शिक्षकाचे दर्शन

मानवी संस्कृतीवर आणि मनावर खोलवर परिणाम करणारा शिक्षक तात्कालिक फ़ायद्यांकडे पाहून लोकप्रिय होण्याच्या घोळात सापडत नाही. आपल्या विद्यार्थ्यांकडून मिळणा-या क्षणिक कौतुकाच्या आनंदाने भारावून जात तो ‘स्व’ सुखावून घेण्याच्या फ़ंदात नाही पडत. विद्यार्थाच्या खाजगी जीवनात शिरुन त्याच्या भाव-भावनांच्या भुलभुलय्यात त्यांना आणि स्वतःला गुंगवून चिरकाल टिकणा-या आत्मभानापासुन आपल्या विद्यार्थ्याला आणि स्वतःला वंचित तो ठेवत नाही. अशा शिक्षकाच्या, कदाचित, जवळ जाण्यासाठी विद्यार्थी कचरेल. पण, अशा शिक्षकाला दूरवरुन निरखण्यात सुजाण विद्यार्थ्याला आनंद मिळतो. आत्मीयतेने आणि मायेने पाठीवरुन हात फ़िरताना जो आनंद होतो तसा आनंद ‘कडक’ असणा-या शिक्षकाच्या अवती-भवती राहाताना होतो. हा मार्ग विद्यार्थ्याला स्वतःचा शोध घेण्याची एक संधी देणारा असतो. जगण्याचे भान देणारा विद्यार्थी-शिक्षक नात्यातला तो आध्यात्मिक दुवा असावा, कदाचित.


माधूरी पुरंदरे अवती भवती असल्या की असे काहीसे सुचते. 

विद्यार्थ्यांच्या गर्ल-फ़्रेंड/बॉय-फ़्रेंडबद्दल बोलून त्यांच्यासाठी प्रिय बनण्याच्या शिक्षक-पणाच्या काळात माधुरी पुरंदरेचे भवताली असणे उजळून टाकणारे असते. पारंपारिक अर्थाने त्या शिकवण्याचे किती काम करतात हे मला माहिती नाही. सहज जाऊन बोलावे असे वेल-कमिंग व्यक्तिमत्व त्यांच्याकडे नाही. पुस्तकात वाचलेल्या वा ऐकलेल्या जुन्या काळातल्या गोष्टींमधल्या ‘मास्तर’ लोकांची आठवण त्या करुन देतात. माधूरी पुरंदरे चिकित्सक आहेत. कितीक जणांना त्यांच्या शिस्तीचा आणि काटेकोरपणाचा दरारा वाटतो. त्यांनी आपल्या कामाबद्दल मत व्यक्त करावे अशी इच्छा मनातल्या मनात बाळगणारे कितीतरी कवी, चित्रकार, नाटककार त्याच्याभवती, दूरवर, उभे असलेले दिसतील. तुम्ही बोलवा वा नाही बोलवा, नवी जुनी नाटके पाहायला (रांगेत उभ्या राहून तिकिट काढून) त्या येतात. काही वर्षांपूर्वी त्यांना सायकलवरुन येता-जाता मी पाहिले आहे. तेंव्हा ज्या शांतपणे एन एफ़ ए आयला त्या सिनेमा बघायला येत असत तेवढ्याच शांतपणे आणि त्याच सातत्याने त्या आजही सिनेमा पाहायला येताना दिसतात. गेले काही वर्षे अत्यंत नेटाने, प्रामाणिकपणे पुण्यातल्या सू-दर्शनला चित्रकलेविषयी जे काही सांस्कृतिक त्या कार्य करत आहेत त्यातुन कला प्रातांतली ही एक पिढी घडत आहे असे दिसते. एका भाषेतले भान असणे दिवसेंदिवस जिकरीचे होत असताना बहुभाषिक-पटुत्व असणे हे दुर्मिळ ‘एक्स्पर्टाइज’ माधुरीताईंकडे आहे. ‘इंटरडिसिप्लिनीरी’ असण्याचा आजच्या काळातला गवगवा होण्यापूर्वीपासूनच्या काळापासुन त्या विविध कलाप्रातांत लीलया संचार करत आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, त्यांचे कार्य कुणाचे उणे दुणे काढत, रडत कढत चाललेले नसते. विनाकारण बडबड नाही. समृध्द शिक्षकाची ही रीत. 
आता, त्याना मिळालेल्या साहित्य अकादमीच्या सन्मानाने त्यांच्या कामाची प्रकट चर्चा होईल. सन्मानाचे जाऊ द्या. त्यांचे काम चालूच असेल. महाराष्ट्रातल्या गावागावात वा पुण्यात नाटक करणा-यांना, चांगला सिनेमा बघणा-यांना, चित्रे वा फ़ोटो काढणा-यांना, त्यांचे काम मॉडेल वाटत आले आहे. फ़क्त एवढच की त्यांनी पत्करलेला मार्ग कठीण आहे. कारण, तो पॉप्यूलिस्ट शिक्षक-कलावंताचा नाही.

Comments

Unknown said…
आशुतोष,

चांगले लिहिले आहेस. खरे कर माधुरी पुरंदरेंवर सविस्तर लिहिले जाणे आवश्यक आहे. कारण अशी शांतपणे काम करीत राहणारी माणसेच सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात फार महत्त्वाते काम करीत असतात परंतु त्याबद्दल फार कमी माहिती असते. त्यांच्या विविध क्षेत्रांतील कामांबद्दल स्वतंत्रपणे लिहिले जाईल, जावे असे मनापासून वाटते.

गिरीश
Ashutosh Potdar said…
धन्यवाद, गिरिश.