिळू शकते. 

या अर्थाने, स्थळ आणि व्यक्तींच्या सामाजिक वा इतर ओळखी त्यांच्या कपाळावर चिकटलेल्या नाहीत. त्यांच्या कृतीतून आणि पेरलेल्या सूचकतेतून त्यांच्या ओळखीचे वाचन, कोणताही दबाव न घेता, होऊ शकते. 'नवल' मधून माणसे, जागा येतात पण ते, तुझ्याच शब्दात सांगायचे तर, "आकाश- चौकस खोली" खोली प्रमाणे. वाचक म्हणून मला 'नवल' वाचताना नवल वाटत राहिले कारण कादंबरीतले जग म्हणजे "चाहूल-घेती, अंदाज-घेती, खुली, खूप खोली. निळी खोली, म्हणजे मूलतः रंग रहित पण निळ्या प्रकाशाने दुपारच्या भरपूर लख्ख उजेडाने उजळलेली खोली" वाटते. 

'नवल' मधून उजळून जाणाऱ्या 'आकाश चौकस खोलीतून' स्थळ काळाचा अवकाश जो सोनकुळे, तो राहतो त्या वसतीगृहात दडलेला आहे, तसाच, तो त्याच्या गावातही दडलेला आहे. वसतिगृह आणि गाव यामधल्या अवकाशातही ती खोली उजळत राहते. सोनकुळेला एक स्वप्न पडते ज्यात तो गाव पाहतो. तसं म्हटलं तर स्वप्नाचा डिव्हाईस बरेच जण वापरतात. पण, 'नवल' मधल्या भाषेच्या गंमतीमुळे तो नव्याने आकळतो. मग एक किंवा अनेक स्थळे-जागा 'नवल' मध्ये एकमेकांत गुरफुटून जातात. निवेदन होते त्याप्रमाणे, "साडी नेसायची तर घर नेसायचं आणि घर नसायचं तर हा परिसर नेसायचा." अशा गुंताळ्यातून स्थळ-काळ-व्यक्ती एकमेकांत, एकमेकांतून उभे राहतात.

'नवल' ही कादंबरी मला त्यातल्या व्यक्तींपेक्षा त्यातल्या स्थळांची-इमारतींची-पाट्यांची-ठिकाणांची- जागोजागी झिरपणाऱ्या प्रकाश-सावल्यांची वाटते. स्थळांना ओळख आहे. स्थळांची ओळख बदलत राहते. स्थळांना डोळे फुटलेले दिसतात माणसांकडे पाहण्याचे. 

'नवल' मधील भाषा, एका बाजूला, सहज येताना वाटली. पण काही वेळेनंतर कथन मात्र स्वतःला पुनरावृत्त करत राहते असेही वाटत राहिले. याचा अर्थ मला कंटाळा नव्हता आला. कारण, सोबतीला भाषा होती. पण, कुठेतरी छोट्या छोट्या एककांमध्ये (युनिट्स) मध्ये मी अडकत राहिलो असे वाटते. एका पाठोपाठ एक एकके येतात पण त्या एककांची मिळून कथन-रचना समोर येत नाही. कदाचित, तुला  रचना खुली ठेवायची असेल. पण, खुल्या रचनेतले क्राफ्ट जाणवले नाही. त्यामुळे, खुल्या रचनेला कार्ड्स शफल करावेत तसे मी समोर गेलो. पण त्या सर्वांना मिळून एकत्र रचनेच्या स्तरावर मला पाहता आले नाही. वर म्हटल्याप्रमाणे, भाषा मला तुझ्या 'नवल' पूर्ण जगात बांधून ठेवते. पण, रचनेकडून मला अजून शक्यता आवडल्या असत्या. 

तर, भाषेची गुजगोष्टी करायला प्रवृत्त करणारी 'नवल' वाचून काय वाटले, जाणवले ते हे.   

नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

आशुतोष

३१ डिसेंबर, २०२१.

Comments